Tarun Bharat

‘भुईकोट’ची शान उलगडतेय 200 वर्षांपूर्वीचे पान!

किल्लाच्या पहिल्या नकाशाला दोनशे वर्षे पूर्ण; इंग्रजांनी मराठय़ांकडून घेतला होता ताब्यात

अनंत कंग्राळकर / बेळगाव

तिसऱया महायुद्धावेळी इंग्रजांनी साताऱयानंतर बेळगाव काबीज करण्यासाठी कूच केली. इ. स. 1818 मध्ये बेळगावमध्ये येवून फोर्ट रोड परिसरातील मशीद परिसरासह रविवारपेठेत आपले बस्तान मांडले होते. किल्ला परिसरात तीन महत्त्वाचे तलाव होते. त्या तलावांच्या काठावर सैन्याच्या तुकडय़ांची नेमणूक करून किल्ल्याला घेरले होते. त्यावेळी बेळगावमध्ये पेशव्यांचे राज्य होते. दि. 20 मार्च 1818 रोजी उत्तरेकडील बाजूने चढाई करून किल्ल्यावर आक्रमण केले. दि. 20 मार्च 1818 ते दि. 12 एप्रिल 1818 पर्यंत पेशवे आणि इंग्रजांच्या सैन्यामध्ये लढाई सुरू होती. पण इंग्रज सैन्याने किल्ला परिसरात वेढा घातल्याने पेशव्यांचे काहीच चालले नाही. अखेर लढाईमध्ये पेशव्यांचा पराभव झाला. लक्ष्मण भट्ट ठाकुर यांना नमते घ्यावे लागले. दि. 12 एप्रिल 1818 या दिवशी इंग्रजांनी भुईकोट किल्ला ताब्यात घेतला. ब्रिगेडिअर जनरल
थॉमस मुन्रो यांनी किल्ला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही केली. किल्ल्यात राहणाऱयांना पळवून लावले. या घटनेला दि. 12 एप्रिल 2018 रोजी दोनशे वर्षे झाली असून भुईकोट किल्यासह बेळगावमधील पेशवे राजवटीचा ऱहास देनशे वर्षांपूर्वी झाला होता. पण ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार असलेला किल्ला आजही दिमाखात उभा आहे. ब्रिटिशांनी किल्ला ताब्यात घेतला त्यावेळी किल्ल्याच्या अंतर्गत भागात 300 हून अधिक घरे होती.

या ठिकाणी राहणाऱयांना हटवून ब्रिटिशांनी सर्व घरे जमिनदोस्त केली. भूईकोट किल्यामधून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट चालविण्यासाठी ब्रिटिशांनी सर्व सरकारी कार्यालये स्थापन केली. तसेच याठिकाणी अधिकाऱयांना राहण्यासाठी बंगले बांधले.

आताच्या रविवार पेठेची ‘पेठ’ म्हणून नोंद

या किल्लाची उभारणी जैन राजांनी केली होती. त्यानंतर विजापूर राजवटीत इ. स. 1530 मध्ये तटबंदीची पुनर्बांधणी झाली होती. त्यानंतर आजपर्यंत किल्ल्याचा विकास झाला नाही. आज किल्ल्याच्या भिंती ढासळू लागल्या असून भिंतीवर झाडेझुडुपे उगवली आहेत. पण किल्याचा विकास करण्याकडे प्रशासन आणि पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे इतिहासाची पाने उलगडणाऱया आणि वर्षानुवर्षे राज्य केलेल्या राजवटीचा साक्षीदार असलेल्या किल्ला परिसराचा पहिला नकाशा इंग्रजांनी बनवून घेतला होता. किल्ला तसेच ‘पेठ’ म्हणून ओळख असलेल्या आताच्या रविवार पेठेसह संपूर्ण बेळगावचा नकाशा दि. 3 मार्चला तयार करण्यात आला होता. त्यावेळी साखळीच्या आधारे आणि यार्डमध्ये मोजमाप करण्यात येत होते. किल्लाची व्याप्ती एक हजार यार्ड लांब आणि 800 यार्ड रुंद आहे. किल्ला भिंतीच्या आतील भागात शंभर एकरहून अधिक जागा आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची माहिती, झेंडा फडकविण्याचे स्थळ, किल्लेदारांचे घर, मशीद, घोडय़ांचा तबेला आणि पेठेची हद्द नकाशामध्ये दाखविण्यात आली आहे.

9 मार्च 1838 मध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डची घोषणा  तसेच बेळगावमध्ये बांबूचे जंगल असल्याने वेणुग्राम म्हणून ओळखले जाते. किल्ल्याच्या पश्चिम भागात वस्ती होती. संपूर्ण जंगल असल्याने इ. स. 1821 मध्ये बेळगावमध्ये 1309 घरे आणि 7652 लोकसंख्या होती. इ. स. 1826 मध्ये कर्नल जेम्स वेल्श यांच्या नेतृत्वाखाली डोअब फिल्ड फोर्सचे मुख्यालय सुरू करण्यात आले. हा भाग बॉम्बे प्रातांत होता. यामुळे इ. स. 1828 मध्ये बॉम्बे प्रागव्हर्नर सर जॉन मॅल्कोम यांनी बेळगावला भेट दिली.  याठिकाणी राजकारभाराचे केंद्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानतंर इ. स. 1830 मध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डची हद्द निश्चित करण्यात आली. दि. 9 मार्च 1838 मध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डची घोषणा करण्यात आली.

Related Stories

महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले

Amit Kulkarni

बेकिनकेरे-गोजगा रस्त्याकडे साफ दुर्लक्ष

Omkar B

उपमुख्यमंत्र्यांनी बिम्स रुग्णालयाला भेट देत अधिकाऱ्यांचा घेतला समाचार

Archana Banage

दुसऱया दिवशीही बेळगाव जिल्हय़ाला दिलासा

Patil_p

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज खानापूर तालुका दौऱयावर

Amit Kulkarni

स्वामी विवेकानंद जयंती सिद्धार्थ बोर्डिंगमध्ये साजरी

Amit Kulkarni