Tarun Bharat

भारत-इंग्लंड महिला संघात आज लढत

मागील सामन्यातील फॉर्म कायम राखण्याचे मिताली अँड कंपनीचे लक्ष्य

माऊंट माऊंगनुई / वृत्तसंस्था

आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत विंडीजविरुद्ध विजयामुळे मनोबल उंचावलेला भारतीय महिला संघ आज (बुधवार दि. 16) झगडणाऱया इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरेल, त्यावेळी कामगिरीत सातत्य राखणे, हेच त्यांचे मुख्य लक्ष्य असणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सकाळी 6.30 वाजता या लढतीला सुरुवात होईल.

यापूर्वी, विंडीजविरुद्ध 155 धावांनी एकतर्फी विजय संपादन केल्यानंतर भारतीय महिला संघ विजयाच्या ट्रकवर परतला. त्या धमाकेदार विजयानंतर भारतीय संघाने गुणतालिकेत टॉप-4 मध्ये जबरदस्त एन्ट्री केली आणि आजच्या लढतीच्या माध्यमातून आघाडीतील स्थान आणखी भक्कम करण्याचा भारताचा आज प्रयत्न असेल.

भारताला या स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध यश हाती आले नाही. उलटपक्षी, 162 चेंडू निर्धाव खेळून काढल्याने त्यांना टीका झेलावी लागली. पण, नंतर विंडीजविरुद्ध स्मृती मानधना (119 चेंडूत 123) व हरमनप्रीत कौर (107 चेंडूत 109) यांनी आक्रमक शतके झळकावल्यानंतर भारताने विश्वचषक इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा (8-317) विक्रम नोंदवला आणि संघ खऱया अर्थाने यशश्रीच्या ट्रकवर परतला. आता तोच धडाका त्यांनी इंग्लिश महिला संघाविरुद्ध देखील कायम राखण्याची अपेक्षा असणार आहे.

स्मृती मानधना व यास्तिका भाटिया या दोन्ही सलामीवीरांनी यापूर्वी प्रारंभापासून आक्रमकतेवर भर दिला असून प्रशिक्षक रमेश पोवार यांना हीच बाब मुख्यत्वेकरुन अपेक्षित होती. मानधनाने 123 धावांची बहारदार खेळी साकारली तर हरमनप्रीतने 2017 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 171 धावांच्या खेळीनंतर पहिलेच व एकूण चौथे शतक झळकावले. या दोन्ही दिग्गज फलंदाज मागील फॉर्म येथेही कायम राखण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करुन असतील.

अष्टपैलू दीप्ती शर्माला आघाडीवर बढती मिळत आली असून तिच्यासमवेत कर्णधार मिताली राजने देखील खेळ उंचावण्याची अपेक्षा असेल. युवा खेळाडू रिचा घोषने यष्टीमागे उत्तम कामगिरी केली असली तरी फलंदाजीत मात्र ती दडपणाखाली ढेपाळत असल्याचे चित्र आहे. या 18 वर्षीय खेळाडूला न्यूझीलंडविरुद्ध मागील महिन्यातील फॉर्मची पुनरावृत्ती करणे क्रमप्राप्त असणार आहे.

स्नेह राणा व पूजा वस्त्रकार यांच्यासारखे अव्वल अष्टपैलू भारतीय संघाकडे असून या दोन्ही खेळाडूंनी यापूर्वीच खराब फॉर्मवर मात करण्याचे कसब दाखवले आहे. गोलंदाजीत भारताला फारशी चिंता नाही. पेसर्स मेघना सिंग, पूजा वस्त्रकार व झुलन गोस्वामी उत्तम कामगिरी साकारत असून फिरकीपटूंमध्ये राजेश्वरी गायकवाड (7) स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱया गोलंदाजांमध्ये तिसऱया स्थानी आहे. स्नेह राणाने आतापर्यंत 5 गडी बाद केले आहेत. स्पर्धेत सर्वोत्तम इकॉनॉमीच्या निकषावर राजेश्वरी गायकवाड (3.36) व स्नेह राणा (3.44) अनुक्रमे तिसऱया व चौथ्या स्थानी विराजमान आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

भारत ः मिताली राज (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, रिचा घोष (यष्टीरक्षक), तानिया भाटिया (यष्टीरक्षक), स्नेह राणा, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, झुलन गोस्वामी, रेणुका सिंग.

इंग्लंड ः हिदर नाईट (कर्णधार), टॅमी ब्युमाँट, कॅथरिन ब्रन्ट, प्रेया डेव्हिस, चार्ली डीन, सोफिया डंकली, केट क्रॉस, सोफी इक्लेस्टोन, फॅरन्ट, ऍमी जोन्स, इम्मा लॅम्ब, नॅट स्कीव्हर, अन्या श्रबसोल, लॉरेन विनफिल्ड-हिल, डॅनी वॅट.

सामन्याची वेळ ः सकाळी 6.30 वा.

कोट्स

आपली मजबूत बाजू कोणती आहे आणि कमकुवत बाजू काय आहे, यावर विचारमंथन करण्याऐवजी मागील लढतीतील बहारदार फॉर्म येथे कायम राखला तरी सहज विजय संपादन करता येईल. सध्या संघाचा प्राधान्यक्रम हाच असणे आवश्यक आहे.

-भारतीय उपकर्णधार हरमनप्रीत कौर

विद्यमान विजेत्या इंग्लिश संघासमोर आव्हानांचा डोंगर

जागतिक क्रिकेटमधील अव्वल संघांमध्ये गणला जाणारा इंग्लंडचा महिला संघ यंदा मात्र बराच झगडत असल्याचे चित्र आहे. हिदर नाईटच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या या संघाला यंदा पहिल्या तिन्ही सामन्यात धक्कादायक पराभव पत्करावे लागले आहेत. या निराशाजनक कामगिरीमुळे ते गुणतालिकेत सातव्या स्थानी फेकले गेले असून अर्थातच, स्पर्धेतील त्यांचे आव्हान धोक्यात आले आहे. इंग्लंडला अटीतटीच्या लढतीत अंतिमतः निराशा पदरी आली असून याचा त्यांना अधिक फटका बसत आला आहे.

आज भारताविरुद्ध पराभव पत्करला तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आणखी बळावेल. त्यामुळे, त्यांना अधिक दक्ष रहावे लागेल. खराब क्षेत्ररक्षण ही इंग्लंडची मुख्य डोकेदुखी ठरत आली असून यावर त्यांना मुख्य लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. इंग्लंडसाठी सलामी फलंदाज ब्युमाँट हीच एकमेव स्टार परफॉर्मर ठरली असून फिरकीपटू सोफी इक्लेस्टोन व अष्टपैलू नॅट स्किव्हर यांनी आतापर्यंत प्रत्येकी 4 बळी नोंदवले आहेत.

आयसीसी महिला वनडे विश्वचषक गुणतालिका

संघ / सामने / विजय / पराभव / गुण / धाव सरासरी

ऑस्ट्रेलिया / 4 / 4 / 0 / 8 / 1.744

द. आफ्रिका / 3 / 3 / 0 / 6 / 0.280

भारत / 3 / 2 / 1 / 4 / 1.333

न्यूझीलंड / 4 / 2 / 2 / 4 / -0.257

विंडीज / 4 / 2 / 2 / 4 / -1.233

बांगलादेश / 3 / 1 / 2 / 2 / -0.477

इंग्लंड / 3 / 0 / 3 / 0 / -0.156

पाकिस्तान / 4 / 0 / 4 / 0 / -0.995.

Related Stories

जमैकाची इलेन थॉम्पसन 200 मीटर्समधील विजेती

Patil_p

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा बंदिस्त स्टेडियममध्ये होणार

Patil_p

शेवटच्या सामन्यात लंकन महिला विजयी

Patil_p

बोरुसिया माँचेनग्लाडबाचचा मोठा विजय

Patil_p

भारताची पाकवर 2 गोलांच्या फरकाने मात

Patil_p

गोकाक ग्लॅडिएटर्स, एक्सेस इलाईट संघांची विजयी सलामी

Omkar B