ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
भारतात कोरोनाचा कहर सुरू असून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी चिंता व्यक्त केली आहे. भारतात सध्या कोरोनामुळे बिकट अवस्था आहे. मात्र, पुढील काळात याहून वाईट स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असे भाकित पिचाई यांनी केले आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कोरोनाबाबत भारताला इशारा दिला आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकट काळात भारताला अधिकाधिक खरी आणि वस्तूनिष्ट माहीती देण्याचा प्रयत्न गुगल कंपनी करणार आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन भारतातील स्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असेही पिचाई यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी माहिती तंत्रज्ञान कंपनी गुगलने भारतासाठी १३५ कोटींच्या मदतीची घोषणा केली होती. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी ही घोषणा करताना दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. तसेच सध्याच्या स्थितीत देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला असताना याबद्दल अधिक गांभिर्य व्यक्त करणारे भाष्य गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी केले आहे.

