Tarun Bharat

भारताचे इंग्लंडला 368 धावांचे आव्हान

शार्दुल ठाकुर, रिषभ पंत यांची अर्धशतके, भारताचा डाव 466 धावांत संपुष्टात

वृत्तसंस्था/ लंडन

भारताने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी चहापानानंतर दुसऱया डावात सर्व बाद 466 धावा जमवित इंग्लंडला 368 धावांचे आव्हान दिले आहे. रिषभ पंत, शार्दुल ठाकुर यांनी शानदार अर्धशतके नोंदवली तर कोहलीचे अर्धशतक हुकले व अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा अपयशी ठरला. इंग्लंडतर्फे वोक्सने 3 बळी मिळविले.

चहापानास खेळ थांबला तेव्हा उमेश यादव 13 व जसप्रित बुमराह 19 धावांवर खेळत होते. 3 बाद 270 या धावसंख्येवरून भारताने चौथ्या दिवसाच्या खेळास प्रारंभ केला आणि उपाहारापर्यंत 6 बाद 329 धावांपर्यंत मजल मारली. जडेजाला वोक्सने 17 धावांवर पायचीत केल्यानंतर उपकर्णधार रहाणेला त्याने ऑफकटरवर शून्यावरच पायचीत केले. जडेजाने कोहलीसमवेत चौथ्या गडय़ासाठी 59 धावांची भर घातली. कोहली अर्धशतक पूर्ण करणार असे वाटत असतानाच मोईन अलीने त्याला झेलबाद केले. कोहलीला मोईनचा ऑफब्रेक खेळायचा होता, पण स्लायडरच्या बाबतीत नेहमी होते त्याप्रमाणे चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागून थेट पहिल्या स्लिपमधील ओव्हर्टनकडे गेला. कोहलीने 96 चेंडूत 7 चौकारांसह 44 धावा केल्या. मध्यफळीत तीन फलंदाज 10 षटकांत झटपट बाद झाल्याने भारताचा डाव 3 बाद 296 वरून 6 बाद 312 असा कोलमडला.

भारतीय उपकर्णधार रहाणेच्या अपयशामुळे त्याच्या समावेशाबद्दल शंका निर्माण होऊ लागल्या आहेत. तो केवळ 8 चेंडू मैदानावर टिकला. त्याला एकदा पायचीत बाद देण्यात आले होते. पण डीआरएसमुळे तो बचावला होता. पण याचा त्याला लाभ घेता आला नाही. दुसऱया वेळी मात्र वोक्सचा चेंडू त्याच्या पायाला लागल्यानंतर रहाणेने कोहलीला डीआरएस घेण्याबद्दल विचारले असता त्याने नकार दिला. 78 कसोटींचा अनुभव असणाऱया रहाणेच्या या अपयशामुळे त्याच्या संघातील स्थानाला धोका निर्माण झाला आहे. डब्ल्यूटीसी फायनलपासून त्याने 49, 15, 5, 1, 61, 18, 10, 14, 0 अशा 9 डावांत एकूण 173 धावा जमविल्या आहेत.

उपाहारानंतर पंत व शार्दुल ठाकुर यांनी फटकेबाजी करीत 100 धावांची भागीदारी केली. पंतपेक्षा शार्दुलने जलद धावा जमवित सर्वप्रथम अर्धशतक पूर्ण केले. रूटच्या गोलंदाजीवर तो ओव्हर्टनकरवी झेलबाद झाला. त्याने 72 चेंडूत 7 चौकार, एका षटकारासह 60 धावा जमविल्या. पंतनेही नंतर अर्धशतक पूर्ण केले. पण मोईन अलीने त्याच धावसंख्येवर स्वतःच झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली. पंतने 106 चेंडूत 4 चौकारांसह 50 धावा काढल्या. उमेश यादव व बुमराह यांनीही फलंदाजीत बऱयापैकी कौशल्य दाखवत चहापानापर्यंत 31 धावांची भर घातली होती.

चहापानानंतर मात्र वोक्सने बुमराहला अलीकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. बुमराहने 38 चेंडूत 24 धावा करताना 4 चौकार मारले. बुमराह-यादव यांनी नवव्या गडय़ासाठी 36 धावांची भागीदारी केली. नंतर ओव्हर्टनने यादवला अलीकरवीच झेलबाद करून भारताचा डाव 466 धावांवर संपुष्टात आणला. यादवने 23 चेंडूत 1 चौकार, 2 षटकारांसह 25 धावा फटकावल्या. सिराज 3 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडच्या वोक्सने 3, मोईन व रॉबिन्सन यांनी प्रत्येकी 2, अँडरसन, ओव्हर्टन, रूट यांनी एकेक बळी मिळविला.

संक्षिप्त धावफलक ः भारत प.डाव 191, इंग्लंड प.डाव 290, भारत दु.डाव 148.2 षटकांत सर्व बाद 466 (रोहित शर्मा 127, केएल राहुल 46, पुजारा 61, कोहली 44, जडेजा 17, रहाणे 0, पंत 50, शार्दुल ठाकुर 60, उमेश यादव 25, बुमराह 24, सिराज नाबाद 3, अवांतर 9. गोलंदाजी ः वोक्स 3-83, रॉबिन्सन 2-105, मोईन अली 2-118, अँडरसन 1-79, ओव्हर्टन 1-58, रूट 1-16).

Related Stories

ऑस्ट्रेलियाच्या विजयात ऍगरची विक्रमी गोलंदाजी

Patil_p

दीपक चहर चेन्नई संघात रुजू

Patil_p

टी-20 वर्ल्ड कपसाठी पुढील आठवडय़ात संघनिवड

Patil_p

‘पॉवर पॅक’ पंजाबविरुद्ध चेन्नईसमोर गोलंदाजी ‘दुरुस्त’ करण्याचे आव्हान

Amit Kulkarni

वीज,धातू क्षेत्रातील विक्रीमुळे बाजार घसरणीसह बंद

Patil_p

ट्रिनबॅगो नाईट रायडर्स उपांत्य फेरीत

Patil_p