Tarun Bharat

भारताने मागील पराभव विसरण्याची आवश्यकता

ऑस्ट्रेलियन स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथचे प्रतिपादन

ऍडलेड / वृत्तसंस्था

भारतीय संघ या आठवडय़ाअखेरीस खेळवल्या जाणाऱया दुसऱया कसोटी सामन्यात मुसंडी मारण्यासाठी कोणती रणनीती रचणार आहे, याचा विचार करण्यासाठी स्टीव्ह स्मिथकडे उसंत नसेल. पण, त्याने पाहुण्या संघाला ‘मागील पराभव विसरा व ताज्या दमाने पुन्हा मैदानात उतरा’, असा मंत्र दिला आहे. उभय संघातील 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचा पहिल्या लढतीत दारुण पराभव झाला, त्या पार्श्वभूमीवर स्टीव्ह स्मिथ बोलत होता.

मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स व जोश हॅझलवूड यांनी ऍडलेडमधील त्या सामन्यात भारताचा दुसरा डाव अवघ्या 36 धावांमध्येच गारद करण्याचा जोरदार पराक्रम गाजवला. भारतीय संघाची ही निचांकी धावसंख्याही ठरली. ऑस्ट्रेलियाने तो सामना पुढे 8 गडी राखून जिंकला आणि आता दि. 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळवल्या जाणाऱया कसोटीत दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने भिडणार आहेत.

‘आमचे गोलंदाज प्रथमच एकत्रित भेदक मारा करण्यात यशस्वी ठरले. जवळपास पाच वर्षांच्या अंतराने आमची गोलंदाजी इतकी भेदक ठरली. त्यांनी ज्या बिनचूक टप्प्यावर जो नियंत्रित मारा केला, त्याला तोड नव्हती’, असे स्मिथ पुढे म्हणाला. इतक्या दारुण पराभवानंतर भारतीय खेळाडूंची मनस्थिती कशी असेल, या प्रश्नावर त्याने सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘प्रत्येक बाबीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन स्वतंत्र असतो. अर्थात, एक बाब निश्चित होती की, हा सामना त्यांनी गमावला. माझ्या मते, असे अपयश मागे टाकून पाऊल पुढे टाकणे अधिक महत्त्वाचे. यात प्रत्येक खेळाडूने आपल्याला आपला खेळ कसा उंचावता येईल, यावर भर द्यायला हवा’, असे स्मिथने नमूद केले.

भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतग्रस्त असल्याने भारतासाठी हा मोठा धक्का ठरला तर कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेवर जात असल्याने उर्वरित 3 कसोटीत उपलब्ध असणार नाही. त्यामुळे, भारतासाठी अर्थातच आव्हान अधिक कडवे असेल. पण, स्मिथला मात्र याचा फारसा विचार करण्याची आवश्यकता भासत नाही.

रणनीतीवर लक्ष केंद्रित

‘भारतीय संघाबद्दल मी विचार करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी कशी मुसंडी मारायची, हा त्यांचा प्रश्न आहे. मी फक्त आम्ही ठरवलेली रणनीती कशी अमलात आणता येईल, यावर लक्ष केंद्रित करु इच्छितो’, असे त्याने नमूद केले. शमी खेळणार नसला तरी भारताकडे नवदीप सैनी व मोहम्मद सिराज यांच्यासारखे  अव्वल गोलंदाज आहेत, याचा स्मिथने येथे उल्लेख केला. ‘सैनी व सिराज हे अव्वल दर्जाचे गोलंदाज आहेत आणि कसोटी क्रिकेटमध्ये ते उत्तम योगदान देऊ शकतात. अर्थात, इशांत शर्माची उणीव भारताला प्रकर्षाने जाणवत आहे आणि अनुभवाच्या निकषावर त्यांचे हे खूप मोठे नुकसान आहे’, असेही तो म्हणाला.

यापूर्वी, ऍडलेड कसोटी सामन्यात अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या एका अप्रतिम चेंडूवर बाद झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथने आपण त्यापासून चांगला धडा शिकला असल्याचे स्पष्ट केले. ‘जे फिरकीपटू चेंडू अधिक उसळवतात किंवा हवेतून स्विंग करतात, त्यांना खेळणे साधारणपणे कठीण असते. पण, प्रत्येक गोलंदाजावर वर्चस्व गाजवण्यासाठी प्रत्येक फलंदाज स्वतः आपली रणनीती आखत असतो. एमसीजीवर माझी खेळी हमखास बहरते आणि त्याचीच आणखी एकदा पुनरावृत्ती करण्याचा माझा प्रयत्न असेल’, असा निर्धार त्याने येथे व्यक्त केला.

भारतीय कर्णधार विराट कोहली मायदेशी रवाना

The Captain of the Indian Cricket Team, Virat Kohli and noted actor Anushka Sharma calls on the Prime Minister, Shri Narendra Modi, in New Delhi on December 20, 2017.

ऍडलेड : आपल्या पहिल्या अपत्याच्या स्वागतासाठी भारतीय कर्णधार विराट कोहली मंगळवारी ऑस्ट्रेलियातून भारताकडे रवाना झाला. त्याच्या गैरहजेरीत उर्वरित 3 कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा अजिंक्य रहाणेकडे असणार आहे. विराट-अनुष्का जोडीला जानेवारीत पहिले अपत्यरत्न अपेक्षित आहे.

ऍडलेडमधून भारताकडे प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी विराट कोहलीने सर्व संघसहकाऱयांशी संवाद साधला आणि त्यांना उर्वरित मालिकेसाठी शुभेच्छा देखील दिल्या. 4 कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघ सध्या 0-1 फरकाने पिछाडीवर आहे. विराट मायदेशी परतल्यानंतर अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व असेल, हे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वीच निश्चित झाले होते.

विराट कोहली 2014 पासून भारतीय क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत असून मंगळवारी त्याने मायदेशी रवाना होण्यापूर्वी सर्व सहकाऱयांकडून आक्रमक खेळाची आपल्याला अपेक्षा असल्याचे नमूद केले. एकीकडे, कोहली भारताकडे रवाना होत असताना मर्यादित षटकातील उपकर्णधार रोहित शर्मा सिडनीमध्ये क्वारन्टाईन कालावधी पूर्ण करत आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात कोहलीच भारताचा सर्वोत्तम फलंदाज ठरला. त्याने अजिंक्य रहाणेशी समन्वयात गोंधळ उडाल्यानंतर धावचीत होण्यापूर्वी 74 धावांची खेळी साकारली होती.

Related Stories

खरशियाचा रुबलेव्ह उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

उपांत्य फेरीच्या दिशेने लिव्हरपूलची आगेकूच

Patil_p

रूबलेव्ह-कोरिक यांच्यात अंतिम लढत

Patil_p

विंडीज निवड समिती प्रमुखपदी हेन्स

Patil_p

कोन्टाची दोन स्पर्धांतून माघार

Patil_p

इंग्लिश संघात रुटकडेच शतक झळकावण्याची क्षमता

Amit Kulkarni