Tarun Bharat

भारताचा झिम्बाब्वे दौराही रद्द

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा देखील आता रद्द करावा लागत असल्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी केली. बीसीसीआयने अद्याप आपल्या खेळाडूंना सराव सुरु करण्याचीही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे, नजीकच्या कालावधीत कोणतेही सामने होण्याची शक्यता अगदीच अंधुक आहे. यापूर्वी गुरुवारी लंकेचा दौराही अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर टाकत असल्याची घोषणा मंडळाने केली होती.

‘कोव्हिड-19 च्या प्रकोपामुळे भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका व झिम्बाब्वे दौऱयावर जाणार नाही’, असे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी पत्रकातून नमूद केले. यापूर्वीच्या रुपरेषेनुसार, भारतीय संघ 24 जूनपासून श्रीलंका दौऱयावर जाणार होता आणि उभय संघात त्यावेळी 3 वनडे व 3 टी-20 सामने खेळवले जाणार होते. याशिवाय, 22 ऑगस्टपासून आयोजित झिम्बाब्वे दौऱयात 3 वनडे सामने होणे अपेक्षित होते, असे शाह यात पुढे म्हणाले. भारतात आतापर्यंत कोव्हिड-19 चे 3 लाख रुग्ण आढळले असून साडेआठ हजार जणांना यात आपले प्राण गमवावे लागले आहेत.

तूर्तास, भारतीय संघाने अद्याप सराव सुरु केलेला नाही. शिवाय, जुलैपर्यंत कोणतेही प्रशिक्षण शिबिर भरवले जाण्याचीही शक्यता नाही. साहायक पथकातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही सामन्यात खेळण्यापूर्वी खेळाडूंना किमान सहा आठवडय़ांचा कालावधी लागू शकतो. प्रशिक्षण शिबिर भरवणे आता योग्य ठरेल, असे ज्यावेळी केंद्र शासनाला वाटेल, त्याचवेळी बीसीसीआय प्रशिक्षण शिबिर आयोजित करेल, याचा शाह यांनी येथे उल्लेख केला.

‘प्रथमश्रेणी व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरु करण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील असेल. पण, कोणताही निर्णय घेण्याची घाई अजिबात केली जाणार नाही. केंद्रीय, राज्यस्तरीय व काही एजन्सीकडून खातरजमा करुन घेतल्यानंतरच पुढील कार्यवाही सुरु होईल. देशातील कोव्हिड-19 च्या स्थितीवर मंडळाचे बारीक लक्ष आहे आणि प्रशासनाचे दिशानिर्देश लक्षात घेऊन पुढील रुपरेषा निश्चित केली जाणार आहे’ असेही शाह यांनी या पत्रकातून नमूद केले.

भारतीय संघ यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशातच आयोजित मालिकेत मैदानावर उतरला. त्यानंतर संघाला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. आफ्रिकेविरुद्धची ती मालिका देखील पहिल्या सामन्यानंतर लांबणीवर टाकली गेली. शिवाय, तो पहिला सामनाही पावसामुळे होऊ शकला नव्हता.

Related Stories

लुईस हॅमिल्टन ‘नाईटहूड’ने सन्मानित

Patil_p

कोलेस्निकोव्हचा नवा विश्वविक्रम

Patil_p

पाटीदार बॉईजकडे पाटीदार चषक

Sandeep Gawade

आरसीबीची रणनीती, फोकस होल्डरवरच!

Patil_p

महिला प्रिमियर लिग स्पर्धा शुभंकराचे अनावरण

Amit Kulkarni

पीव्ही सिंधू अंतिम फेरीत

Patil_p