निर्भया प्रकरणावर आधारित ‘दिल्ली क्राइम’ने पटकाविला पुरस्कार
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
48 व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळय़ात नेटफ्लिक्सची वेब सीरिज ‘दिल्ली क्राइम’ची गुन्हय़ांवर आधारित सर्वोत्कृष्ट ड्राम सीरिज म्हणून निवड झाली आहे. भारताकडून एमी पुरस्कार जिंकणारी ही पहिली वेब सीरिज ठरली आहे. 2012 मध्ये दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणावर आधारित या सीरिजचे दिग्दर्शन रीची मेहता यांनी केले होते. यातील पोलीस उपायुक्ताची मुख्य भूमिका अभिनेत्री शेफाली शाह यांनी साकारली होती.


यंदाच्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये भारतीय कलाकृतींना तीन शेणींमध्ये नामांकने मिळाली होती. दिल्ली क्राइमसह मेड इन हेवनमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱया अर्जुन माथुर यांना सर्वोत्तम अभिनेत्याच्या शेणीत नामांकन प्राप्त झाले हेत. परंतु हा पुरस्कार युकेची टीव्ही सीरिज रिस्पॉन्सिबल चाइल्डचा अभिनेता बिली बॅरेट यांना मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट विनोदी सीरिजच्या शेणीत भारतातून फोर मोर शॉट्स प्लीजला नामांकन मिळाले होते. पण हा पुरस्कार ब्राझीलियन विनोदी सीरिज ‘नो-बॉडी लुकिंग’ने (निन्गुएम ता ओल्हान्दो) पटकाविला आहे.
ऑनलाईन सोहळा
कोरोना महामारीमुळे पहिल्यांदाच इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्सची दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली आहे. 23 नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्क शहरातील हॅमरस्टीन बॉलरुममधून थेट प्रक्षेपित या पुरस्कार सोहळय़ाचे सूत्रसंचालन रिचर्ड काइंड यांनी केले आहे. टीव्ही आणि वेब क्षेत्रातील कार्यक्रम आणि कलाकारांना सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार 1973 पासून दरवर्षी नोव्हेंबरमध्ये जाहीर होत असतो.