Tarun Bharat

भारत-ऑस्ट्रेलिया हॉकी कसोटी आज

वृत्तसंस्था/ ऍडले

आगामी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेपूर्वी भारतीय पुरुष हॉकी संघाची चाचणी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या हॉकी कसोटी मालिकेत होणार आहे. शनिवारी येथे यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात पहिला हॉकी कसोटी सामना खेळविला जाईल. सकाळी 11 वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 1 एसडी व एचडी, तसेच हॉटस्टारवर केले जाईल.

बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिल्यांदाच या मालिकेत गाठ पडत आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 7-0 असा दणदणीत पराभव केला होता. बलाढय़ ऑस्टेलियन संघाचे आव्हान भारतीय संघाला नेहमीच कठीण जात असते. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या मानांकनात भारत सध्या पाचव्या स्थानावर आहे. भारतीय हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाचे ग्रॅहम रिड यांचे मार्गदर्शन लाभत आहे. रिड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय हॉकी पुरुष संघाने गेल्या वषी झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक मिळविले होते. भारतीय हॉकी संघाने अलीकडेच न्यूझीलंडवर दोन सामन्यात विजय मिळविला तर भुवनेश्वरमध्ये झालेल्या प्रो लीग हॉकी लढतीत भारताने स्पेनवर एका सामन्यात विजय मिळविला तर एक सामना गमावला. हॉकी मानांकनात स्पेन आणि न्यूझीलंड हे अनुक्रमे आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत.

सदर हॉकी मालिका ऑस्ट्रेलियामध्ये होत असल्याने साहजिकच त्याचा लाभ यजमान संघाला मिळेल. भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रित सिंगकडे सोपविण्यात आले आहे. आगामी विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाने आतापासूनच आपल्या सरावावर अधिक भर दिला आहे. सदर स्पर्धा भारतातील भुवनेश्वर आणि रुरकेला येथे खेळविली जाणार आहे. विश्वचषक हॉकी स्पर्धेला आता 50 दिवस बाकी राहिले आहेत. मध्यंतरी कोरोना समस्येमुळे भारतीय हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाबरोबर खेळता आले नव्हते. ऑस्ट्रेलियन हॉकी संघाला कॉलिन बॅच यांचे मार्गदर्शन लाभत आहे. पाच सामन्यांच्या या हॉकी कसोटी मालिकेतील दुसरा सामना 27 तर तिसरा सामना 30 नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतर 3 आणि 4 डिसेंबरला या मालिकेतील शेवटचे दोन सामने खेळविले जातील. ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व झेलेव्हेस्की आणि ओकेनडेन हे संयुक्तपणे करीत आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेल्या ऑस्ट्रेलियन हॉकी संघातील सात खेळाडूंचा या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात समावेश आहे. मात्र, या मालिकेतील पहिल्या दोन कसोटीसाठी गोलरक्षक चार्टर उपलब्ध होऊ शकणार नाही.

भारतीय संघ- हरमनप्रित सिंग (कर्णधार), अमित रोहिदास, कृष्णन बहाद्दूर पाठक, पी. श्रीजेश, जर्मनप्रित सिंग, सुरेंद्र कुमार, जुगराज सिंग, मनदीप मोर, निलम संजीव झेस, वरुण कुमार, सुमित, मनप्रित सिंग, हार्दिक सिंग, समशेर सिंग, निलकांता शर्मा, राजकुमार पाल, मोहम्मद राहिल मुसेन, आकाशदीप सिंग, गुर्जंत सिंग, मनदीप सिंग, अभिषेक, दिलप्रित सिंग आणि सुखजित सिंग.

Related Stories

राष्ट्रीय बॅडमिंटन निवड चाचणीतून सायनासह अनेकांची माघार

Patil_p

द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारताचे पहिले सराव सत्र संपन्न

Patil_p

पृथ्वी शॉचे कसोटी संघात पुनरागमन

Patil_p

डिमिट्रोव्ह, मिलमन, ओपेल्का विजयी

Patil_p

एएफसीच्या कोरोना मोहिमेत बाला देवीचा समावेश

Patil_p

लाहिरीला पदक जिंकण्यासाठी चमत्काराची प्रतीक्षा

Patil_p