Tarun Bharat

भारत-न्यूझीलंड पहिली टी-20 लढत उद्या

पुढील वर्ल्डकपच्या तयारीस प्रारंभ : कर्णधार हार्दिक, युवा संघाचा न्यूझीलंडविरुद्ध कस लागणार, वेलिंग्टनमध्ये यजमानांचे पारडे जड

वृत्तसंस्था /वेलिंग्टन

2024 मध्ये होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीची सुरुवात न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेने होत असून स्पर्धेच्या कालावधीपर्यंत अनेक खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करून दाखविण्याची संधी मिळणार आहे, असे मत भारताच्या टी-20 संघाचा हंगामी कर्णधार हार्दिक पंडय़ाने व्यक्त केले. उद्या शुक्रवारपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला येथे सुरुवात होत आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता सामन्याला सुरुवात होत असून त्याचे प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवरून केले जाणार आहे. याशिवाय अमेझॉन प्राईम व्हिडिओवर लाईव्ह स्ट्रीमिंग होईल.

ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. विश्वचषकातील या अपयशावर संघाने लवकरात लवकर मात करणे आवश्यक आहे. विश्वचषकात आमची निराशा झाली, हे खरंय. पण आम्ही व्यावसायिक खेळाडू असल्याने आम्हाला अपयशावर मात करणे आवश्यक आहे. यशाला जसे सामेरे जातो, तसे अपयशालाही सामोरे जात पुढे चालले पाहिजे. त्यातूनच आम्हाला आमच्या चुका सुधारता येऊ शकतात,’ असे हार्दिक पत्रकारांशी बोलताना म्हणाला.

पुढील टी-20 विश्वचषक स्पर्धा 2024 मध्ये वेस्ट इंडीज व अमेरिकेत होणार असून पुढील दोन वर्षात भारतीय संघात मोठे संक्रमण होण्याची अपेक्षा केली जात आहे. विराट कोहली, रोहित शर्मा यासारख्या वयस्कर खेळाडूंना हळूहळू संघाबाहेर ठेवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे. ‘पुढील विश्वचषकासाठी दोन वर्षाचा अवधी असून नव्या प्रतिभावंताचा शोध घेण्यासाठी आमच्याकडे भरपूर वेळ आहे. या कालावधीत बरेच क्रिकेट खेळले जाणार असून अनेकांना आपली योग्यता सिद्ध करण्याची संधीही मिळणार आहे. या प्रक्रियेची सुरुवात आता झाली असून त्या पार्श्वभूमीवर खेळाडूंशी संवाद साधला जाणार आहे. पण सध्या आम्हाला या मालिकेत खेळण्याचा आनंद लुटायचा असून भविष्याबाबत नंतर चर्चा केली जाईल,’ असेही हार्दिक म्हणाला.

व्हाईटबॉल क्रिकेट मालिकेत प्रथम तीन टी-20 सामने होतील, त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका होईल. या मालिकांतून कोहली, रोहित, केएल राहुल, यष्टिरक्षक दिनेश कार्तिक, ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यांना वर्कलोड मॅनेजमेंटसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या गैरहजेरीत शुबमन गिल, उमरान मलिक, इशान किशन, संजू सॅमसन यासारख्यांना संधी देण्यात आली असून पुढील योजनांच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरणार असल्याचे कर्णधार हार्दिक म्हणतो. ‘प्रमुख खेळाडू संघात नाहीत. पण ज्यांना संधी दिली आहे, तेही सुमारे दीड ते दोन वर्षापासून खेळत आहेत. त्यांना बऱयापैकी संधी मिळाली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी आपली क्षमता दाखवून दिलेली आहे. नवा संच, नवी ताकद व रोमांचकता असल्याने आम्ही या मालिकेसाठी उत्सुक झालो आहोत,’ असेही हार्दिक म्हणाला.

प्रत्येक मालिका ही महत्त्वाचीच असते. पुढील वर्षी वनडे वर्ल्ड कप आहे. पण तो वेगळा प्रकार आहे. येथे चांगली कामगिरी करून संघात स्थान मिळविण्यासाठी दावा करण्याची ही चांगली संधी असल्याचेही तो म्हणाला.

मायकेल वॉनच्या टीकेला प्रत्युत्तर

विश्वचषकातील निष्प्रभ कामगिरीनंतर इंग्लंडच्या मायकेल वॉनने स्तंभलेखनात भारतावर बरीच टीका केली होती. 2011 मधील विश्वचषक जिंकल्यानंतर भारताने काहीच कमवले नसल्याची टीका त्याने केली. त्यावर बोलताना हार्दिक म्हणाला की, ‘आम्ही कोणाला काही सिद्ध करून दाखविण्याची गरज नाही. तुम्ही जेव्हा खराब प्रदर्शन करता, तेव्हा प्रत्येकजण आपापले मत व्यक्त करतो. आम्ही त्यांचा आदर करतो. प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात, याची आम्हाला जाणीव आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही खेळत आहोत आणि खेळामध्ये सुधारणा होण्यासाठी प्रयत्नांची गरज असते. ते प्रामाणिकपणे करीत राहिल्यास यश आपोआपच मिळत जाईल. आमच्यात काही सुधारणा करण्याची गरज आहे आणि तेच करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय,’ असेही तो म्हणाला. बुधवारी भारतीय खेळाडूंनी वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्हवर सुमारे तीन तास सराव केला.

भारतीय संघात अनेक सुपरस्टार्स : विल्यम्सन

भारतीय संघ बराच काळा बिझी होता. प्रत्येक जण सर्व गोष्टी करू शकत नाही, हे साहजिकच आहे. या संघाच्या डेप्थची मला जाणीव आहे. त्यातील बऱयाच खेळाडूंना मी जवळून पाहिले असून त्यांच्याकडे अनेक सुपरस्टार्स आहेत, असे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन म्हणाला. बोल्ट हा आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. पण तो लवकरच संघातून खेळताना दिसेल. भविष्याचा विचार करून कारकिर्दीमध्ये काही निर्णय घ्यावे लागतात, बोल्टला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय हा त्याचाच एक भाग आहे, असे त्याने स्पष्ट केले.

Related Stories

फॉर्म इंग्लंडच्या तर इतिहास पाकच्या बाजूने

Patil_p

इंग्लंडचा लंकेवर मालिकाविजय

Patil_p

डेव्हिस चषक स्पर्धेत भारताची लढत नॉर्वेशी

Patil_p

टेनिसपटू सानिया मिर्झाकडून निवृत्तीचा बेत जाहीर

Patil_p

एटीपी फायनल्ससाठी मेदवेदेव्ह पात्र

Patil_p

महाराष्ट्राने दिल्लीला 191 धावांवर रोखले

Omkar B