दुबई / वृत्तसंस्था
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत ‘स्ट्रीट-स्मार्ट’ न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ उभा ठाकेल, त्यावेळी स्पर्धेतील अस्तित्व राखण्याचा प्रश्न असल्याने कर्णधार या नात्याने विराट कोहलीसाठी नेतृत्वाच्या कारकिर्दीतील ही खरीखुरी ऍसिड टेस्ट असणार आहे. भारत व न्यूझीलंड या दोन्ही देशांनी आपल्या पहिल्या लढतीत पराभव पत्करला असल्याने उभयतांसमोर येथे कोणत्याही परिस्थितीत विजय खेचून आणण्याचे आव्हान असेल. ही महत्त्वाची लढत आज (रविवार दि. 31) भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाणार आहे.


मागील रविवारी कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध धक्कादायक पराभव पत्करावा लागल्याने एकीकडे, त्या पराभवाच्या कटू स्मृती विसरण्याचे संघासमोर आव्हान असेल आणि दुसरीकडे, येथे न्यूझीलंडसारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्याचे आव्हान मोडीत काढण्याचे लक्ष्यही समोर असणार आहे. टीम साऊदी व ट्रेंट बोल्ट बडय़ा लढतीत भारतासाठी नेहमी कर्दनकाळ ठरत आले आहेत, त्यामुळे देखील भारताला या आघाडीवर दक्ष रहावे लागणार आहे.
केन विल्यम्सन मागील लढतीत उत्तम खेळला असला तरी अद्याप तो 100 टक्के तंदुरुस्त नाही. शिवाय, मार्टिन गप्टील देखील पायाच्या दुखापतीने त्रस्त आहे. या धर्तीवर डेव्हॉन कॉनव्हेवर त्यांची अधिक मदार असणार आहे.
पूर्ण तंदुरुस्त नसलेला हार्दिक पंडय़ा आणि खराब फॉर्ममधील भुवनेश्वर कुमार सध्या भारतीय संघातील कच्चे दुवे ठरत आहेत. कारकिर्दीच्या प्रारंभी धडाकेबाज, अष्टपैलू खेळी साकारणाऱया हार्दिक पंडय़ाला पाठीवरील शस्त्रक्रियेनंतर मात्र त्याची कारकीर्द वाचवण्यावरच पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागत आहे. सध्या नेटमध्ये गोलंदाजीच्या सरावाची त्याची धडपड याच दिशेने सुरु आहे. आयपीएल प्रँचायझी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंडय़ाला संघात कायम ठेवणार नसल्याचे संकेत दिले असून यामुळे वस्तुस्थिती काय आहे, याचे चित्र काही अंशी समोर आले आहे.
भुवनेश्वरसाठी शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा?
मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारसाठी ही कदाचित शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा ठरु शकते. मागील 2 हंगामात त्याचा गोलंदाजीचा वेग कमालीचा घसरला असून त्या तुलनेत त्याचा युवा प्रतिस्पर्धी दीपक चहरने लक्षवेधी मारा साकारत आपली गुणवत्ता अधोरेखित केली आहे.
विराट कोहलीसाठी मात्र खऱया अर्थाने हा कसोटीचा क्षण असेल. येथे संघाला निर्भेळ यश मिळवून दिले नाही तर वनडे क्रिकेटमधील त्याच्या नेतृत्वावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते. विराट फलंदाज या नात्याने वरचष्मा गाजवण्यात सातत्याने यशस्वी झाला आहे, याबाबत दुमत नाही. कर्णधार या नात्याने मात्र त्याला सातत्याने झगडावे लागत आले आहे. सध्या तो 33 वर्षांचा असून आणखी किमान 6 वर्षे टॉप फ्लाईटमध्ये खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. या पार्श्वभूमीवर, त्याने टी-20 नेतृत्वावरुन पायउतार होत फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचे संकेत यापूर्वी दिले आहेत.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, रविंद जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह, वरुण चक्रवर्ती, शार्दुल ठाकुर, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, राहुल चहर.
न्यूझीलंड ः केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गुप्टील, डॅरेल मिशेल, डेव्हॉन कॉनव्हे, टीम सेफर्ट (यष्टीरक्षक), जेम्स नीशम, ग्लेन फिलीप्स, मिशेल सॅन्टनर, ईश सोधी, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, मार्क चॅपमन, ऍडम मिल्ने, काईल जेमिसन, टॉड ऍस्ले.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
आजच ठरणार उपांत्य फेरीतील दुसरा संघ?
सध्या उत्तम बहरात असलेल्या पाकिस्तानने गटातील तिन्ही तगडय़ा प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध (भारत, न्यूझीलंड व अफगाण) दमदार विजय संपादन करत 6 गुण मिळवणाऱया पाकिस्तानचे आता नामिबिया व स्कॉटलंडविरुद्ध दोन सामने आहेत. यामुळे, उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे. प्रत्येक गटातून दोनच संघ उपांत्य फेरीत पोहोचणार असल्याने भारत व न्यूझीलंड यांच्यात उर्वरित दुसऱया जागेसाठी रस्सीखेच असेल. त्या दृष्टीने आजची लढत महत्त्वाची असणार आहे. आज जो संघ विजयी होईल, तोच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याची शक्यता अधिक असेल, असे प्रातिनिधिक चित्र आहे.
कोट्स
भारताचा संघ दर्जेदार, अव्वल आहे. आमच्याप्रमाणेच भारतीय संघही पहिल्या लढतीत पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाला असल्याने आजची लढत दोन्ही संघांसाठी अर्थातच महत्त्वाची असेल. पूर्ण ताकद पणाला लावून लढण्याचा आमचा प्रयत्न असेल.
-न्यूझीलंडचा जलद गोलंदाज टीम साऊदी
भारताची फलंदाजी लाईनअप भक्कम आहे. त्यामुळे, प्रारंभी धक्के दिले तरच आम्हाला वर्चस्व गाजवण्याची संधी असेल. पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदीने जो भेदक मारा साकारला, त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा माझा येथे प्रयत्न असेल. गप्टील तंदुरुस्त असेल, अशी आमची अपेक्षा आहे.
-न्यूझीलंडचा डावखुरा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्ट
‘त्या’ कणाहिन ट्रोलिंगचा विराटकडून कडक शब्दात समाचार
या स्पर्धेतील सलामी लढतीत भारताला पाकिस्तानविरुद्ध नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटणे साहजिक होते. मात्र, मोहम्मद शमीवर धर्माच्या मुद्यावरुन सोशल मीडियावर ट्रोल करणे दुर्दैवी होते, असे सांगत भारतीय कर्णधार विराट कोहलीने त्या टीकेचा कडक शब्दात समाचार घेतला.
‘धर्मावरुन एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करणे कीव आणणारे आहे. प्रत्येकाला आपले मत नोंदवण्याचा जरुर अधिकार आहे. परिस्थितीनुसार मतप्रदर्शन करण्यात काहीही गैर नाही. मात्र, धर्माच्या आधारे टीकाटिपणी सर्वथा चुकीची ठरते. ज्यांनी ट्रोलिंग केले, ते खरे लूझर्स आहेत’, याचा विराटने येथे उल्लेख केला.
भारत मागील संघच कायम ठेवणार?
महेंद्रसिंग धोनीने आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्सचे नेतृत्व भूषवताना एखादा पराभव झाला तरी त्यामुळे तातडीने संघात बदल पेलेले नाहीत. आयपीएल जेतेपद मिळवून देण्याचे त्याचे ‘सीएसके टेम्प्लेट’ येथेही कायम ठेवले जाण्याचे संकेत असून पाकिस्तानविरुद्ध मागील भारतीय संघ कायम राखला जाईल, असे संकेत आहेत. मात्र, संघ जैसे थे ठेवल्यास पूर्ण तंदुरुस्त नसलेल्या हार्दिक पंडय़ा व खराब फॉर्ममधील भुवनेश्वरच्या कामगिरीची भारतीय थिंक-टँकला चिंता जाणवू शकते, हा खरा धोका असणार आहे.