4 हवाई जहाजांचा समावेश, भारतीय नौदल प्रमुखांच्या उपस्थितीत सोहळा


प्रतिनिधी /वास्को
भारतीय नौदलाचे एअर स्कॉड्रन (आयएनएएस) 316 मंगळवारी आयएनएस हंस तळावर कार्यान्वीत करण्यात आले. पी 8 आय श्रेणीतील चार विमाने या स्क्वॉड्रनमध्ये दाखल करण्यात आलेली असून दाबोळीतील आयएनएस हंस तळावर भारतीय नौदलाचे प्रमुख ऍडमिरल आर. हरीकुमार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी पश्चिम नौदल विभागाचे कमांडिग इन चिफ ध्वजाधिकारी व्हाईस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंग, गोवा नौदल विभागाचे ध्वजाधिकारी रिअर ऍडमिरल फिलीपोस जी पायनुमुटील, व्हाईस ऍडमिरल रवनीत सिंग, ऍडमिरल अरूण प्रकाश, ऍडमिरल करमबीर सिंग व नौदलाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भारतीय नौदलामध्ये यापूर्वी अशा प्रकारची 8 विमाने 2013 साली समाविष्ठ करण्यात आली होती. त्यांचा तळ तामीळनाडूमध्ये आहे. आता कार्यान्वीत झालेल्या आयएनएएस 316 या स्क्वॉड्रनकडून ही विमाने हाताळण्यात येत असून त्यात नवीन चार विमानांची भर पडलेली आहे. नवीन पी 8 आय श्रेणीतील चार विमानांचा तळ आयएनएस हंस हाच असणार आहे. डिसेंबर 2021 पासूनच ती आयएनएस हंस तळावर तैनात आहेत. लांब पल्ल्याची ही विमाने बहुउध्देशीय कर्तव्य बजावत असून सागरी टेहाळणी आणि पाणीबुडीविरोधी लढाईसाठी ती सक्षम आहेत. शोध आणि बचाव कार्यातही या विमानांचा वापर होत असतो. भारतीय नौदलाच्या 316 हवाई स्क्वॉड्रनचे नेतृत्व कमांडर अनिल मोहापात्रा करीत आहेत. या पथकाचे दी कॉन्डोर्स असे नामकरण ऍडमिरल आर हरीकुमार यांनी जाहीर केले आहे. कोनडोर हा अथांग सागरावर भरारी घेऊन आपली तीष्ण नजर ठेवणारा पक्षी आहे.
भारतीय नौदलाच्या आयएनएएस 316 स्क्वॉड्रनमुळे सागरी सुरक्षा क्षमतेत वाढ होईल – ऍडमिरल आर. हरीकुमार
नौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरीकुमार यांनी यावेळी बोलताना आयएनएएस 316 मुळे भारतीय नौदलाने पुन्हा एकदा भारतीय सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात मैलाचा दगड पार केलेला असल्याचे सांगितले. या क्वॉड्रनची कार्यक्षमता सध्याच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची कामगीरी बजावेल. नौदलाची क्षमता वाढेल असा विश्वास व्यक्त केला. पी 8 आय हवाई पथक भारतीय महासागरी क्षेत्रात भारतीय नौदल सर्वांसाठी उपयुक्त सहकारी असून भारतीय नौदल परीणामकारक आणि महत्वपूर्ण भुमीका बजावण्यासाठी सक्षम असल्याचे याव्दारे स्पष्ट होते व तसेच भारतीय नौदलाने आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तारही करायला हवा अशी गरज स्पष्ट होत असल्याचे ऍडमिरल हरीकुमार म्हणाले. भारतीय नौदल हे कर्तव्य बजावण्यासाठी वचनबध्द असल्याचेही ते म्हणाले. यावेळी नौदल प्रमुखांनी या स्क्वॉड्रनने सागरी सुरक्षेबरोबरच विदेशांना केलेले सहकार्य, विदेशी नौदलांशी संयुक्त कवायतींमध्ये घेतलेला सहभाग तसेच विविध नैसर्गीक आपत्ती आणि कोविड काळातही बजावलेल्या महत्वपूर्ण कामगीरीची माहिती दिली.