Tarun Bharat

भारताचा नवा गोल्डन स्टार नीरज चोप्रा

Advertisements

अवघ्या देशवासियांना 23 वर्षाच्या नीरज चोप्राकडून स्वातंत्र्योत्तर कालखंडातील ट्रक अँड फिल्डमधील पहिल्यावहिल्या पदकाची अपेक्षा होती. बुधवारी त्याने क्वॉलिफिकेशन राऊंडमध्ये टॉप क्लास योगदान दिले, त्यावेळी अपेक्षा उंचावल्या गेल्या. वास्तविक, जर्मनीचा वर्ल्ड चॅम्पियन जोहान्नस व्हेट्टर हाच सुवर्ण जिंकेल, असे अगदी ऑलिम्पिक सुरु होण्यापूर्वीपासून म्हटले जात होते. पण, विजयश्री नेहमी शुरांना कौल देते. शनिवारी टोकियो ऑलिम्पिक स्टेडियमवर विजयश्रीने आपले वजन नीरज चोप्राच्या पारडय़ात टाकले आणि नीरज वैयक्तिक गटात सुवर्ण जिंकणारा अभिनव बिंद्रानंतर भारताचा दुसरा क्रीडापटू ठरला. त्याने केलेली 87.58 मीटर्सची सर्वोत्तम सुवर्णफेक पुढील कित्येक दशके भारतीय ऍथलेटिक्समधील खऱया अर्थाने सोनेरी पान असणार आहे, जे सातत्याने उलगडून पाहिले जाणार आहे, उलगडून दाखवले जाणार आहे!

नीरज चोप्रा

जन्म ः 24 डिसेंबर 1997

वय ः 23

गाव ः खांदरा (पानिपतमध्ये), हरियाणा

वडील ः सतीश कुमार चोप्रा (शेतकरी)

आई ः सरोज (गृहिणी)

भालाफेकीकडे कसा वळला?

वयाच्या 11 व्या वर्षी नीरजचे वजन थोडेथोडके नव्हे तर चक्क 80 किलो इतके होते आणि या वजनावर काहीतरी मार्ग काढावा म्हणून त्याला त्याच्या कुटुंबाने अक्षरशः खेळात ढकलून दिले! आपल्या खेडय़ापासून 15 किलोमीटर अंतरावर पानिपतच्या शिवाजी स्टेडियममध्ये नीरज आला, त्यावेळी त्याचा बहुतांशी वेळ ऍथलिट्सचा सराव पाहण्यातच जायचा. पण, एकदा तेथील एक युवा भालाफेकपटू जयवीर चौधरीने नीरजकडे भाला सोपवला आणि इथेच नीरज खऱया अर्थाने भालाफेकीकडे वळला, आकृष्ट झाला!

भालाफेक फायनलमधील शेवटची तालिका

क्रमांक / ऍथलिट / देश / सर्वोत्तम

1/ नीरज चोप्रा / भारत / 87.58 मी.

2 / जेकब व्हॅडलेच / झेक प्रजासत्ताक / 86.67 मी.

3 / व्हिटेस्लाव्ह वेसेली / झेक प्रजासत्ताक / 85.44 मी.

4 / ज्युलियन वेब्बर / जर्मनी / 85.30 मी.

5 / अर्शद नदीम / पाकिस्तान / 84.62 मी.

6 / ऍलिक्सेई कॅत्कवेस / बेलारुस / 83.71 मी.

7 / ऍन्ड्रियन मर्डेयर / मोल्डोव्हा / 83.30 मी.

8 / लॅस्सी इटेलॅटोलो / फिनलंड / 83.28 मी.

9 / जोहान्नस व्हेट्टर / जर्मनी / 82.52 मी.

10 / पॅव्हेल मियालेश्का / बेलारुस / 82.28 मी.

11 / किम ऍम्ब / स्वीडन / 79.69 मी.

12 / अलेक्झांडर नोव्हॅक / रोमानिया / 79.29 मी.

भालाफेकीतील विश्वविक्रम

थ्रो / ऍथलिट / देश / वर्ष

98.48 मी. / जॅन झेलेन्झी / झेक प्रजासत्ताक / 1996

भालाफेकीतील ऑलिम्पिक विक्रम

थ्रो / ऍथलिट / देश / वर्ष

90.57 मी. / ऍन्द्रियास थॉरकिल्ड्सन / नॉर्वे / 1996

नीरजची भालाफेकीतील वर्षगणिक वाटचाल

वर्ष / 2013 / 2014 / 2015 / 2016 / 2017 / 2018 / 2020 / 2021

थ्रो / 69.66 / 70.19 / 81.04 / 86.48 / 85.63 / 88.06 / 87.86 / 88.07

असा असतो ऑलिम्पिकचा भाला!

उंची ः 8 फूट 6 इंच

वजन ः 800 ग्रॅम

नीरजच्या भात्यात आहेत दीड-दोन लाखांचे भाले!

एकवेळ अशी होती की, नीरजला त्यावेळी 7 हजार रुपयांच्या एका भाल्यासाठी झगडावे लागत असे. पण, आजच्या घडीला नीरजच्या भात्यात थोडेथोडके नव्हे तर चक्क दीड ते 2 लाख रुपयांचे डझनांनी भाले आहेत.

200 रुपयांचा भाला मोडला आणि हजारो रुपयांची बोलणी खावी लागली!

10 वर्षांपूर्वी वयाच्या तेराव्या वर्षी नीरजने एक भालाफेक केली, त्यावेळी ती 26 मीटर्स दूर गेली. ते पाहून जयवीर सिंह व जितेंद्र जागलान हे थक्क झाले. कारण, त्यावेळी सातत्याने सराव करणारे भालाफेकपटू देखील पहिल्या टप्प्यात इतकी फेक करु शकत नव्हते. मात्र, एकदा नीरजने केलेल्या अशाच एका वेगवान फेकीवर भाला मोडला आणि वरिष्ठ खेळाडू निराशेने म्हणाला होता, आता आपल्याला क्रीडा खात्याकडून आणखी भाले नाही मिळू शकणार! आपण सराव कसा करणार? नीरजने त्यावेळी प्रत्युत्तर दिले नाही. पण, भालाफेकीत आजवर कोणालाच साध्य झाले नाही, ते करुन दाखवायचे, हा चंग त्याने बांधला आणि त्या दृष्टीने त्याने तेथूनच मोर्चेबांधणी, सराव सुरु केला.

फायनलमध्ये पहिल्या 5 ऍथलिट्सची 6 फेऱयातील कामगिरी

ऍथलिट / पहिला थ्रो / दुसरा / तिसरा / चौथा / पाचवा / सहावा

नीरज चोप्रा / 87.03 / 87.58 / 76.79 / -/ – / 84.24

जेकब व्हॅडलेच / 83.98 / – / -/82.86 / 86.67 / –

व्हिडेस्लाव्ह वेसेले / 79.73 / 80.30 / 85.44 / – / 84.98 / –

ज्युलियन वेबर / 85.30 / 77.90 / 78.00 / 83.10 / 85.15 / 75.72

अर्शद नदीम / 82.40 / – / 84.62 / 82.91 / 81.92 / –

अवघ्या 3 तासात 13.75 कोटी रुपयांचा मानकरी!

हरियाणा ः 6 कोटी रुपये, क्लास वन जॉब आणि भूखंड

रेल्वे ः 3 कोटी रुपये

पंजाब ः 2 कोटी रुपये

मणिपूर ः 1 कोटी रुपये

बीसीसीआय ः 1 कोटी रुपये

भारतीय ऑलिम्पिक कमिटी ः 75 लाख रुपये.

नीरज शिवपालला म्हणाला होता, भाई कुछ अलग करना है, देश याद रखे!

बुधवारी संपन्न झालेल्या क्वॉलिफिकेशन राऊंडमध्ये अव्वलस्थानासह फायनलमध्ये स्थान निश्चित करणाऱया नीरजच्या मनात त्या क्षणापासूनच विचार घोळत होते ते निव्वळ फायनलचे! आणि त्याचे ध्येय हे फक्त फायनलमध्ये पदक जिंकण्याचे नव्हते तर ते होते फक्त आणि फक्त सुवर्ण जिंकण्याचे! फायनलमधील उद्दिष्टय़ काय असेल, याबद्दल बोलताना तो म्हणाला होता, मेडल तो बस गोल्ड होता है!

अगदी फायनलला उतरण्यापूर्वी एक दिवस आधी देखील नीरजच्या मनात काय चालले आहे, याची झलक शिवपाल या त्याच्या सहकाऱयाला आली होती. कारण, नीरज त्यावेळी शिवपालला म्हणाला होता, भाई कुछ अलग करना है, जिसे देश याद रखे!

बॉक्स

कोण आहेत नीरजचे विदेशी, विश्वविक्रमधारक प्रशिक्षक?

जर्मनीचे उवे हॉन्ह हे नीरजचे विद्यमान प्रशिक्षक स्वतःही विश्वविक्रमवीर आहेत. आश्चर्य म्हणजे भालाफेकीतील 104.80 मीटर्सचा विश्वविक्रम त्यांच्या खात्यावर आहे. भालाफेक इतिहासात 100 मीटर्सपेक्षा अधिक थ्रो करणारे हॉन्ह हे एकमेव ऍथलिट. मात्र, त्यांचा हा थ्रो जुन्या भाल्यावर होता.

पुढे भालाफेकीचे डिझाईन बदलले गेले आणि त्यानंतर 95 मीटर्सपेक्षा अधिक थ्रो करणेही दुरापास्त झाले. साहजिकच, हॉन्ह यांचा 104.80 मीटर्सचा विक्रम अबाधितच राहिला. आता हॉन्ह यांचे प्रशिक्षण लाभलेल्या त्यांच्या शिष्यानेच म्हणजे नीरज चोप्राने ऑलिम्पिक सुवर्ण जिंकून त्यांना सर्वोत्तम गुरुदक्षिणा दिली आहे.

बॉक्स

भारतीय लष्कर आणि मिशन ऑलिम्पिक 2020!

@2016 मध्ये नीरज चोप्राचा भारतीय लष्करात क्रीडा कोटय़ातून समावेश केला गेला. नायब सुभेदार म्हणून नीरज सैन्यात दाखल झाला.

@पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूट आणि मिशन ऑलिम्पिक्स विंग्जमध्ये त्याची प्रशिक्षणासाठी निवड झाली. आश्वासक क्रीडापटूंच्या प्रशिक्षणासाठी लष्करात हा अभिनव उपक्रम राबवला जातो.

@आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटमध्ये याशिवाय, 11 ते 15 वयोगटातील तंदुरुस्त मुलांना निवडून त्यांना तिरंदाजी, ऍथलेटिक्स, मुष्टियुद्ध, डायव्हिंग, कुस्ती, तलवारबाजी व वेटलिफ्ंिटग या 7 क्रीडा प्रकारात प्रशिक्षण दिले जाते. स्पोर्ट्स मेडिसिन, सायकॉलॉजी, फिजिओलॉजी, बायो-मेकॅनिक्स व न्यूट्रिशनमधील तज्ञांचेही यात मार्गदशर्न घेतले जाते.

@लष्करात सुभेदार काशिनाथ नाईक हे नीरजचे पहिले प्रशिक्षक. स्वतः काशिनाथ नाईक 2010 राष्ट्रकुल स्पर्धेतील भालाफेकीत कांस्यजेते आहेत.

@नीरज चोप्राला जर्मन प्रशिक्षक हॉन्ह यांचेही प्रशिक्षण लाभत आले असून त्यांचे मार्गदर्शन घेत नीरजने 2018 राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकले आहे.

@भालाफेकीतील लक्षवेधी प्रगतीच्या निकषावर नीरजला पुढे सुभेदार म्हणून पदोन्नती मिळाली. 2018 मध्ये तो अर्जुन पुरस्कार व विशिष्ट सेवा पुरस्काराचा मानकरी देखील ठरला.

@नीरज चोप्रापूर्वी ऑलिम्पिक गाजवणारे ध्यानचंद, विजय कुमार, जितू राय, राजवर्धन सिंग राठोड, मिल्खा सिंग हे देखील लष्करी सेवेतून घडलेले ऑलिम्पियन आहेत.

मुंबईच्या डॉक्टरांनी वाचवला नीरजचा उजवा हात!

भारताच्या नीरज चोप्राने आज भालाफेकीत इतिहास घडवला, त्याचे श्रेय नीरजच्या उजव्या हातावर यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱया प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन दिनशॉ पार्डीवाला यांनाही जाते. 2019 च्या मध्यात कारकिर्दीसाठी धोकादायक ठरु शकणारी ढोपराची दुखापत झाल्यानंतर नीरजसमोर अक्षरशः यक्ष प्रश्न उभा ठाकला होता. पण, वेळीच डॉ. दिनशॉ यांनी क्लिष्ट स्वरुपाची शस्त्रक्रिया केली आणि याचमुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज नावाचे वादळ अवघ्या क्रीडा विश्वाला अनुभवता आले. दिनशॉ यांनी चोप्रापूर्वी पीव्ही सिंधू, सायना नेहवाल, फोगट भगिनी, जसप्रित बुमराह, श्रेयस अय्यर यांच्यावरही उपचार केले आहेत.

Related Stories

इंग्लंड दौऱयासाठी विंडीज खेळाडूंवर सक्ती नाही : ग्रेव्ह

Patil_p

नायके-नेमार यांच्यातील करार रद्द

Patil_p

सिंधूचे लक्ष आता वर्ल्ड चॅम्पियनशिपवर

Patil_p

जोकोविच, मरे यांची विजयी सलामी

Patil_p

भारताचा विजयाने विंडीज दौऱयाला निरोप

Patil_p

दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंडवर विजय

Patil_p
error: Content is protected !!