Tarun Bharat

भाषा कुपोषित झाल्यास तिचे संवर्धन होणे कठीण

प्रा. डॉ. संध्या देशपांडे यांचे प्रतिपादन : लोकमान्य ग्रंथालयाचा वर्धापन दिन-मराठी भाषा दिन साजरा

प्रतिनिधी / बेळगाव

भाषा संपते तेंव्हा संवाद संपतो. संवाद संपला की माणूस संपतो. प्रगत होण्याच्या, सामर्थ्यवान होण्याच्या घाईत आपण आपल्या भाषेचा त्याग केला. परंतु भाषिक व्यवहाराचा संबंध अर्थव्यवहाराशी येतो. दुर्बोध भाषा सुबोध करता येते. पण भाषा कुपोषित झाली तर तिचे संवर्धन कठीण होते. हे लक्षात घेऊन भाषेच्या विलयाचे प्रमाण थांबविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे मत प्रा. डॉ. संध्या देशपांडे यांनी व्यक्त केले.

  लोकमान्य ग्रंथालयाचा वर्धापन दिन  व मराठी भाषा दिन असा संयुक्त कार्यक्रम ग्रंथालयाच्या सानेगुरुजी सभागृहात झाला. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष जगदीश कुंटे व बुलकचे अध्यक्ष निखिल नरगुंदकर होते.

 डॉ. देशपांडे म्हणाल्या, भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी चार निकष लावले जातात. ते म्हणजे त्या भाषेचे दस्तऐवज 1500 वर्षांपूर्वीचे असावेत. त्याची वाङ्मयीन परंपरा स्वतंत्र व स्वयंभू असावी. ती कोणत्याही भाषेचे प्रतिरुप नसावी. प्राचीन व आधुनिक रुप यांचे नाते अबाधित असावेत. या निकषावर मराठी भाषा पूर्ण उतरते. राजा पुलकेशीच्या काळातही मराठी होती. असे असूनही आज मराठी भाषेला अभिजात दर्जा नाही आणि व्यवहारातही ती मागे पडत चालली आहे, हे दुर्दैव आहे. गेल्या आठ वर्षांत 990 मराठी शाळा बंद पडणे, संख्या वाचनाची नवी पद्धत येणे, राज्य मराठी विकास परिषदेचे संचालकपद रिक्त असणे हे त्याहून दुर्दैव होय.

भाषा जपावी लागते

जागतिकीकरणाच्या अर्थव्यवस्थेत माध्यम, समाज, अर्थकारण यावर चर्चा झाली. परंतु भाषांवरती त्याचा काय परिणाम झाला, भाषिक अस्मितेला तडे जातील का?, भाषा निवड करण्याचा अधिकार तिचे उपयोजन याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले. ज्या भाषा कठीण वाटल्या त्या इंग्रजांनी व्यवहारातून नाकारल्या. वास्तविक भाषा जपावी लागते. तिचे संवर्धन करावे लागते. त्यासाठी वेगवेगळ्य़ा लिपी तयार कराव्या लागतात. यामध्ये आपण कमी पडलो, अशी खंत व्यक्त करून डॉ. संध्या देशपांडे म्हणाल्या, 1990 च्या जनगणनेत 9 कोटी 20 लाख लोक मराठी बोलत होते. 2011 च्या जनगणनेत ही संख्या 8 कोटी 28 लाखांवर आली. भारतात प्राथमिक स्तरावर प्रेंच, लॅटीन, ग्रीक, इटालियन या परकीय भाषांना तृतीय भाषा म्हणून मान्यता मिळाली. याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.

अध्यात्माचा विकास न झालेले शिक्षण हे संकुचित शिक्षण असते. शिक्षणाने किती संवार्धता आली हे महत्त्वाचे आहे. भाषेची प्रगती होत नाही तोवर शास्त्राrय व वैज्ञानिक प्रगती होणे अशक्मय आहे. मराठीला काहीही झाले नाही. ही मतलबी हाकाटी आहे. वेळीच पावले उचलली नाहीत तर मराठीचे भवितव्य कठीण आहे. सक्ती केल्याने भाषा टिकत नसते. राजकारण व भाषा यांची फारकतच करायला हवी आणि सकस साहित्याच्या निर्मितीसाठी दार्शनिक चिंतनासाठी आपली भाषा टिकविणे आवश्यक आहे. अवघड गोष्ट सोपे करून सांगण्याचे सामर्थ्य संत साहित्यात आहे. तो वारसा जपत आपण मराठी व्यवहारात आणली पाहिजे, तिला सबळ केले पाहिजे. तरच आपली भाषा आणि त्याचे अस्तित्व अबाधित राहील, असे डॉ. संध्या देशपांडे म्हणाल्या.

प्रारंभी त्यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्याचाही आढावा घेतला. थेंबांचा संबंध समुद्राशी व ठिणगीचा संबंध वणव्याशी आप्त संबंध असतो, असे कुसुमाग्रजच लिहू शकतात. आपल्या कवितेचे कधीही त्यांनी राजकारण केले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जगदीश कुंटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संध्या देशपांडे यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. किशोर रेडकर यांनी वक्त्यांना पुस्तक भेट दिले. नीलिमा दामले यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. अनघा वैद्य यांनी केले. निखिल नरगुंदकर यांनी आभार मानले.

Related Stories

भगवे वादळ संघाच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद

Amit Kulkarni

पिरनवाडी सकल मराठा समाजाच्यावतीने वृक्षारोपण

Amit Kulkarni

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरात पथसंचलन

Amit Kulkarni

शनैश्वर ट्रस्टतर्फे महाप्रसादाचे वितरण

Amit Kulkarni

सर्व्हिस रोडवरील त्या चेंबरची अखेर दुरुस्ती

Amit Kulkarni

‘क्लोजडाऊन’ला खानापूर परिसरात प्रतिसाद

Amit Kulkarni