Tarun Bharat

भारत-बेल्जियम उपांत्य फेरीत

Advertisements

ऑस्ट्रेलिया, जर्मनीही शेवटच्या चारमध्ये, भारताची बेल्जियमवर मात

वृत्तसंस्था/ टोकियो

भारताने ग्रेट ब्रिटनचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करून ऑलिम्पिकमधील पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत 49 वर्षांनंतर स्थान मिळविले. याशिवाय बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, जर्मनी यांनीही उपांत्य फेरी गाठली आहे.

भारताचे नोंदवलेले तीनही गोल मैदानी होते. दिलप्रीत सिंगने 7 व्या, गुर्जंत सिंगने 16 व्या आणि हार्दिक सिंगने 57 व्या मिनिटाला भारताचे गोल नोंदवले. ग्रेट ब्रिटनचा एकमेव गोल 45 व्या मिनिटाला सॅम वार्डने नोंदवला. भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकीची आठ सुवर्णपदके मिळविली असून 1980 मॉस्को ऑलिम्पिकमध्ये त्यातील शेवटचे सुवर्ण मिळवले होते. मॉस्को ऑलिम्पिकमध्ये केवळ सहा संघांचाच सहभाग असल्याने त्यावेळी उपांत्य फेरी ठेवण्यात आली नव्हती. त्यामुळे 1972 च्या म्युनिच ऑलिम्पिकमध्ये नियमित उपांत्य फेरी गाठण्याची भारताची शेवटची वेळ होती. त्यावेळी उपांत्य फेरीत भारताला पाककडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता भारताची उपांत्य लढत बेल्जियमविरुद्ध मंगळवारी होणार आहे. याच दिवशी ऑस्ट्रेलिया व जर्मनी यांच्यात दुसरी उपांत्य लढत होणार आहे. ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सचा तर जर्मनीने अर्जेन्टिनाचा पराभव केला.

बेल्जियमने स्पेनला 3-1 अशा गोलफरकाने हरवून शेवटच्या चारमध्ये प्रवेश मिळविला. या सामन्यात मध्यंतराला स्पेनने 1-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर तिसऱया सत्रात वर्ल्ड चॅम्पियन्स बेल्जियमने बरोबरीचा गोल नोंदवला. अलेक्झांडर हेन्ड्रिक्सने पेनल्टी कॉर्नरवर हा गोल नोंदवला होता. त्यानंतर त्यात आणखी दोन गोलांची भर घालत बेल्जियमने शेवटच्या चारमधील स्थान निश्चित केले.

नेदरलँड्सला नमवून ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत

ऑस्ट्रेलियाने पुरुष हॉकी गटात नेदरलँड्सला नमवत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या या लढतीत त्यांनी नेदरलँड्सला 3-0 असे नमवत आगेकूच केली. आता जर्मनीविरुद्ध त्यांची उपांत्य लढत होणार आहे.

ऑस्ट्रेलिया-नेदरलँड्स यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीची ही लढत निर्धारित वेळेत 2-2 अशी बरोबरीत राहिली आणि त्यानंतर पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला गेला. निर्धारित वेळेत ऑस्ट्रेलियातर्फे टॉम विकहॅमने दुहेरी गोल केले. मात्र, नेदरलँड्सने मिंक व्हान डर वीर्डेन व जेरॉन हर्त्झबर्गरच्या गोलमुळे बरोबरी प्राप्त केली. ऑस्ट्रेलियाचा संघ आता मंगळवारी जर्मनीविरुद्ध उपांत्य फेरीत लढेल.

अन्य एका उपांत्यपूर्व लढतीत जर्मनीने विद्यमान सुवर्णजेत्या अर्जेन्टिनाला 3-1 असे नमवले होते. जर्मनीतर्फे डिफेंडर ल्युकास विंडफेडरने 19 व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर टिम हर्झब्राचने दुसरा गोल व विंडफेडरने तिसरा गोल केला. अर्जेन्टिनासाठी हा पराभव बराच जिव्हारी लागणारा ठरला. जर्मनीने येथील विजयासह 2016 रिओ ऑलिम्पिक उपांत्य फेरीतील पराभवाचा हिशेब चुकता केला. त्यावेळी अर्जेन्टिनाने जर्मनीचा पराभव केला आणि त्यामुळे जर्मनीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले तर अर्जेन्टिनाने नंतर सुवर्ण जिंकले होते.

Related Stories

सेंट किट्स-नेव्हिसकडे सीपीएल स्पर्धेचे जेतेपद

Amit Kulkarni

भारताची 15 सुवर्णांसह 39 पदकांची कमाई

Patil_p

निखत झरीन उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

स्मृती मानधना वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू

Patil_p

ऑस्ट्रेलियन स्पर्धेसाठी प्रत्येक दिवशी 30 हजार शौकिनांना परवानगी

Patil_p

फुटबॉल सम्राट पेलेच्या विश्वविक्रमाशी छेत्रीची बरोबरी

Patil_p
error: Content is protected !!