वृत्तसंस्था/ ग्वाटेमाला सिटी
भारताच्या रिकर्व्ह महिला संघाने विश्व चषक तिरंदाजी स्टेज 1 मध्ये अंतिम फेरी गाठून स्पर्धेतील पहिले पदक निश्चित केले आहे. या संघात दीपिका कुमारी, अंकिता भगत, कोमलिका बारी यांचा समावेश आहे.
भारताच्या या अव्वल मानांकित त्रिकुटाने स्पेनच्या प्रतिस्पर्ध्यावर 6-0 अशा सेट्सनी एकतर्फी मात करून दिमाखात अंतिम फेरी गाठली. जेतेपदासाठी रविवारी त्यांची लढत मेक्सिकोच्या द्वितीय मानांकित त्रिकुटाशी होणार आहे. दीपिका, अंकिता, कोमलिका यांनी 55, 56, 55 गुण नोंदवत एलिया कॅनालेस, इनेस डी व्हेलास्को, लेयर फर्नांडेझ यांना हरविले. त्याआधी उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी यजमान ग्वाटेमाला सिटीचा 6-0 अशाच फरकाने पराभव केला होता.
पुरुष रिकर्व्ह संघाला मात्र उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाचा धक्का बसला. स्पेनच्या खेळाडूंनी त्यांच्यावर शूटऑफमध्ये 26-27 अशी चुरशीच्या लढतीत निसटती मात केली. दोन्ही संघांनी 4-4 अशी बरोबरी केल्यानंतर शूटऑफ घेण्यात आले होते. आणखी तीन प्रकारात भारत पदक मिळविण्याच्या शर्यतीत असून अतानू दास-दीपिका कुमारी ही जोडी कांस्यपदकाच्या फेरीत पोहोचली आहे. याशिवाय त्यांनी वैयक्तिक रिकर्व्हमध्येही उपांत्य फेरी गाठली आहे.