Tarun Bharat

भारताच्या सर्व सीमा पूर्णतः सुरक्षित

मन की बात’ मध्ये पंतप्रधान मोदींचे ठाम प्रतिपादन : कोरोना, अर्थव्यवस्थेवरही केले भाष्य

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारताच्या भूमीवर कोणतेही अतिक्रमण झालेले नसून सर्व सीमा पूर्णतः सुरक्षित आहेत, असे स्पष्ट आणि ठाम प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. ते त्यांच्या 66 व्या मन की बात कार्यक्रमात राष्ट्राला उद्देशून बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणात कोरोना आणि अर्थव्यवस्था तसेच आत्मनिर्भरता या मुद्दय़ांवरही भाष्य केले. हुतात्मा सैनिकांच्या शौर्याची त्यांनी प्रशंसा केली.

‘लडाखमध्ये ज्यांनी भारताच्या सीमांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, त्यांना आपल्या शूर सैनिकांनी धडा शिकविला आहे. त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यात आले आहेत. देशाच्या सीमांचे संरक्षण करताना आपले वीस सैनिक धारातीर्थी पडले. त्यांचे हौतात्म्य देश कधीही विसरणार नाही. या सैनिकांनी आपले प्राण अर्पण करून देशाचे संरक्षण केले. देश त्यांचा सदैव ऋणी राहील, अशी प्रशंसा करतानाच त्यांनी देशाचा एक तुकडाही गमावलेला नाही याचा पुनरूच्चार केला.

अनेक आव्हानांचा सामना

देशासमोर आज अनेक आव्हाने आहेत. पुढेही येत राहतील. तथापि, या देशाचा इतिहास असा आहे की, आपण नेहमीच सर्व आव्हानांवर मात केली आहे. आव्हानांच्या मुशीतून आपण नेहमीच तावून सुलाखून बाहेर पडलो आहोत. याहीवेळी असेच होणार अशी शाश्वती आपल्याला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मित्रत्व आणि प्रत्युत्तर

भारत मित्रत्व कसे निभवावे, हे उत्तररित्या जाणतो. मात्र कोणी आपल्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला कठोर प्रत्युत्तरही देतो. भारतमातेकडे वक्रदृष्टीने पाहणाऱयांना आपल्या शूर सैनिकांनी चांगलीच चपराक लगावली. आपल्या मातृभूमीला कोणतीही हानी पोहचविली जाऊ शकणार नाही, हीच दक्षता आपल्या सैनिकांनी नेहमी घेतली आहे, अशी भलावण त्यांनी केली.

स्थलांतरितांनी दाखविला मार्ग

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लक्षावधी स्थलांतरीत कामगारांना आपल्या मूळ राज्यांमध्ये परतावे लागले. मात्र त्यांनी परतल्यानंतर जी कामे हाती घेतली आहेत, ती पाहता त्यांनी आपल्यासमोर एक आदर्श घालून दिलेला आहे, असे दिसते. कल्याणी नदीला तिचे नैसर्गिक रूप प्राप्त करून देण्याचे कार्य त्यांनी केले. निसर्गाचे संतुलन पुन्हा प्रस्थापित करण्याच्या दिशेने ते काम करीत आहेत. राज्य सरकारेही त्यांना सहाय्य करीत आहेत, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

काँगेसच्या आक्षेपांना चोख उत्तर

लडाखमध्ये नेमके काय झाले आहे, हे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट सांगावे, असे आवाहन काँगेस नेते राहुल गांधी यांनी मन की बात आधी काही वेळ केले होते.  लडाखमध्ये एक इंचही भूमी गमावलेली नाही, याचा पुनरूच्चार करून त्यांनी काँगेसच्या आक्षेपांना चोख प्रत्युत्तर दिले, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

अधिक दक्षता घ्या…

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लॉकडाऊन करावा लागला. पण आता अर्थव्यवस्था गतीमान करण्यासाठी तो टप्प्याटप्प्याने उठविण्यात येत आहे. शिथिलतेचा दुसरा टप्पा आता सुरू होत आहे. मात्र, सारे काही आलबेल आहे असे समजू नका. कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे मुखावरण (मास्क) उपयोगात आणणे, सामाजिक अंतर राखणे व शारिरिक स्वच्छता ही पथ्ये आपल्याला पाळावीच लागणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुरजेवालांची टीका

काँगेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. पंतप्रधानांनी एकदाही चीनचे नाव का घेतले नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. मात्र काँगेसनेदेखील एकदाही चीनचा निषेध केलेला नाही, याचे कारण त्यांनी स्पष्ट केले नाही. सरकार माहिती लपवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Related Stories

उत्साही जीवनासाठी कौशल्य आवश्यक

Patil_p

लडाखमधील सर्वात उंच मोटरेबल रोडची गिनीज बुकमध्ये नोंद

datta jadhav

बाबरी मशीद पुन्हा उभारण्याच्या मागणीसाठी JNU मध्ये आंदोलन

Archana Banage

सुमीतून सर्व भारतीय विद्यार्थी बाहेर

Patil_p

जेईई, नीट परीक्षांच्या तारखांबाबत उद्या घोषणा

Tousif Mujawar

मास्क लावूनच घराबाहेर पडा

Patil_p
error: Content is protected !!