Tarun Bharat

भारतासह देशोदेशी अनोखा ‘गृह’योग

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामूहिक योगाविष्काराला फाटा : निरोगी व निरामय जीवनाचा संदेश

नवी दिल्ली, पुणे / वृत्तसंस्था

कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा भारतासह जगभर ‘डिजिटल पद्धती’ने योगदिन साजरा करण्यात आला. देशोदेशी घरात राहूनच अनोखा ‘गृह’योग साकारत निरोगी व निरामय जीवनाचा संदेश देण्यात आला. योगेन चित्तस्य पदेन वाचां वा ओंकार बिंदू संयुक्तम्… या योगमंत्रांसह व आसन, प्राणायामांच्या सादरीकरणातून कठीण समयातही योगदिन संस्मरणीय करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही योग साकारला. शरीरमनाच्या तुंदुरुस्तीसाठी योगाशिवाय पर्याय नाही, असा संदेश त्यांनी देशवासियांना दिला. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, श्रीपाद नाईक यांच्यासह अनेक मंत्री व नेत्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत घरी योगाभ्यास केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आपल्या घरीच योगसाधना केली. हरिद्वार येथील रामदेवबाबा यांच्या योगाश्रमातही योगदिन साजरा करण्यात आला. निरोगी जीवनासाठी नियमितपणे योगाचरण हवे. कोरोनाचा धोका कमी करण्यासाठीदेखील योग गरजेचा आहे, असे रामदेव बाबा यांनी सांगितले.

क्वारंटाईन सेंटरमध्येही योगाचे धडे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी अनेकांना क्वारंटाईनही करण्यात आले आहे. यातील क्वारंटाईन सेंटरमध्येही रविवारी योग व प्राणायामाचे धडे देण्यात आले.

ऑनलाईन योग

दरवर्षी शाळांमध्ये योगदिन उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा मात्र अनेक शाळा बंद असल्याने शिक्षकांकडून मुलांना ऑनलाईन योगाचे धडे देण्यात आले. अनेक विद्यार्थी या ऑनलाईन योगात सहभागी झाले. याअंतर्गत सूर्यनमस्कार, भुजंगासन, वज्रासन, सर्वांगासन अशी अनेक आसने मुलांनी साकारली.

भारतीय जवानांची चित्तथरारक योगसाधना

लडाख येथे 18 हजार 800 फुटांवर उणे तापमानात इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाच्या भारतीय जवानांनी योगासने केली. वज्रासनासह विविध आसने या वेळी सादर करण्यात आली. उत्तराखंड येथेही भारतीय जवानांनी हिमालयाच्या कुशीत व धबधब्याच्या साक्षीने योगसाधना करण्यात आली. श्रीनगरमध्येही जवानांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. तर अरुणाचल प्रदेश येथील ऍनिमल ट्रेनिंग स्कूल येथे श्वान व अश्वांसोबत जवानांकडून योगाभ्यास करण्यात आला. भारत पाकिस्तान आणि भारत बांग्लादेशच्या सीमेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलानेही योगदिनी सुरक्षायोग साकारला. बीएसएफचे जवळपास अडीच लाख अधिकारी व जवानांनी योगाचे धडे घेतले असून, पाच हजार जवान योगाचार्य बनले आहेत.

अमरावतीत जलयोग

खासदार नवनीत राणा यांनीही पती रवी राणा व सहकाऱयांसोबत योगसाधना केली. अमरावती प्रवीण आखरे यांनी पाण्यावर योगाचे अनेक प्रकार सादर केले. ते पोलीस दलात ते काम करीअ असून, त्यांनी पद्मासन, मत्स्यासनासह विविध प्रकारांची प्रात्यक्षिके दाखवली.

सेलिब्रिटीही ‘योग’रूप

 सेलिब्रिटी मंडळीही यात मागे राहिली नाहीत. अनेक कलाकार, खेळाडू यांनी घरच्या घरी योगाभ्यास करीत आपले फोटो शेअर केले. अभिनेत्री शिल्पा शेट्टी नियमित योगसाधना करते. आजचा दिवसही तिने खास पद्धतीने साजरा केला. भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकर, मुलगी सारा, मुलगा अर्जुन या सर्वांनी मिळून योगासने केली.

जगाच्या कानाकोपऱयासही घुमला आवाज

 याखेरीज जगाच्या कानाकोपऱयासह योग व ओंकाराचा नाद रविवारी घुमला. शरीर व मनाच्या स्वास्थ्याचा जागर घडवित अनेकांनी आपापल्या पद्धतीने योगसाधना केली. कोरोना संकटातील ही साधना अनेकांना नवी ऊर्जा देऊन गेली.

कोरोनाला हरविण्यासाठी योग आवश्यक : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगदिनानिमित्त देशाला संदेश दिला. ते म्हणाले, कोरोना विषाणू हा मुख्यत्वे आपल्या श्वसनसंस्थेवर हल्ला करतो. श्वसनसंस्था सक्षम करण्यासाठी योग हा सर्वोत्तम उपाय आहे. यासाठी अनुलोम विलोम वा असंख्य प्राणायामाचे प्रकार आहे. तसेच योगासनांचे विविध प्रकारही माणसाची प्रतिकारशक्ती वाढवतात. शिवाय योगामुळे मानसिक शांतीही लाभते. कोरोनाला हरविण्यासाठी योग आवश्यकच आहे. घरात योग, कुटंबासोबत योग, ही थिम मध्यवर्ती ठेऊन आजच्या दिवशी सर्वांनी अनोख्या पद्धतीने योगदिन साजरा केला. जगभरात ‘माय लाईन, माय योगा,’ या संकल्पनेची व्याप्ती वाढत असून, कोविड संकटामुळे जगाने योग गांभीर्याने घेतला आहे. ही निश्चितच चांगली गोष्ट आहे, अशा भावना पंतप्रधानांनी व्यक्त केल्या.

Related Stories

अंतर्गत सुरक्षेवर चर्चेची अधीर चौधरींकडून मागणी

Patil_p

अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा कट उधळला, 2 दहशतवाद्यांना अटक

datta jadhav

श्रद्धा हत्या एक दुर्घटना!

Patil_p

कोव्हॅक्सिनला येत्या 24 तासांमध्ये मान्यता शक्य

Patil_p

राम मंदिर प्रकरणी केजरीवालांच्या पक्षात फूट

Patil_p

लष्कराकडून 62,500 बुलेटप्रूफ जॅकेटसाठी तातडीची निविदा

datta jadhav