प्रतिनिधी / पेठ वडगाव
प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शाखा भादोले यांचेवतीने गावातील सांडपाण्याच्या विषयी शुक्रवारपासून आमरण उपोषण चालू केले आहे. आज हे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरु राहिले. यामुळे ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकारी यांनी या उपोषणाकडे पाठ फिरवल्याच्या आरोप या संघटनेकडून करण्यात आला असून दिव्यांग बांधवांच्याबद्दल दाखविलेल्या अनास्थेबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
भादोले येथे दिव्यांग असलेल्या अमर सुतार यांच्या घरासमोर असलेल्या सांडपाण्याच्या प्रश्नाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही या मागणीकडे ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामपंचायत सदस्य यांनी दखल घेतली नाही. यामुळे नामदार बच्चू कडू यांच्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्यावतीने पदाधिकारी यांनी ग्रामपंचायतीसमोर अर्धनग्न बसून आंदोलन सुरु केले आहे.
दिव्यांग बांधवांचा आज बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस असूनही ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी याकडे पाठ फिरविली. आज प्रशासनाच्यावतीने पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पवार यांनी सकाळी नऊ वाजता उपस्थित राहून आंदोलनाची माहिती घेतली तरीही ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी याकडे पाठ फिरविल्याचा आरोप संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे. या उलट दिव्यांग बांधवांची बदनामी केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिव्यांगावर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी प्रहार दिव्यांग संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष तुकाराम पाटील यांनी केली आहे. आंदोलनकर्त्यांनी काम सुरु झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे.या आंदोलनात जिल्हाध्यक्ष तुकाराम पाटील, आदीसह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.


previous post