Tarun Bharat

भारतासह 30 देशांना कोरोना विषाणू संसर्गाचा सर्वाधिक धोका

वृत्तसंस्था/ बीजिंग

चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जीव गमाविणाऱयांची संख्या 130 वर पोहोचली आहे. चीनमधून फैलावलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेल्या 30 देशांमध्ये भारत सामील आहे.  इंडिगो कंपनीने 1 ते 20 फेब्रुवारी या कालावधीतील दिल्ली आणि बेंगळूरहून चीन येथे जाणारी विमानोड्डाणे रद्द केली आहेत. ब्रिटिश एअरवेजनेही चीनला जाणारी सर्व उड्डाणे रोखली आहेत.

ब्रिटनच्या साउथहॅम्पटन विद्यापीठाने चीनमधून अन्य देशांमध्ये जाणाऱया प्रवाशांच्या अध्ययनाच्या आधारावर अहवाल तयार केला आहे. अहवालानुसार विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका थायलंडला आहे. यादीत जपान दुसऱया तर हाँगकाँग तिसऱया स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 10 व्या, ब्रिटन 17 व्या क्रमांकावर आहे. यादीत भारताचा क्रमांक 23 वा आहे.

टोयोटा या जपानच्या कार निर्माता कंपनीने चीनमधील स्वतःचे प्रकल्प 9 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवले आहेत. सरकारचा निर्देश आणि सुटय़ा भागांच्या पुरवठय़ाची स्थिती पाहता चीनमधील प्रकल्प बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 10 फेब्रुवारी रोजी या निर्णयाचा आढावा घेतला जाणार असल्याचे टोयोटाने म्हटले आहे. कोरोना विषाणूमुळे ऍपल कंपनीने स्वतःच्या कर्मचाऱयांच्या चीन दौऱयावर बंदी घातली आहे. कंपनीने वुहानजीक काम करणाऱया स्वतःच्या कर्मचाऱयांना केयरकिट पुरविले आहे. कंपनीच्या काही शाखा 10 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

ऑलिम्पिक पात्रता फेरी चुकली

चीनमधील प्रख्यात महिला फुटबॉलपटू वॉन्ग शुआंग समवेत 4 खेळाडू पुढील आठवडय़ात हेणाऱया टोकियो ऑलिम्पिक फुटबॉल पात्रता फेरीच्या सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नसल्याचे चीनच्या फुटबॉल असोसिएशनने बुधवारी जाहीर केले आहे. पात्रता फेरीचे सामने ऑस्ट्रेलियात होणार आहे. वॉन्ग ही वुहानची रहिवासी असून तेथेच कोरोना विषाणूचे सर्वात मोठे संकट निर्माण झाले आहे. वुहानमधील याओ वेई, ल्येऊ युएयुन आणि झेझियांग येथील ली मेंगवेन या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.

पाकिस्तानच्या 4 विद्यार्थ्यांना लागण

वुहानमध्ये शिक्षण घेत असलेल्या 4 विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे पाकिस्तान सरकारने सांगितले आहे. वुहानमध्ये सुमारे 500 पाकिस्तानी विद्यार्थी शिकत आहेत. पूर्ण चीनमध्ये 28 हजार पाकिस्तानी विद्यार्थी आहेत.

16 देशांमध्ये आढळले रुग्ण

संयुक्त अरब अमिरातमध्ये बुधवारी कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. जगातील सुमारे 16 देशांमध्ये याचे रुग्ण सापडले आहेत. बुधवारी सकाळपर्यंत थायलंडमध्ये 14, हाँगकाँगमध्ये 8, तैवानमध्ये 8, जपान-सिंगापूर-मकाऊ आणि मलेशियात प्रत्येकी 7, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत प्रत्येकी 5, दक्षिण कोरिया-फ्रान्स आणि जर्मनीत प्रत्येकी 4, कॅनडा आणि व्हिएतनाममध्ये प्रत्येकी 2, कंबोडिया आणि नेपाळमध्ये प्रत्येकी एका रुग्णाची पुष्टी मिळाली आहे.

Related Stories

डाळभात नव्हे भिंतींचा चुना खाते महिला

Amit Kulkarni

तीव्र हिमवादळानंतर न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी

Patil_p

न्यूझीलंडमध्ये भरतात हिंदी शाळा

Patil_p

उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन ठणठणीत

datta jadhav

मलेशियाशी वाद : इडली-डोसाचे दर वाढणार

Patil_p

तालिबानचा खरा चेहरा झाला उघड

Patil_p
error: Content is protected !!