Tarun Bharat

भ्रष्टाचारमुक्त सरकारसाठी ‘आप’ला पाठिंबा द्या

Advertisements

आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचे आवाहन : पर्येत विश्वजित कृ. राणेंचा समर्थकांसह आपमध्ये प्रवेश,भर पावसातही लोकांची मोठी गर्दी

प्रतिनिधी /वाळपई

 काँग्रेस व भाजपने गोव्याची लूट चालवलेली आहे. भाजपाने आपल्या कारकिर्दीत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार करुन गोव्याची वाट लावलेली आहे. येणाऱया काळात भ्रष्टाचारमुक्त सरकार व गोमंतकीयांना दिलासा देणारे सरकार स्थापनेसाठी पर्ये मतदारसंघांमध्ये आम आदमी पक्षाचा आमदार निवडून येणे गरजेचा आहे. वीज, पाणी मोफत देणारे देशातील दिल्ली हे पहिले सरकार आहे. अशाच प्रकारचा विकास गोव्यात घडवून आणणार आहे. त्यासाठी गोमंतकीयांच्या पाठिंब्याची गरज असून आपचे उमेदवार निवडून द्या, असे आवाहन आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले. 

पर्ये मतदारसंघातील भाजपचे नेते विश्वजित कृष्णराव राणे यांनी आपल्या समर्थकांसमवेत आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला. धोधो पाऊस पडत असतानाही मोठय़ा प्रमाणात समर्थकांनी सालेली येथील सभेला उपस्थिती लावली होती. यावेळी व्यासपीठावर वाळपई मतदारसंघाचे आम आदमी पक्षाचे नेते सत्यविजय नाईक, माजी मंत्री महादेव नाईक ऍड. अमित पालेकर, ऍड. गणपत गावकर व इतरांची उपस्थिती होती.

भर पावसातही जनतेच्या उपस्थितीने आपण भारावलो : केजरीवाल

 आयोजनावर पावसाचे व्यत्यय निर्माण झाल्यानंतर शेवटी ही सभा काजू कारखान्याच्या परिसरामध्ये घेण्यात आली. अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की, गोव्याच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी आम आदमी पक्ष गोव्यात आलेला आहे. दहा वर्षापूर्वी भाजपा व काँग्रेस पक्षाने दिल्लीमध्ये मोठय़ा प्रमाणात लूट चालविली होती. यामुळे कंटाळलेल्या जनतेने आम आदमी पक्ष स्थापन केला व या पक्षाचे सरकार आज दिल्लीमध्ये भक्कमपणे कार्यरत आहे. तशीच परिस्थिती सध्या गोव्यामध्ये निर्माण झालेली आहे. यामुळे भाजपाचे सरकार बदलण्याची आता वेळ आलेली आहे. पर्ये मतदारसंघात आपचा उमेदवार निवडून येण्यासाठी जनतेच्या सहकार्याची गरज आहे. जोरदार पाऊस पडत असतानाही एवढय़ा मोठय़ा प्रमाणात  जनतेच्या उपस्थितीने आपण भारावून गेलो असून पुन्हा एकदा आपण या ठिकाणी मोठी सभा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

सर्वसामान्यांसाठी झटणाऱया पक्षात प्रवेश केला : विश्वजित कृ. राणे

विश्वजित कृष्णराव राणे यांनी, स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कारकर्दीत भाजपाने जनतेचा पक्ष म्हणून काम केले मात्र आज या पक्षाची अवस्था व्यवहारिक झालेली आहे. यामुळे या पक्षामध्ये राहून काहीच होणार नसल्याचे समजले. तेव्हा आपण या पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. अनेक राजकीय पक्षांनी आपल्या समोर पैशाच्या ऑफर्स दिल्या मात्र आपण सर्वसामान्यांसाठी झटणारा आम आदमी पक्ष आपण जवळ केला. आयुष्यात आपण कधी पैसे कमावले नाही मात्र जनतेच्या सुखसोयीसाठी आतापर्यंत खूप निधी खर्च केला आहे. आम आदमी पक्ष हा जनतेचा पक्ष आहे. यामुळे या पक्षात काम करण्याचे ठरविल्याचे विश्वजित कृ. राणे यांनी सांगितले.

आरोग्यमंत्र्यांकडून युवकांची फसवणूक

आरोग्यमंत्री विश्वजित राणे नोकर भरतीचे आश्वासन देऊन प्रत्येक विधानसभा निवडणुकीवेळी जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप विश्वजित कृ. राणे यांनी केला.  विश्वजित राणे व प्रतापसिंह राणे यांनी गेल्या पन्नास वर्षांत जे केले नाही ते आपण सहा महिन्यांमध्ये करून दाखवणार, अशी गर्जना त्यांनी केली. पिसुर्ले व होंडा औद्योगिक वसाहतीत मल्टिनॅशनल कंपन्या आणून या भागातील नोकऱयांची समस्या सोडविण्यावर आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

महागाईने जनता मेटाकुटीला : महादेव नाईक

माजी मंत्री महादेव नाईक यांनी, गोव्यात खऱयार्थाने आम आदमी पक्षाच्या सरकारची गरज आहे. आज सर्वसामान्य जनतेची लूट चाललेली आहे. वाढती महागाई व दुसऱया बाजूने पिण्याच्या पाण्याची वाढती बिले व विजेचे दर मोठय़ा प्रमाणात वाढू लागल्यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. आम आदमी पक्षाने मोफत वीज व पाणी देण्याची घोषणा केलेली आहे. त्याचप्रमाणे ज्ये÷ नागरिकांसाठी देवदर्शनाचा योजना अंमलात आणण्यात येणार आहे. बेरोजगारांसाठी प्रतिमहिना रोजगार भत्ता देण्याची घोषणा केलेली आहे. यामुळे जनतेने या पक्षाच्या मागे खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

ऍड. गणपत गावकर यांनी यावेळी बोलताना आप हा खऱयार्थाने सर्वसामान्यांचा पक्ष असल्याने आपण भाजपला रामराम ठोकून या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. विश्वजित कृ. राणे यांच्या आम आदमी पक्षात प्रवेश केल्याने पक्षाची यंत्रणा भक्कम झाल्याचे यावेळी ते म्हणाले.

कार्यक्रमाची सुरुवात मुलांनी सादर केलेल्या सुंदर स्वागतगीताने करण्यात आली. मान्यवरांचे पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन लक्ष्मण झोरे यांनी केले तर शेवटी राजेश राणे यांनी सर्वांचे आभार मानले. शेवटी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Stories

‘एसीजीएल’चे कामगार जाणार पुन्हा संपावर

Amit Kulkarni

गोव्यात आज नॉर्थईस्ट युनायटेडची लढत चेन्नईनशी

Amit Kulkarni

काँग्रेसमध्ये लवकरच अनेक संघटनात्मक बदल

Patil_p

गोवा डेअरीला आर्थिक वर्षात रू 8 कोटीची नुकसानी

Omkar B

मिशन आत्मशोध ते समाजोद्धार..

Omkar B

धर्मांतराला आळा घालण्यासाठी कायद्यात दुरुस्ती अनिवार्य

Amit Kulkarni
error: Content is protected !!