Tarun Bharat

भारताचा नेमबाजी संघ क्रोएशियास रवाना

ट्रेनिंगसह काही स्पर्धांतही भाग घेणार, तेथून थेट टोकियोकडे रवाना होणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑलिम्पिकला पात्र ठरलेले भारतीय नेमबाजांचा संघ अडीच महिन्यांच्या ट्रेनिंग कम स्पर्धा दौऱयासाठी मंगळवारी क्रोएशियाकडे रवाना झाला. टोकियो ऑलिम्पिकआधी त्यांना सरावासाठी मिळालेली ही शेवटची संधी आहे.

प्रशिक्षक व साहाय्यक स्टाफ आणि 13 सदस्यीय भारतीय नेमबाजी संघाने क्रोएशियाची राजधानी झाग्रेबकडे प्रयाण केले. तेथे हा संघ सराव शिबिरात भाग घेईल. त्यानंतर ओसेक येथे होणाऱया युरोपियन चॅम्पियनशिप्स (20 मे ते 6 जून), त्यानंतर आयएसएसएफ वर्ल्ड कप (जून 22 ते जुलै 3) स्पर्धेत हा संघ भाग घेणार आहे. ‘प्रवासासाठी शुभेच्छा! तेथे गेल्यानंतर कसून सराव करा आणि यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करा,’ असे भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे अध्यक्ष रनिंदर सिंग संघ प्रयाण करण्यापूर्वी ट्विटच्या माध्यमातून म्हणाले.

ऑलिम्पिकमध्ये खेळणारे दोन स्कीट नेमबाज अंगद वीर सिंग बजवा व मैराज अहमद खान हे इटलीमध्ये राहतील. गुरजोत सिंग खानगुरासह भारतीय नेमबाजांनी सध्या लोनाटो येथे सुरू असलेल्या शॉटगन वर्ल्ड कपमध्ये भाग घेतला असून सोमवारी त्यांना स्कीटमधील अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. भारताच्या माजी महिला नेमबाज सुमा शिरूर आता राष्ट्रीय रायफल नेमबाजी संघाच्या हाय परफॉर्मन्स प्रशिक्षक असून त्यांनी संघासोबत प्रयाण करण्यापूर्वी आशीर्वाद घेतले. ‘भारत माता की जय घोषणेने आम्ही क्रोएशियाकडे प्रयाण करण्यास सज्ज झालो आहोत. तेथून आम्ही थेट टोकियोला ऑलिम्पिकसाठी प्रयाण करणार आहोत. एकूण 80 दिवसांचे हे वास्तव्य असेल. भारतीय नेमबाजी संघाला सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची आणि शुभेच्छांची गरज आहे,’ असे शिरूर यांनी ट्विटरमधील पोस्टमध्ये म्हटले आहे.

क्रोएशियातील मोहिम संपल्यानंतर हा संघ ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी थेट टोकियोकडे प्रयाण करणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धा 23 जुलैपासून सुरू होणार आहे. ओसेक येथे होणारी आयएसएसएफ वर्ल्ड कप स्पर्धा रद्द झालेल्या एका स्पर्धेच्या जागी आयोजित करण्यात आली आहे. आधीच्या नियोजनाप्रमाणे अझरबैजानमधील बाकू येथे 21 जून ते 2 जुलै या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पण तेथे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याने ती स्पर्धा रद्द करण्यात आली.

भारतीय संघात 13 रायफल, पिस्तूल नेमबाज असून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 9 प्रशिक्षक त्यांच्यासोबत आहेत. मात्र समरेश जंग, जसपाल राणा, रोनक पंडित यासारखे काही प्रशिक्षक विविध कारणांसाठी संघासोबत गेलेले नाहीत.  क्रोएशियातील कोरोना दिशानिर्देशानुसार भारतीय पथकाला ट्रेनिंगला सुरुवात करण्यापूर्वी सक्तीच्या क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे.

Related Stories

चेन्नई-राजस्थान यांच्यात आज वर्चस्वाची लढाई

Patil_p

सानिया-मॅकहॅले अंतिम फेरीत

Patil_p

शेल्बी रॉजर्स दुसऱया फेरीत

Patil_p

भारतीय बॅडमिंटन संघ उपांत्य फेरीत

Patil_p

बंगाल संघाचे नेतृत्व मजुमदारकडे

Patil_p

सनरायजर्स हैद्राबादच्या प्रँचायझीकडून कोरोनाग्रस्तांसाठी 30 कोटीची मदत

Patil_p