Tarun Bharat

भारताचे तीन पात्रता फुटबॉल सामने कतारमध्ये

Advertisements

विश्चषक पात्रता फेरी -31 मे ते 15 जून या कालावधीत होणार लढती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कोरोनामुळे प्रवासाचे निर्बंध आणि क्वारंटाईन नियमावलींचा विचार करून आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनने (एएफसी) विश्वचषक स्पर्धेतील पात्रतेचे उर्वरित सामने मध्यवर्ती ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भारताचे फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील पात्रतेचे तीन सामने आता कतारमध्ये खेळविण्यात येणार आहेत.

आधीच्या नियोजनानुसार कतारविरुद्धची लढत भारत मायभूमीत, बांगलादेशविरुद्धचा सामना त्यांच्याच देशात आणि अफगाणविरुद्धचा सामना मायदेशात खेळणार होता. पण कोरोना महामारीच्या संकटामुळे या वेळापत्रकात मोठा बदल करणे भाग पडले आहे. ‘फिफा विश्वचषक 2022 ची स्पर्धा कतारमध्ये होणार आहे. याच ठिकाणी आता गट ई मधील त्यांचे प्रतिस्पर्धी ओमान, अफगाणिस्तान, भारत व बांगलादेश यांचे पात्रतेचे उर्वरित सामने खेळविले जातील. त्याचप्रमाणे गट फ मधील सामने जपानमध्ये होणार असून या गटात किर्गीझ प्रजासत्ताक, ताजिकिस्तान, म्यानमार, मंगोलिया या संघांचा समावेश आहे,’ असे एएफसीने शुक्रवारी जाहीर केले. ‘आशियाई सदस्य संघटनांशी सखोल चर्चा केल्यानंतर फिफा विश्वचषक 2022 कतार व एएफसी आशियाई चषक 2023 चीन या स्पर्धांचे पात्रतेचे सर्व सामने मध्यवर्ती ठिकाणी घेण्याचा निर्णय आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनने घेतला आहे. यातील सामने 31 मे ते 15 जून या कालावधीत खेळविले जातील,’ असेही एएफसीने सांगितले.

भारतीय संघ ई गटात पाच सामन्यांत 3 गुण मिळवित सध्या चौथ्या स्थानावर असून विश्वचषक स्पर्धेचे यजमान कतार 13 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दुसऱया स्थानावरील ओमानने 12 गुण मिळविले आहेत. नोव्हेंबर 2019 नंतर पात्रतेची दुसरी फेरी महामारीच्या कारणास्तव खेळविण्यात आलेली नाही. 2022 विश्वचषक स्पर्धेसाठी मार्चमध्ये होणारे आशिया विभागातील पात्रतेचे सामने जपान, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया यांचे सामने वगळता, मे व जूनपर्यंत लांबणीवर टाकले जाणार असल्याचे गेल्याच महिन्यात एएफसीने म्हटले होते. भारताचे विश्वचषकाचे आव्हान याआधीच संपुष्टात आले असले तरी आशियाई चषक (2023) स्पर्धेत स्थान मिळविण्याची भारताला अजूनही संधी आहे. ही स्पर्धा चीनमध्ये होणार आहे. आठ गटविजेते आणि चार सर्वोत्तम गटउपविजेते संघ विश्वचषक पात्रतेच्या अंतिम टप्प्यात पोहोचणार आहेत. भारताने जर आपल्या गटात तिसरे स्थान मिळविले तर आशियाई चषक स्पर्धेच्या तिसऱया फेरीसाठी थेट प्रवेश मिळणार आहे.  गेल्या 8 ऑक्टोबर रोजी भारताचा सामना कतारविरुद्ध भुवनेश्वरमध्ये होणार होता. पण कोरोना महामारीमुळे तो लांबणीवर टाकला गेला. एएफसीने जारी केलेल्या निवेदनानुसार गट अ मधील पात्रतेचे सामने चीनमध्ये घेतले जातील, यात सिरीया, फिलिपिन्स, मालदिव, गुआम यांचा समावेश आहे. गट ब मधील सामने कुवैतमध्ये घेतले जाणार असून त्यात ऑस्ट्रेलिया, जॉर्डन, नेपाळ, चिनी तैपेई यांचा समावेश आहे. याशिवाय गट क मधील सामने बहरिनमध्ये, गट ड मधील सामने सौदी अरेबियामध्ये, गट ग मधील सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये, गट ह मधील सामने दक्षिण कोरियात होणार आहेत. या गटात तुर्कमेनिस्तान, लेबनॉन, उत्तर कोरिया, लंका यांचा समावेश आहे.

Related Stories

यजमान इंग्लंडचा डाव 204 धावांत खुर्दा

Patil_p

हॉकी स्पर्धा लांबणीवर

Patil_p

कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका; फोर्टिस रुग्णालयात दाखल

datta jadhav

हरभजन सिंग सर्व क्रिकेटमधून निवृत्त

Patil_p

आजपासून पुन्हा रंगणार ‘रात्रीस खेळ चाले’!

Patil_p

झुंजार पंत, लढवय्या गिल…कांगारुंची बत्ती गुल!

Patil_p
error: Content is protected !!