Tarun Bharat

भारतीय महिला क्रिकेट संघाचा पराभव

वृत्तसंस्था/ लखनौ

शनिवारी येथे झालेल्या महिलांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने यजमान भारताचा 8 गडय़ांनी पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या ऍनेक बॉशने अष्टपैलू कामगिरीचे दर्शन घडविताना गोलंदाजीत 2 बळी तर फलंदाजीत 48 चेंडूत नाबाद 66 धावा झोडपल्या.

दक्षिण आफ्रिकन महिलांनी भारताविरूद्धची वनडे मालिका 4-1 अशा फरकाने जिंकल्यानंतर आता टी-20 मालिकेसाठी आपले वर्चस्व ठेवले आहे. या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 20 षटकांत 6 बाद 130 धावा जमविल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 19.1 षटकांत 2 बाद 133 धावा जमवित हा सामना 5 चेंडू बाकी ठेवून जिंकला. या सामन्यात भारतीय महिलांना शेवटच्या पाच षटकांत केवळ 26 धावा जमविता आल्या.

भारतीय संघाच्या डावात सलामीच्या हरलीन देवलने पहिले अर्धशतक पदार्पणात झळकविले. 22 वर्षीय देवलने 47 चेंडूत 6 चौकारांसह 52 धावा झळकविल्या. देवलने रॉड्रिग्जसमवेत तिसऱया गडय़ासाठी 60 धावांची भागिदारी केली. रॉड्रिग्जने 30 धावा जमविल्या. स्मृती मानधनाने 11 धावा केल्या. ती डावातील दुसऱया षटकात बाद झाली. शेफाली वर्माने 22 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 23 धावा जमविल्या. कर्णधार कौरने मेल्बाच्या पहिल्या षटकांत 2 चौकार मारले पण दुसऱया षटकांत ती बाद झाली. 10 षटकाअखेर भारताने 2 बाद 59 धावा जमविल्या होत्या. देवलने आपले अर्धशतक 44 चेंडूत झळकविले. डावातील 18 व्या षटकांत शेफाली आणि रॉड्रिग्ज पाठोपाठ बाद झाल्या. भारताचे क्षेत्ररक्षण दर्जेदार न झाल्याने त्यांना या सामन्यात पराभव पत्करावा लागला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेने 19.1 षटकांत 2 बाद 133 धावा जमविल्या. अष्टपैलू ऍनेक बॉशने कर्णधार लुससमवेत दुसऱया गडय़ासाठी 90 धावांची भागिदारी केली. बॉशने 48 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 66 धावा झळकविल्या. लुसने 49 चेंडूत 43 तर सलामीच्या लिझेली ली ने 8 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या 10 षटकांत विजयासाठी 68 धावांची जरूरी होती तर शेवटच्या पाच षटकांत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 33 धावांची गरज होती. दरम्यान लुसला गायकवाडकडून जीवदान मिळाले. शेवटच्या दोन षटकांत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 14 धावांची गरज होती. बॉशने विजयी चौकार ठोकून आपल्या संघाला पाच चेंडू बाकी ठेवून विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक

भारत 20 षटकांत 6 बाद 130 (हरलिन देवल 52, रॉड्रिग्ज 30, मंदाना 11, शेफाली वर्मा 23, बॉश्च 2-11), दक्षिण आफ्रिका 19.1 षटकांत 2 बाद 133 ( बॉश्च नाबाद 66, लुस 43, अरूधंती रेड्डी 1-20, देवल 1-21).

Related Stories

बेलग्रेडच्या पाच फुटबॉलपटूंना कोरोनाची बाधा

Patil_p

भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी आजपासून

Patil_p

रात्रीची एफ-वन मोटार शर्यत लास व्हेगासमध्ये

Amit Kulkarni

सीएबीच्या अध्यक्षपदासाठी गांगुलीचे प्रयत्न

Amit Kulkarni

नेदरलँडस्चा भारतावर एकतर्फी विजय

Patil_p

‘द हंड्रेड’मध्ये भारतीय खेळाडूंना संधी?

Amit Kulkarni