सरपंच, उपसरपंच व सदस्यांसह बारा जनांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा
प्रतिनिधी/ सातारा
भुईंज (ता.वाई) येथील ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा सरपंच व उपसरपंच आणि सदस्यांनी परस्पर संगनमत करून अनधिकृरीत्या विकून ग्रामपंचायतीच्या लाखो रुपयांचा अपहार केला आहे. सदर प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात तत्कालीन सरपंच बाळासाहेब कोंडीबा कांबळे, उपसरपंच अनुराधा गजानन भोसले, ग्रामसेवक विष्णू महेश्वर चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे वाई तालुक्यात खळबळ उडाली असून त्यावेळच्या ग्रामपंचायत सदस्यांचे धाबे दणाणले आहेत.
सन 2012 ते 2017 या कालावधीत भुईंज (ता. वाई) ग्रामपंचायतीचे सरपंच बाळासाहेब कोंडीबा कांबळे (मयत), उपसरपंच अनुराधा गजानन भोसले, सदस्य चंद्रदिप संभाजी भोसले, मदन अर्जुन शिंदे, प्रशांत रामचंद्र जाधव, शेखर श्रीरंग मोरे, सिमा प्रदिप कांबळे, रेखा जयवंत लोखंडे, माया राजेंद्र भोसले, कविता चंद्रकांत निकम, इंदू उत्तम खरे, धनश्री राजेंद्र शेवते, प्रकाश लक्ष्मण धुरगडे, प्रकाश बजरंग ननावरे, अर्चना रविंद्र भोसले, नुतन भरत भोसले, नारायण शंकर शेडगे सर्वजण राहणार भुईंज आणि विष्णू महेश्वर चव्हाण तत्कालीन ग्रामविकास अधिकारी (रा.अंबवडे (सं)ता.कोरेगाव) सदर कार्यकारणीने व ग्रामसेवकांनी आपापसात संगणमत केले.
भुईंज ग्रामपंचायतीच्या मालकी हक्काची गट क्रमांक 814 एकूण क्षेत्र 9.57 हेक्टर आर व गट क्रमांक 782/2 एकूण क्षेत्र 4.5 हेक्टर आर या दोन्ही ग्रामपंचायतीच्या मालकीच्या क्षेत्रातील सुमारे 30.50 आर (गुंठे) क्षेत्र मोकळी जागा विकली. ग्रामपंचायतीचा बोगस ठराव करून परस्पररीत्या 18 लोकांच्या नावे बेकायदेशीरपणे ग्रामपंचायत नमुना नंबर आठच्या भोगवटा सदरी लावून मिळकत उतारे तयार केले. एकूण मिळकतींची सरकारी दराप्रमाणे होणारी किंमत जास्त होत असताना देखील त्यापेक्षा कमी किंमत घेऊन ग्रामपंचायतीचे नुकसान, मोठा घोटाळा करून पैशाचे अपहरण केले आहे. तसेच दुय्यम निबंधक वाई यांनी सदर मालमत्तेचे मुल्यांकण 36 लाख 66 हजार 600 एवढे केले आहे. यापेक्षाही जास्त बाजारभावाची रक्कम सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी अपरोक्षपणे एकमेकांच्या विचार विनिमयाने व संगनमताने स्वीकारली. ग्रामपंचायतीच्या शासकीय निधीच्या व नियमाप्रमाणे असणाऱया बँक खात्यामध्ये रक्कम भरणा न करता बेकायदेशीरपणे, नियमबाह्यरीत्या ग्रामपंचायतीच्या नावे स्वतंत्र बँक खाते बँक ऑफ महाराष्ट्र शाखा भुईज येथे नवीन खाते काढले. मिळकती हस्तांतरणा पोटी स्वीकारलेली अनामत रक्कम 22 लाख 15 हजार अनाधिकाराने जमा केली. त्या पैशाचाही गैरवापर केला. अशी तक्रार रुपेश सुरेश मोरे, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) पंचायत समिती वाई यांनी भुईंज पोलीस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी सुजाता निलेश भोसले व अन्य पाच ग्रामपंचायत सदस्यांनी 29 डिसेंबर 2017 रोजी वाईच्या गटविकास अधिकाऱयांकडे याबाबत तक्रार केली होती. त्यांनी याबाबत तपास करून त्या वेळचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांना अहवाल सादर केला होता. त्यावेळी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले होते, तर ग्रामविस्तार अधिकारी ग्राम विकास अधिकारी विष्णू महेश्वर चव्हाण यांना निलंबित केले होते. यावर सरपंच बाळासाहेब कांबळे व त्यांनी सदरची चौकशी राजकीय आकसापोटी व खोटी असल्याची तक्रार कैलास शिंदे आणि यांच्याकडे गेले होते. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी य कैलास शिंदे यांनी या प्रकरणाची पुनर्रचौकशी करण्याचे आदेश कराडच्या गटविकास अधिकाऱयांना केले होते. त्यांच्या चौकशीतही वरील सर्वजण दोषी आढळून आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश वाईच्या गटविकास अधिकाऱयांना दिले होते. चार महिन्यापूर्वी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देण्यात आली होती. मात्र योग्य त्या पोलीस चौकशानंतर नुकताच हा गुन्हा भुईंज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला. चौकशी दरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशीष कांबळे करत आहेत.