भूकेला जात, धर्म, देश, भाषा नसते असे म्हटले जाते. कोरोना काळात केंद्र सरकारने एकही भूकबळी जाऊ दिला नाही याचे खरोखर कौतुक आहे. लॉकडाऊनच्या काळात बेघर, पदपथावर राहणारी, मागून खाणारी, आजारी माणसे असोत की भटके प्राणी असोत या काळात संपूर्ण देशभर माणुसकीचे जे दर्शन झाले त्याला तोड नाही. तरुण मुलं, मुली, अशासकीय संघटना, समाजसेवी संघटनांचा या सेवाकार्यात पुढाकार होता आणि सुदैव म्हणजे धान्यकोठारे गच्च होती. शालेय पोषण आहार असो दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबे असोत या सर्वांना धान्य देण्यात आले हे किती मोठे काम याची जाणीवसुद्धा झाली नाही. सुदैवाने गेल्या दशकात भारतात मोठा दुष्काळ पडलेला नाही. कुठे अतिवृष्टी, ढगफुटी, पिकावर रोगराई अशी संकटे आली पण धान्यच पिकले नाही असे झाले नाही. त्यामुळे आज जी तरुण पिढी आहे त्यांना दुष्काळ, अन्नटंचाई, पाणीटंचाई या संकटाची फारशी कल्पना नाही. ज्यांनी बहात्तर सालचा दुष्काळ बघितला, ज्यांनी सातू, सुकडी, मिलो खाऊन दिवस ढकलला त्यांना या महाभयानक संकटाची अनुभूती आहे. पण अशी वेळ पुन्हा येऊ नये, जगभर कुणावरही अशी येऊ नये यासाठी शासन, शास्त्रज्ञ आणि विश्वसंघटना प्रयत्न करत असतात. हा अग्रलेख लिहित असताना दोन-चार महत्वाच्या बातम्या समोर आहेत त्यामध्ये महाराष्ट्रात महागाईचा गेले काही महिने दर चढा आहे. तर अमेरिकेत तो उतरतो आहे. सोने दराने पुन्हा उच्चांक गाठला आणि जगाची लोकसंख्या विक्रमी 800 कोटींवर पोहोचली. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 शिखर परिषदेत जगापुढे अन्नटंचाईचा धोका असल्याचे म्हटले आहे. खरेतर जगाची व मानवतेची प्रगती, उन्नती साधायची तर शांतता, सहकार्य व संशोधन गरजेचे असते आणि पायाभूत गोष्टींचा विकास गरजेचा असतो. पण साम्राज्यवाद, दहशतवाद आणि पाशवी मनोवृत्ती यामुळे प्रगतीला खिळ बसत असते. आज जगात चीनची लोकसंख्या प्रथम स्थानावर आहे. पाठोपाठ भारत, बांग्लादेश असे क्रमांक आहेत. पुढील वर्षी लोकसंख्येत भारत जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जाईल तथापि भारतात कुटुंब नियोजनाचे महत्त्व अनेकांना लक्षात आल्याने लोकसंख्या आटोक्यात राहिल असा अंदाज आहे. त्यासोबतच लोकसंख्या नियंत्रणासाठी काही कायदे आवश्यक आहेत. ते करण्यासाठीही पावले उचलली पाहिजेत. पण मतांसाठी अनुनय व वेगवेगळे दबाव यामुळे देशहिताची ही पावले अद्याप उचलली गेली नाहीत. जादा लोकसंख्या हे जसे संकट आहे तशी ती संधीही आहे. जादा लोकसंख्या ही मोठी बाजारपेठ असते. तेथे खाणारी तोंडे वाढतात तसे राबणारे हातही वाढतात. भारतासारख्या देशात लोकसंख्या मोठी असली, वाढत असली तरी जगाच्या तुलनेने भारतात तरुणांची संख्या प्रचंड आहे ही युवाशक्ती शेती प्रशिक्षित आणि सुव्यवस्थापित झाली तर भारत जगाचे नेतृत्व करु शकतो. तसे काही संकेतही मिळत आहेत. 72 साली जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा त्या संकटानंतर शेतीत जी प्रगती झाली, नवे बियाणे, नवे तंत्रज्ञान, संकरित जाती यामुळे अन्नधान्य उत्पादनात वाढ झाली पण आजही शेती, शेतीतील प्रगती, आधुनिकता, संशोधन आणि नवे तंत्र शेतीचे यांत्रिकीकरण शेतकऱयांपर्यंत पोहचवण्यात आपण खूप मागे आहोत, त्यामुळे शेती उत्पन्नही जगाच्या तुलनेने खूपच कमी आहे. उदाहरण द्यायचे तर जगात प्रगत देशात एकरी 30 क्विंटल सोयाबिन पिकते व आपल्याकडे हे प्रमाण एकरी दहा-बारा क्विंटलपेक्षा कमी आहे. तापमान वाढ, बदलते ऋतु, एकरी उत्पादन, कृषी विद्यापीठाचे संशोधन, पिकावरील रोगराईवर नियंत्रण यासर्व पातळीवर आम्ही मागे आहोत. त्याच दरम्यान युक्रेनमधील युद्ध आणि कोरोना संकट यामुळे अन्नटंचाईची भिती व्यक्त होते आहे. जगात खताची टंचाई निर्माण होईल अशी चिन्हे आहेत आणि तो धोका ओळखून भारताने अन्नसुरक्षा, उर्जासुरक्षा आणि शांतता यासाठी जी-20 शिखर परिषदेत आग्रह धरला आहे. रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश खत व गहू-सोयाबिनचे मोठे निर्यातदार देश म्हणून ओळखले जातात. तेथे गेले काही महिना अशांतता आणि युद्धस्थिती आहे. ओघानेच अनेक गोष्टी संकटात आल्या आहेत. शेतीच्या प्रगतीत आणि धान्य उत्पादनात खताचे महत्व असते. आजची खतटंचाई ही उद्याची धान्य टंचाई व उद्ध्वस्त अर्थकारणाची नांदी असते. त्यातच खाणारी तोंडे वाढली आणि पिकणारे धान्य कमी झाले तर अनेक संकटे उभा राहू शकतात. भारतात कोरोना संकट आटोक्यात आले असले तरी जगभरातले कोरोना संकट संपलेले नाही. अशा वेळी युद्ध, अशांतता, साम्राज्यवाद आणि युद्धसामुग्रीवरचा प्रचंड खर्च कोणालाही परवडणारा नाही. शेतीवरचा खर्च कमी होईल, पिकावरची रोगराई कमी होईल, संकरित वाण तयार होतील, शेतीचे यांत्रिकीकरण होईल, धान्य उत्पादन, दुग्धोत्पादन, फळविकास यावर भर राहिल असे यशस्वी प्रयत्न हवेत. आज सोन्याचे दर वाढलेत तसे सोयाबीन, साखर, गहू दर वाढत आहेत. युद्ध आणि बदललेले हवामान, पाऊस आणि रोगराई यावर लक्ष पेंद्रीत करण्याची गरज आहे. तसे झाले तर भारत मोठी झेप घेऊ शकतो. याचबरोबर युवकांना शेतीत चांगल्या रोजगार संधी उपलब्ध केल्या पाहिजेत. शेतीमाल, साठवणूक, निर्यात यासाठी पावले टाकली पाहिजेत. युक्रेन युध्दामुळे यंदा भारतातील गहू, सोयाबिन, तेलबिया, भरडधान्ये उत्पादकांना उत्तम दराची संधी आहे. ही संधी उचलली पाहिजे. खतासाठीही आपणास आत्मनिर्भर होता येईल का? हुमणी वगैरेवर मात करण्यासाठी मित्र कीटक तयार करता येतील का? कीटकनाशक विरहित शेतीसाठी संशोधन गरजेचे आहे. त्यादिशेने पावले टाकली पाहिजेत. नरेंद्र मोदींनी जी-20 शिखर परिषदेत जे आवाहन केले आहे आणि उद्याच्या सावध हाका ऐकवल्या आहेत त्यांची सर्वानीच गंभीर दखल घेतली पाहिजे. व मानव कल्याणासाठी विनाविलंब पावले उचलली पाहिजेत. 800 कोटी लोकसंख्या ही अतिप्रचंड आहे. लोकसंख्या नियंत्रण गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक पावले, जोडीला अन्न टंचाईवर मात, शेती सुधारणा आणि युद्ध समाप्ती करुन विकासासाठी पावले उचलली पाहिजेत. अन्यथा भूकबळी आणि भाकरीसाठी मारामारी हे चित्र दूर नाही व ते कोणाला सहनही होणार नाही.


previous post