Tarun Bharat

भूमीपुत्रांना फौंड्रीच्या प्रशिक्षणासह नोकरीची हमी

आयआयएफ, शासकीय तंत्रनिकेतन, डीटीपेएचा स्थानिकांना रोजगार, संधी घेण्याचे आवाहन

प्रतिनिधी/कोल्हापूर

येथील इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन फौंड्रीमेन कोल्हापूर चॅप्टर, शासकीय तंत्रनिकेतन व धातू तंत्र प्रबोधिनी असोसिएशनच्या वतीने स्थानिक उमेदवारांना प्रशिक्षण व नोकरीची हमी देण्यासंदर्भात नुकतीच एक ऑनलाईन बैठक झाली. केंद्र सरकारच्या  लोकल टू ग्लोबल धोरणानुसार स्थानिक तरुणांना रोजगार संधी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या संदर्भातील माहिती देताना आयआयएफचे कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष सुमित चौगुले यांनी सांगितले की, सद्यःस्थितीमध्ये परराज्यातील कामगार आपापल्या गावी परतल्याने येथे उद्योगधंद्यांमध्ये कामगारांची कमतरता भासू लागली आहे. त्या अनुषंगाने झालेल्या बैठकीमध्ये उद्योगधंद्यांना प्रशिक्षित कामगारांची उपलब्धतता जाणवू लागली आहे. मोठय़ा संख्येने परराज्यात गेलेले कामगार लवकर परत येण्याची शक्यता कमी आहे. यामुळे स्थानिकांना प्रशिक्षित व प्रमाणित करण्याची जबाबदारी शासकीय तंत्रनिकेतन व डीटीपीएने घेतली आहे. या प्रशिक्षित मनुष्यबळाला उद्योगधंद्यांध्ये सामावून घेण्याची व योग्य पगाराची हमी आयआयएफने घेतली आहे.

 ऑनलाईन, ऑफलाईन अभ्यासक्रम राबविणार

चौगुले म्हणाले, फौंड्री उद्योगात सध्या कास्टिंग, क्लिनिंग अँड फिनशिंग व मोल्डिंग या क्षेत्रात कामगारांची गरज असून त्यांच्यासाठी 40 तासांचे ऑनलाईन व ऑफलाईन अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत. या तीनही संस्थांच्या मध्ये तसा लवकरच सामंजस्य करार होऊन लघुकालीन अभ्यासक्रम सुरू होतील. या अभियानासाठी जिह्यातील सर्व औद्योगिक संघटना व जिल्हा उद्योग केंद्राची महत्त्वपूर्ण मदत घेतली जाणार आहे. दरम्यान, या बैठकीला शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रशांत पट्टलवार, कौन्सिल मेंबर सुरजित पवार, रवींद्र पाटील, शशांक मांडरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पाच हजार कामगारांची गरज

फौंड्री उद्योगासाठी साधारणतः पाच हजार कामगारांची आवश्यकता असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. सध्या कोल्हापूर विभागात 375 फौंड्री उद्योग आहेत. त्यामध्ये दर महिन्याला 60 हजार टन कास्टिंग केले जाते. या उद्योगाला लागणाऱया मनुष्यबळामध्ये हार्डवर्क करण्यासाठी सध्या स्थानिक व कुशल कामगार मिळत नाहीत. या प्रशिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून आवश्यक ती रोजगार संधी उपलब्ध केली जाणार आहे.

परराज्यातील कामगार त्यांच्या गावी गेल्याने फौंड्री उद्योगात रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे. स्थानिक बेरोजगार युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा. या उपक्रमामुळे कोरोनाच्या काळात निर्माण झालेली बेकारी कमी होण्यासही मदत होईल. -सुमित चौगुले,  आयआयएफचे कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष

Related Stories

ऊसाच्या रसाचे फायदे; जाणून घ्या कोणी करू नये सेवन

Abhijeet Khandekar

गावातील मुतारी गेली चोरीला, अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar

शिवाजी विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ

Archana Banage

Corona Cases : कोरोनाची चौथी लाट येणार? देशात रुग्णांची संख्या वाढली

Archana Banage

कोल्हापूर : खोचीसह परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तीन कोटी ११ लाखाचा निधी

Archana Banage

छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी; महादेव जानकरांचे वक्तव्य…

Archana Banage