Tarun Bharat

भारत ब, भारत अ महिला संघाला कांस्यपदके

Advertisements

खुल्या गटात उझ्बेकिस्तान, महिला गटात युक्रेन यांना सुवर्णपदके

वृत्तसंस्था/ महाबलीपूरम

येथे झालेल्या 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये खुल्या गटात भारत ब संघाने कांस्यपदक मिळविले तर महिला विभागात भारत अ संघानेही तिसरे स्थान मिळविले. भारत ब संघाने शेवटच्या फेरीत जर्मनीचा 3-1 असा पराभव करीत कांस्यपदक निश्चित केले. खुल्या विभागात उझ्बेकिस्तान व महिला विभागात युक्रेन यांनी सुवर्णपदके पटकावली. या स्पर्धेची मंगळवारी सांगता झाली.

खुल्या विभागात उझ्बेकिस्तानने सर्वात आश्चर्यकारक निकाल नोंदवताना शेवटच्या फेरीत नेदरलँड्सवर 2-1 असा विजय मिळवित अर्मेनियासारख्या बलाढय़ संघाला मागे टाकत सुवर्णपदक पटकावले. अर्मेनियाने शेवटच्या फेरीत स्पेनचा 2.5-1.5 असा पराभव करीत दुसरे स्थान मिळविले. उझ्बेकिस्तानच्या जाखोन्गिर वाखिडोव्हने चौथ्या पटावर मिळविलेला विजय त्यांच्यासाठी निर्णायक ठरला. सरस टायब्रेक गुणांकाच्या आधारे त्यांनी अर्मेनियाला मागे टाकत पहिले स्थान मिळविले. उझ्बेक संघ पूर्ण 11 फेऱयांत अपराजित राहत एकूण 19 गुणांची कमाई केली. भारत ब संघाने 18 गुणांसह तिसरे स्थान मिळविले.

भारतासाठी हे ऑलिम्पियाडमधील दुसरे कांस्यपदक आहे. यापूर्वी 2014 मध्येही भारताने कांस्य जिंकले होते. अनुभवी बी. अधिबन 2014 मधील संघाचाही सदस्य होता. त्याने आपल्या पदकांमध्ये आणखी एका पदकाची भर घातली. या स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला युवा खेळाडू डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद, निहाल सरिन व रौनक साधवानी यांच्यासाठी हे पहिलेच पदक आहे.

शेवटच्या फेरीतील पराभवाने महिलांचे सुवर्ण हुकले

भारताच्या महिला अ संघाला या स्पर्धेत अग्रमानांकन मिळाले होते. पण अकराव्या व शेवटच्या फेरीत त्यांना अमेरिकेकडून 1-3 पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांचे सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. कोनेरू हंपीच्या नेतृत्वाखालील या संघाला अखेर तिसऱया (कांस्य) स्थानावर समाधान मानावे लागले. युक्रेनच्या महिला संघाने जॉर्जियाला मागे टाकत सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला. कोनेरू हंपी व आर. वैशाली यांनी अखेरच्या फेरीत अनुक्रमे गुलरुखबा तोखिरजोनोव्हा व इरिना क्रश यांच्याविरुद्धचे डाव अनिर्णीत राखले. तानिया सचदेवला कॅरासा यिपकडून तर भक्ती कुलकर्णीला तातेव्ह अब्राहमयानकडून पराभूत व्हावे लागल्याने भारत अ महिला संघाची सुवर्ण जिंकण्याची संधी हुकली.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंगळवारच्या सांगता समारंभास फिडे अध्यक्ष अर्काडी द्वोरकोविच व नूतन उपाध्यक्ष विश्वनाथन आनंद यांच्यासह माजी क्रिकेट कर्णधार व चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीही उपस्थित राहिला होता. भारतात प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत खुल्या व महिला गटात विक्रमी देशांनी भाग घेतला होता.

शेवटच्या फेरीचे निकाल (फक्त भारताचे निकाल)

खुला गट ः भारत ब वि.वि. जर्मनी 3-1 (डी. गुकेश, आर. प्रज्ञानंदचे सामने अनिर्णीत, निहाल सरिन विवि मथायस ब्ल्यूबॉम, रौनक साधवानी विवि लिव्हियू डायटर निप्सेनू)

भारत अ बरोबरी वि. अमेरिका 2-2 (हरिकृष्ण-कारुआना, विदित गुजराती-वेस्ले सो लढती अनिर्णीत, अर्जुन इरिगेसी विवि लिनियर डॉमिनिगेझ पेरेझ, एसएल नारायणन पराभूत वि. सॅम शँकलँड).

भारत क बरोबरी वि. कझाकस्तान 2-2 (गांगुली पवि जुमाबायेव्ह, सेतुरामन बवि सुलेमेनोव्ह, मुरली कार्तिकेयन विवि उराझायेवह, अभिमन्यू पुराणिक बवि नोगेरबेक).

महिला विभाग ः भारत अ पराभूत वि. अमेरिका 1-3 (हंपी बवि तोखिरजोनोव्हा, वैशाली बवि इरिना क्रश, तानिया सचदेव पवि कॅरिसा यिप, भक्ती कुलकर्णी पवि तातेव्ह अब्राहमयान).

भारत क पराभूत वि. कझाकस्तान 0.5-3.5 (ईशा करवाडे पवि झानसाया अब्दुमलिक, पीव्ही नंदिधा पवि बिबिसारा असॉबायेव्हा, वर्षिनी साहिती  बवि झेनिया बालाबायेव्हा, प्रत्युषा बोडा पवि गुलिसखान नाखबायेव्हा).

भारत ब बरोबरी वि. स्लोव्हाकिया 2-2 (वंतिका अगरवाल बवि सुझाना बोरोसोव्हा, पद्मिनी राऊत पवि इव्हा रेपकोव्हा, मेरी ऍन गोम्स बवि सुझाना हॅगारोव्हा, दिव्या देशमुख विवि स्वेतलाना सुसिकोव्हा).

खुला विभाग ः अर्मेनिया विवि स्पेन 2.5-1.5, उझ्बेकिस्तान विवि नेदरलँड्स 2.5-1.5.

Related Stories

महिला टेनिसपटू मॅडिसन कीज कोरोनाबाधित

Patil_p

किरगॉईस, गॉफ, गार्सिया, बेरेटेनी, रुड उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

भारतीय भालाफेकपटू अन्नू राणीला सातवे स्थान

Patil_p

मल्ल नरसिंग यादव सर्बियातील स्पर्धेसाठी सज्ज

Patil_p

विदेशी संघांचे न्यूझीलंड दौरे निश्चित

Patil_p

न्यूझीलंडचे माजी कसोटीपटू जॉन रीड यांचे निधन

Omkar B
error: Content is protected !!