ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून भारताची आठव्यांदा निवड करण्यात आली आहे. यानुसार भारत 2021-22 पर्यंत संयुक्त राष्ट्र परिषदेचा अस्थायी सदस्य असणार आहे.
अस्थायी सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी किमान 128 मतांची आवश्यकता असते. परंतु 192 पैकी 184 देशांनी भारताला भरभक्कम पाठिंबा दिल्यामुळे भारताची वाट सोपी झाली. भारत याआधी 2011-12 मध्ये या परिषदेचा सदस्य होता.


दरम्यान, भारतासोबतच आयर्लंड, मेक्सिको आणि नॉर्वे या देशांनाही सुरक्षा परिषदेत स्थान मिळालं आहे. भारताची निवड झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टीएस तिरुमुर्ति यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, भारताची 2021-22 या वर्षासाठी संयुक्त राष्ट्राच्या तात्पुरत्या सदस्यपदी निवड झाल्यामुळे मी खुश आहे. आम्हाला सर्वांचं उत्तम समर्थन मिळालं. तसंच संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्यांनी जो विश्वास दाखवला त्याप्रती आदर व्यक्त करतो, असे ही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
भारताच्या निवडीबाबत अमेरिकेकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. याबाबत अमेरिकेने ट्विट करत म्हटले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या विजयाबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. आम्ही आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा प्रश्नांवर एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत.