Tarun Bharat

मँचेस्टर सिटीचा बर्नलीवर मोठा विजय

Advertisements

इंग्लिश प्रिमियर लीग : फॉडेन, मेहरेझचे प्रत्येकी 2 गोल

वृत्तसंस्था/ मँचेस्टर

इंग्लिश प्रिमियर लीगमधील सामन्यात मँचेस्टर सिटीने बर्नलीचा 5-0 असा एकतर्फी पराभव करून लिव्हरपूलला बुधवारच्या सामन्यानंतर जेतेपद मिळणार नाही, याची तजवीज केली. लिव्हरपूलचा क्रीस्टल पॅलेसविरुद्ध सामना होणार असून जेतेपदासाठी त्यांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

फिल फॉडेन, रियाद मेहरेझ यांनी प्रत्येकी दोन गोल नोंदवले तर डेव्हिड सिल्वाने एक गोल नोंदवला. सिल्वाचा हा मँचेस्टर सिटीसाठी नोंदवलेला शेवटचा गोल असल्याचे मानले जात आहे. या विजयानंतर सिटीने लिव्हरपूलची आघाडी 20 गुणावर आणली आहे. बर्नलीसाठी हा दिवस वाईटच गेला असे म्हणावे लागेल. या सामन्यावेळी इतिहाद स्टेडियवरून एक विमान गेले, त्यावर ‘व्हाईट लाईव्ज मॅटर बर्नली’ असा बॅनर लावला होता. या बॅनरशी बर्नली संघाचा कोणताही संबंध नव्हता. पण त्यांना तसे स्पष्टीकरण द्यावे लागले.

प्रिमियर लीगचे पुनरागमन झाल्यानंतर पहिल्या 12 सामन्यात प्रत्येक खेळाडूने ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ हा संदेश आपल्या टी शर्टवर प्रदर्शित केला होता. याशिवाय सामना सुरू होण्याआधी खेळाडू, प्रशिक्षक, रेफरी या सर्वांनीच एक गुडघा टेकवून फ्लॉईडला समर्थन देण्याची कृती केली होती. ‘बॅनरचा हा प्रकार कोणी केला याची आम्हाला माहिती नाही. पण आमचे त्याला अजिबात समर्थन मिळणार नाही,’ असे बर्नलीने निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

20 वर्षीय फॉडेनने शानदार गोल नोंदवून संघाचे खाते उघडले. त्यानंतर मेहराझने मध्यंतराआधी दोन गोल नोंदवून संघाची आघाडी वाढविली. त्याने प्रथम मैदानी गोल नोंदवला, त्यानंतर पेनल्टी स्पॉटवर वैयक्तिक दुसरा गोल केला. बर्नार्डो सिल्वाने पुरविलेल्या लो क्रॉसवर डेव्हिड सिल्वाने चौथा आणि फॉडेनने आणखी एक गोल नोंदवून सिटीचा विजय निश्चित केला. शेवटची दहा मिनिटे असताना फॉडेनच्या जागी लेरॉय सेनला मैदानात उतरवण्यात आले. गेल्या वर्षीच्या ऑगस्टनंतर गुडघ्याच्या दुखापतीनंतर त्याला प्रथमच संधी देण्यात आली होती.

Related Stories

आयसीसी पुरस्कारासाठी पंत, रुट, स्टर्लिंगला नामांकन

Patil_p

रिसेकी, हदाद माइया अंतिम फेरीत

Patil_p

घानाचा कारीकेरी चेन्नईन क्लबशी करारबद्ध

Patil_p

पुण्यातील आर्मी केंद्रात होणार महिला बॉक्सर्सचे ट्रेनिंग

Patil_p

हॅलेप, ऍनीसिमोव्हा अजिंक्य

Patil_p

ऑस्ट्रेलिया-अफगाण कसोटी लांबणीवर

Patil_p
error: Content is protected !!