Tarun Bharat

मंडणगडात 5 लाखाचे अडीच हजार किलो गोमांस जप्त

दापोली कस्टम विभागाकडून मोठी कारवाई

प्रतिनिधी/ दापोली

दापोली कस्टम विभागाने रात्रीची गस्त घालत असताना मंडणगड तालुक्याच्या हद्दीत लाटवण-कुंबळे मार्गावरील वलवते गावाजवळ बोलेरो पिकअप्मधून वाहतूक करण्यात येणारे 5 लाख रूपये किंमतीचे अडीच हजार किलो गोमांस जप्त केले आहे. या प्रकरणी मुंबई-कुर्ला येथील दोघांना ताब्यात घेतले आहे.

 या बाबत दापोली येथील कस्टम विभागाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दापोली कस्टम विभागाचे अधिकारी जे. एम. भोईटे म्हणाले, सोमवारी रात्री आपण आपले सहकारी महेश यादव, भास्कर गायकवाड, विकास आनंद, अमर मौर्य, सुहास वेलणकर, प्रसन्न शिवणकर, अमित वाडकर, अजिंक्य शिंगारे, अरुण शिगवण, दिलीप जालगावकर, उदय कदम, प्रतिक अहिवले यांच्यासह दापोली, मंडणगड या दोन तालुक्यांच्या हद्दीवर रात्रीची गस्त घालत होतो. रात्री 12.30 च्या सुमारास मुंबईकडे वेगाने जाणारी महिद्रा कंपनीची बोलेरो पिकअप आढळली. या गाडीतून रक्तमिश्रित पाणी खाली पडत होते व घाण वास येत होता. याचा संशय आल्याने आपण गाडी थांबवली व गाडीचा मागील भाग उघडून पाहिला असता या गाडीत सुमारे अडीच हजार किलो गोमांस असल्याचे आढळले. प्रथम गाडी चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर त्यांनी हे गोमांस असल्याचे कबूल केल्याची माहिती त्यांनी दिली.

 या प्रकरणी मुंबई-कुर्ला येथील गाडी चालक सैफ कुरेशी व त्याचा सहकारी इरफान कुरेशी यांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीमध्ये दहा ते बारा बैल व दोन ते तीन म्हशींची कत्तल केलेले गोमांस भरलेले होते. ते मुंबई-कुर्ला येथे घेऊन जात होते. हे गोमांस त्यांनी वलौते गावातील मुनाफ नावाच्या व्यक्तीकडून घेतले होते व ते कुर्ला येथे इमरान या व्यक्तीला देणार होते. दापोली कस्टम विभागाने त्यांनी वापरलेल्या 2 कुऱहाडी, 4 चाकू, 3 कानसी व चाकू लावायचे दोन दगडदेखील जप्त केल्याचे भोईटे यांनी सांगितले. दरम्यान, दोन्ही आरोपींना गोमांसासह पहाटे दापोली येथे आणून पंचनामा करण्यात आला. त्यानंतर या दोघांसह सर्व मुद्देमाल मंडणगड पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी सकाळीच हे पथक मंडणगडकडे रवाना झाले. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गोमांस सापडल्यामुळे जिह्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दापोली व मंडणगड तालुक्याच्या हद्दीत मोठय़ा प्रमाणात गोमांसाची तस्करी होत असल्याचे या प्रकारावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Related Stories

स्वप्नजा बांदोडकर यांचे अल्पशा आजाराने निधन

Anuja Kudatarkar

देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत आजगांव प्राथमिक शाळा प्रथम

Anuja Kudatarkar

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत कै. बाबुराव पाटेकर मा.विद्यालयाच्या विद्यार्थिनींची बाजी

Anuja Kudatarkar

चिपळुणात ऐन पावसातही बेकायदा वाळू उत्खनन

Patil_p

एटीएम फोडणारा पाच तासात गजाआड

Patil_p

शिधापत्रिका तपासणीला स्थगिती

NIKHIL_N