Tarun Bharat

भारतीय बॉक्सिंग फेडरेशनला महामारीची चिंता

Advertisements

दुबईतील स्पर्धेसाठी बॉक्सर्सना न पाठविण्याच्या विचारात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतात कोरोनाच्या उद्रेकाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारतीय बॉक्सिंग फेडरेशनची चिंता वाढली असून या महिन्यात होणाऱया आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना दुबईला पाठवायचे की नाही, असा त्यांच्यासमोर पेच पडला आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी भारताचे एकूण 9 बॉक्सर्स पात्र ठरले असून दुबईतील स्पर्धा 21 मेपासून सुरू होणार आहे.

ऑलिम्पिक कोटा मिळविलेल्या सिमरनजित कैर (महिला, 60 किलो), व आशिष कुमार (पुरुष, 75 किलो) हे दोन बॉक्सर अलीकडेच कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. ते सध्या त्यातून बरे होण्याच्या मार्गावर आहेत. सिमरनजितचा 15 दिवसांचा क्वारन्टाईन कालावधी दुबईतील स्पर्धेच्या एक आठवडा आधी संपणार असल्याने ती या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही, हे बीएफआयने याआधीच स्पष्ट केले आहे तर आशिष कुमारच्या सहभागाचीही शक्यता कमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आम्ही बॉक्सर्सना या स्पर्धेसाठी पाठवणार नाही. कारण स्पर्धेपेक्षा त्यांचे आरोग्य जास्त मोलाचे आहे,’ असे बीएफआयमधील एका वरिष्ठ पदाधिकाऱयाने सांगितले.

‘प्रशिक्षकांनीही बॉक्सर्सवर दबाव आणू नये. कारण आशियाई चॅम्पियनशिपवेळी एखादा बॉक्सर पॉझिटिव्ह झाला तर त्याला आणखी 15 ते 20 दिवस ट्रेनिंगपासून दूर रहावे लागेल. ऑलिम्पिकच्या आधी असे होणे परवडणारे नाही,’ या मतावर या पदाधिकाऱयाने जोर दिला.

गेल्या मार्चमध्ये भारतीय संघाने स्पेन व तुर्की येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धांत भाग घेतला होता. या स्पर्धेवेळी प्रमुख बॉक्सर पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना ट्रेंनिगपासून मुकावे लागले होते. याशिवाय पतियाळा व नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय शिबिरातही अनेक बॉक्सर्समध्ये कोव्हिड 19 ची लक्षणे आढळून आली होती. कोरोना व्हायरसच्या बाधेतून नुकताच बरा झालेला असूनही आशिष कुमारला (75 किलो) लगेचच रशियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची परवानगी देण्यात आली होती. सर्व बॉक्सर्सच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले असल्याचे बीएफआयचे टीम डॉक्टर करणजित सिंग यांनी सांगितले. ‘रशियातील स्पर्धेत खेळण्याइतका आशिष आरोग्यपूर्ण होता, म्हणून त्याला तेथे पाठविण्यात आले होते,’ असे सिंग यांनी स्पष्ट केले.

अमित पांघलचा अपवाद वगळता अन्य सात बॉक्सर्सचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले होते. फक्त पांघलने कांस्यपदक मिळविले होते. रशियातील स्पर्धेतून भारतीय खेळाडूंना तयारीची चांगली संधी मिळाली, असे भारताचे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर सांतियागो नीव्हा म्हणाले. आपल्या खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले, पण अजूनही सुधारणा करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

क्रिकेटर हरभजन सिंह – गीता बसराच्या घरी पाहुण्याचे आगमन

Rohan_P

पाकचा दक्षिण आफ्रिकेवर मालिका विजय

Patil_p

दुखापतीमुळे हॅलेपची स्पर्धेतून माघार

Amit Kulkarni

सिमॉन बाईल्सची फ्लोअरमधूनही माघार

Patil_p

सॅमसोनोव्हा अंतिम फेरीत

Patil_p

मँचेस्टरच्या विजयात रोनाल्डोचा हंगामातील 8 वा गोल

Patil_p
error: Content is protected !!