Tarun Bharat

भारत ऐतिहासिक विजयाच्या उंबरठय़ावर

मेलबर्नमधील दुसरी कसोटी, तिसरा दिवस : यजमान ऑस्ट्रेलियाची दुसऱया डावात दाणादाण

मेलबर्न / वृत्तसंस्था

गोलंदाजांच्या भेदक माऱयाच्या बळावर भारताने यजमान ऑस्ट्रेलियाला पराभवाच्या खिंडीत पकडले असून आता केवळ चमत्कारच त्यांना वाचवू शकतो, हे सुस्पष्ट आहे. भारताने 326 धावा रचत पहिल्या डावाअखेर 131 धावांची भरभक्कम आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाची दुसऱया डावात 6 बाद 133 अशी दाणादाण उडाली. सध्या यजमान संघ 4 गडी हाताशी असताना नाममात्र 2 धावांनी आघाडीवर आहे.

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या या लढतीत भारताने मालिकेत बरोबरी साधण्याच्या दिशेने महत्त्वाकांक्षी पाऊल टाकले आहे. हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेने मात्र, अद्याप हा सामना संपलेला नाही, आम्हाला आणखी 4 फलंदाज बाद करायचे आहेत, अशी सावध प्रतिक्रिया दिली.

यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावाअखेर 131 धावांची पिछाडी घेऊन डावाला सुरुवात केली खरी. पण, जो बर्न्स (4) उमेश यादवच्या गोलंदाजीवर स्वस्तात बाद झाला. शिवाय, त्याने एक रिव्हय़ूही वाया घालवला. लवकर आक्रमणाला आणल्या गेलेल्या रविचंद्रन अश्विनने मार्नस लाबुशानेचा (49 चेंडूत 28) भक्कम बचाव भेदत पुन्हा एकदा आपला दर्जा अधोरेखित केला. अश्विनचा चेंडू बचावात्मक खेळण्याचा लाबुशानेचा पवित्रा होता. पण, चेंडूने बॅटची कड घेतली आणि रहाणेने पहिल्या स्लीपवर सोपा झेल घेत लाबुशानेची खेळी संपुष्टात आणली.

मॅथ्यू वेड व स्टीव्ह स्मिथ यांनी चहापानापर्यंत किल्ला जरुर लढवला. पण, त्यावेळीही यजमान संघ 66 धावांनी पिछाडीवर होता. अर्थात, दिवसातील तिसऱया व शेवटच्या सत्रात ऑस्ट्रेलियाला 68 धावा जमवताना 4 फलंदाज गमवावे लागले आणि इथेच त्यांची मोठी पिछेहाट झाली.

स्मिथ पुन्हा अपयशी

स्टीव्ह स्मिथचा खराब फॉर्म येथेही कायम राहिला. अर्थात, त्याचा त्रिफळा उडवणारा बुमराहचा चेंडू विशेष लक्षवेधी ठरला. बुमराहच्या (1-34) लेगस्टम्पच्या रोखाने येणाऱया चेंडूवर स्मिथचा अंदाज चुकला आणि बेल्स कधी पडली, हे त्यालाही कळाले नाही. ऑस्ट्रेलियन फलंदाजात सर्वोत्तम भासणाऱया मॅथ्यू वेडला रवींद्र जडेजाने (2-25) बाद केले आणि ऑस्ट्रेलियाची 4 बाद 98 अशी पडझड झाली. याच धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाने ट्रव्हिस हेडच्या रुपाने आणखी एक फलंदाज गमावला. जडेजाच्या गोलंदाजीवर टीम पेन बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी आणखी वाढली. अश्विनच्या गोलंदाजीवर पंतने कमिन्सचा झेल घेतला असता तर ऑस्ट्रेलियाचा सातवा गडीही बाद झाला असता. अर्थात, उमेश यादव दुखापतीमुळे बाहेर गेल्याने भारतासाठी ही चिंतेची बाब ठरली.

वैयक्तिक चौथे षटक टाकताना उमेशला वेदना जाणवू लागल्या आणि बीसीसीआय वैद्यकीय पथकाने तपासणी केल्यानंतर त्याला स्कॅनिंगसाठी नेण्याचा निर्णय घेतला गेला.

रहाणे-जडेजाची जिगरबाज झुंज

तत्पूर्वी, हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेचे अव्वल दर्जाचे शतक व रवींद्र जडेजाच्या 15 व्या अर्धशतकामुळे भारताने उत्तम वर्चस्व गाजवले. या उभयतांनी 6 व्या गडय़ासाठी 123 धावांची भागीदारी साकारली. रहाणे नंतर जडेजाच्या चुकीच्या कॉलमुळे धावचीत झाला. रहाणे कसोटी क्रिकेटमध्ये धावचीत होण्याची ही पहिलीच वेळ होती. त्याने 223 चेंडूत 12 चौकारांसह 112 धावांचे योगदान दिले.

जडेजाने तलवारबाजीच्या थाटात साजरे केलेले अर्धशतक लक्षवेधी ठरले. पण, त्याला उसळते चेंडू टाकून फटकेबाजीच्या मोहात टाकण्याची ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची रणनीती उत्तम फळली आणि जडेजा 57 धावांवर डीप मिडविकेटकडे झेल देत बाद झाला. ऑस्ट्रेलियातर्फे लियॉनने 72 धावात 3, स्टार्कने 78 धावात 3 तर कमिन्सने 80 धावात 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

धावफलक

ऑस्ट्रेलिया पहिला डाव : सर्वबाद 195

भारत पहिला डाव : मयांक अगरवाल पायचीत गो. स्टार्क 0 (6 चेंडू), शुभमन गिल झे. पेन, गो. कमिन्स 45 (65 चेंडूत 8 चौकार), चेतेश्वर पुजारा झे. पेन, गो. कमिन्स 17 (70 चेंडूत 1 चौकार), अजिंक्य रहाणे धावचीत (लाबुशाने-पेन) 112 (223 चेंडूत 12 चौकार), हनुमा विहारी झे. स्मिथ, गो. लियॉन 21 (66 चेंडूत 2 चौकार), ऋषभ पंत झे. पेन, गो. स्टार्क 29 (40 चेंडूत 3 चौकार), रवींद्र जडेजा झे. कमिन्स, गो. स्टार्क 57 (159 चेंडूत 3 चौकार), रविचंद्रन अश्विन झे. लियॉन, गो. हॅझलवूड 14 (42 चेंडू), उमेश यादव झे. स्मिथ, गो. लियॉन 9 (19 चेंडूत 1 चौकार), जसप्रित बुमराह झे. हेड, गो. लियॉन 0 (1 चेंडू), मोहम्मद सिराज नाबाद 0 (2 चेंडू). अवांतर 22. एकूण 115.1 षटकात सर्वबाद 326.

गडी बाद होण्याचा क्रम

1-0 (मयांक, 0.6), 2-61 (शुभमन, 21.6), 3-64 (पुजारा, 23.4), 4-166 (विहारी, 44.4), 5-173 (पंत, 59.1), 6-294 (रहाणे, 99.5), 7-306 (जडेजा, 106.5), 8-325 (उमेश यादव, 113.6), 9-325 (अश्विन, 114.4), 10-326 (बुमराह, 115.1).

गोलंदाजी

मिशेल स्टार्क 26-5-78-3, पॅट कमिन्स 27-9-80-2, जोश हॅझलवूड 23-6-47-1, नॅथन लियॉन 27.1-4-72-3, कॅमेरुन ग्रीन 12-1-31-0.

ऑस्ट्रेलिया दुसरा डाव : मॅथ्यू वेड पायचीत गो. जडेजा 40 (137 चेंडूत 3 चौकार), जो बर्न्स झे. पंत, गो. यादव 4 (10 चेंडू), मार्नस लाबुशाने झे. रहाणे, गो. अश्विन 28 (49 चेंडूत 1 चौकार), स्टीव्ह स्मिथ त्रि. गो. बुमराह 8 (30 चेंडू), ट्रव्हिस हेड झे. अगरवाल, गो. सिराज 17 (46 चेंडू), कॅमेरुन ग्रीन खेळत आहे 17 (65 चेंडूत 2 चौकार), टीम पेन झे. पंत, गो. जडेजा 1 (9 चेंडू), पॅट कमिन्स खेळत आहे 15 (53 चेंडूत 1 चौकार). अवांतर 3. एकूण 66 षटकात 6 बाद 133.

गडी बाद होण्याचा क्रम

1-4 (बर्न्स, 3.1), 2-42 (लाबुशाने, 17.5), 3-71 (स्मिथ, 32.2), 4-98 (वेड, 43.6), 5-98 (हेड, 46.1), 6-99 (पेन, 47.4).

गोलंदाजी

बुमराह 17-4-34-1, उमेश यादव 3.3-0-5-1, सिराज 12.3-1-23-1, अश्विन 23-4-46-1, रवींद्र जडेजा 10-3-25-2.

तिसऱया पंचांच्या निर्णयावर टीम पेन नाराज

रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर यष्टीमागे झेलबाद दिले गेल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन बराच नाराज दिसून आला. प्रारंभी, मैदानी पंच पॉल रिफेल यांनी पेन बाद नसल्याचा निर्वाळा दिला होता. पण, भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने लगोलग डीआरएस घेतला आणि स्निकोमीटरमध्ये चेंडूने बॅटची कड घेतल्याचे निदर्शनास आले. मात्र हॉटस्पॉटमध्ये तसे काही दिसून आले नाही. टीम पेनचा सहकारी मॅथ्यू वेडने या निर्णयावर टीका करत चेतेश्वर पुजाराला याच पद्धतीने बाद असतानाही बाद दिले गेले नव्हते, याकडे लक्ष वेधले.

आयसीसीने डीआरएसमध्ये अम्पायर्स कॉलचा फेरविचार करावा : सचिन

डीसिजन रिव्हय़ू सिस्टीममध्ये आयसीसीने अंपायर्स कॉलचा फेरविचार करावा, अशी सूचना सचिन तेंडुलकरने केली. तिसऱया दिवसाच्या खेळात भारताला या निर्णयाचा काही प्रमाणात फटका बसला, त्या पार्श्वभूमीवर सचिन बोलत होता. जर फलंदाज पायचीत असल्याचे अपील असेल तर अंपायर्स कॉल अमलात आणले जाते. या नियमाप्रमाणे चेंडू यष्टीच्या रोखाने असल्याचे निदर्शनास येत असेल, मात्र, मैदानी पंचांनी फलंदाजाला नाबाद ठरवले असेल तर टीव्ही पंचांना तो फलंदाज बाद असल्याचा निर्णय देता येत नाही. यात फक्त गोलंदाजी करणाऱया संघाचा रिव्हय़ू वाया जात नाही, तो कायम ठेवला जातो, इतकीज तजवीज आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज बर्न्स व लाबुशाने हे चेंडू बेल्सवर आदळत असल्याचे दिसून येत असतानाही अंपायर्स कॉल नियमामुळे बचावले होते. त्यावर सचिनचा आक्षेप आहे.

‘डीआरएस परिपूर्ण आहे, असे अजिबात आढळून येत नाही. जर चेंडू बेल्सच्या रोखाने जात असेल आणि बेल्सवर आदळणार, हे दिसत असेल तर अशा परिस्थितीत चेंडूचा किती भाग उदाहरणार्थ 10 टक्के किंवा 15 टक्के किंवा 70 टक्के यष्टीला वा बेल्सला लागतो, हे गौण आहे. तूर्तास, सध्या जर या तंत्रज्ञानासह पुढे जायचे ठरवले गेले असेल तर आपल्याला ते स्वीकारावे लागेल. मात्र, हे तंत्र 100 टक्के बिनचूक असावे, यासाठी पुढाकार घेतला जाणे आवश्यक आहे. मैदानी पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतला गेल्यानंतर आणि फलंदाज बाद असल्याचे दिसून येत असले तरी टीव्ही पंच तो निर्णय बदलू शकत नसतील तर या पद्धतीचा निश्चितपणाने विचार व्हायला हवा’, असे सचिन स्पष्टीकरणार्थ म्हणाला.

वर्षभरापूर्वी ऑस्ट्रेलियन माजी फिरकीपटू शेन वॉर्नने देखील अंपायर्स कॉलवर टीका केली होती. जर चेंडू यष्टीवर आदळत असेल तर फलंदाज एकाच वेळी बाद व नाबाद असू शकत नाही, असे त्यावेळी वॉर्न म्हणाला होता.

Related Stories

फ्रान्सच्या एकतर्फी विजयात एम्बापेचे विक्रमी 4 गोल

Patil_p

गोल्फपटू अदिती अशोक ब्रिटिश ओपनसाठी पात्र

Amit Kulkarni

कोलकात्याविरुद्ध लखनौचे पारडे जड

datta jadhav

कॅनडा डेव्हिस चषकाचा पहिल्यांदाच मानकरी

Patil_p

प्लेऑफ स्थान निश्चित करण्यास दिल्ली कॅपिटल्स उत्सुक

Patil_p

निर्बंध टाळण्यासाठी एमसी मेरी कोम इटलीला रवाना होणार

Patil_p