Tarun Bharat

भारताचा ऑस्ट्रेलियावर तेरा वर्षांनंतर पहिला विजय

वृत्तसंस्था/ ऍडलेड

यजमान ऑस्टेलिया आणि भारत यांच्यात ऑस्ट्रेलियामध्ये पाच सामन्यांची हॉकी कसोटी मालिका खेळविली जात आहे. या मालिकेत बुधवारी झालेल्या तिसऱया सामन्यात भारताने टॉप सीडेड ऑस्ट्रेलियाचा 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला. भारतीय हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियावरील हा तेरा वर्षांनंतरचा पहिला विजय आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारतावर 2-1 अशी आघाडी मिळविली आहे.

बलाढय़ ऑस्ट्रेलियन हॉकी संघाने यापूर्वी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताचा 7-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळविले होते. त्यानंतर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात 5-4 तर दुसऱया सामन्यात 7-4 अशा गोलफरकाने पराभव करून मालिकेत एकतर्फी आघाडी मिळविली होती. मात्र, बुधवारचा तिसरा सामना भारताने जिंकून ऑस्ट्रेलियाची आघाडी थोडी कमी केली आहे. या मालिकेतील चौथा सामना येत्या शनिवारी तर पाचवा आणि शेवटचा सामना येत्या रविवारी खेळविला जाईल.

तिसऱया हॉकी कसोटी सामन्यात भारतातर्फे कर्णधार हरमनप्रित सिंगने 12 व्या मिनिटाला, अभिषेकने 47 व्या मिनिटाला, समशेर सिंगने 57 व्या मिनिटाला आणि आकाशदीप सिंगने 60 व्या मिनिटाला गोल नोंदविले. ऑस्ट्रेलियातर्फे जॅक वेल्चने 25 व्या मिनिटाला तर कर्णधार ऍरेन झेलिवेस्कीने 32 व्या आणि नाथन इफ्रेमूसने 59 व्या मिनिटाला गोल केले. या सामन्यात 7 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला खाते उघडण्याची संधी मिळाली होती. पण भारतीय गोलरक्षक पाठकने ऑस्ट्रेलियाचा हा हल्ला थोपविला. 12 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर भारताचे खाते कर्णधार हरमनप्रित सिंगने उघडले. भारताच्या सुखजित सिंगने गोल करण्याची संधी गमावली. 20 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाने आपले खाते उघडण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय गोलरक्षकाने त्यांना रोखले. 25 व्या मिनिटाला वेल्चने खाते उघडून ऑस्ट्रेलियाला बरोबरी साधून दिली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. सामन्याच्या उत्तरार्धात एकूण 5 गोल नोंदविले गेले. भारतीय आघाडी फळीने ऑस्ट्रेलियाच्या बचावफळीवर चांगलेच दडपण आणले. सामना संपण्यास 2 मिनिटे बाकी असताना दोन्ही संघ पुन्हा 3-3 असे बरोबरीत होते. पण शेवटच्या मिनिटातील 54 व्या सेकंदाला आकाशदीप सिंगने भारताचा चौथा आणि निर्णायक गोल नोंदविला.

Related Stories

ट्रिनबॅगो नाईट रायडर्सचा सलग सहावा विजय

Patil_p

कमिन्स, वॉर्नर, हॅजलवूड, मॅक्सवेल पाक दौऱयातून बाहेर

Patil_p

विंडीजचा बांगलादेशवर मालिकाविजय

Patil_p

भारत-लंका यांच्यात आज महत्त्वाची लढत

Patil_p

इंग्लंडचे माजी फुटबॉलपटू कोहेन यांचे निधन

Patil_p

नेदरलँड्सचा विक्रम, भारत, इंग्लंडही विजयी

Amit Kulkarni