Tarun Bharat

मंडणगड तालुकावासीय जपताहेत माणुसकी!

तहानलेल्यांना पाणी अन् भुकेलेल्या चाकरमान्यांना तालुकावासियांकडून मायेचा घास 

मंडणगड/ प्रतिनिधी        

कोरोनाविरोधातील लढय़ात मुंबईस्थित चाकरमानी तालुकावासीयांना प्रशासनाने जनतेला गावी जाण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी केवळ प्रवासाला पास देण्यापलिकडे काही केले नाही. त्यामुळे परिस्थितीने बेजार झालेले नागरिक मिळेल त्या वाहनाने, तर काही चालत गावाकडे येत आहेत. त्यांच्या या प्रवासात त्यांना अनेक मानसिक व शारीरिक वेदना सहन कराव्या लागत आहेत. यातच तालुक्यातील समाजसेवी वृत्तीच्या लोकांनी त्यांना मायेचा घास भरवून कोरोनाच्या लढाईत माणुसकी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

  कोरोनाच्या लढय़ामध्ये ग्रामीण भागातील नागरिकही पाठी राहिले नसल्याचे दाखवले आहे. शासनाने चाकरमान्यांना आपापल्या गावी जाण्याची सूचना केली आणि हे नागरिक मिळेल त्या वाहनाने, पायी चालत मजल दरमजल करत आपापल्या गावी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. पायी प्रवासात त्यांना अनेक अडचणींवर मात करत घरी पोहचावे लागत आहे. यामध्ये अनेकांना पाणी मिळणेही कठीण झाले आहे. सोमवारपासून तालुक्यात येणाऱया या चाकरमान्यांची संख्या अधिक वाढू लागली आहे. तालुक्यात आजवर आलेल्या या नागरिकांमध्ये कोरोना रूग्णही असल्याने सुरूवातीला या अन्य जिल्हय़ातून येणाऱया नागरिकांच्या आसपास जाण्यासही ग्रामस्थ घाबरत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या नागारकांची होत असलेली परवड पाहून भिंगळोली गावातील समाजसेवी नागरिकांना या अन्य जिल्हय़ातून आपल्या गावी परतत असणाऱया बंधु-भगिनींसाठी चहा व बिस्किटे, तालुका शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पाण्याच्या बाटल्या व बिस्किटे, तर कुणबी समाजातील सेवाभावी कार्यकर्त्यांनी तयार अन्नाच्या पाकिटांचे वाटप केले. तसेच शिवसेनेच्या रूग्णवाहिकेतून अन्य जिल्हय़ांतून आलेल्या तालुकावासियांना म्हाप्रळहून मंडणगडला आणून त्यांची 20 किलीमीटरची पायपिट वाचवली. कोरानाच्या लढाईतही माणसातली माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय आज संपूर्ण तालुक्याला या कार्यातून आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक तालुकावासीय आपली मुले व वयोवृद्ध माता-पित्यांना घेऊन आपल्या गावी येत आहेत. त्यांची या प्रवासामुळे झालेली परवड खरोखरच अनेकांच्या मनाला स्पर्श करून जात आहे.

  मुंबईतून तालुक्यातील आपल्या गावी जाण्यासाठी आलेल्या मुंबईकर नागरिकांनी मंडणगड ग्रामीण रुग्णालयाबाहेर नोंदणी व तपासणीसाठी मोठी गर्दी केली. त्यामुळे रुग्णालय परिसरात नागरिकांची मोठी रांग व वाहनांची वर्दळ पहायला मिळाली. आतापर्यंत सुमारे चारशेच्या वर नागरिक तालुक्यात या तीन दिवसांत दाखल झाले आहेत. प्रशासनाने मुंबई व अन्य शहरातून येणाऱया नागरिकांना होम क्वारंटाईन करण्याचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालयाबाहेर मुंबईकर नागरिक आपली नोंदणी व प्राथमिक तपासणी करून हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घेण्यासाठी रांगेत उभे रहात आहेत. त्यामुळे परिसर गर्दीने फुलत असून सोशल डिस्टन्स बिघडत आहे.

  नोंदणी व होम क्वारंटाईन शिक्का घेतलेले नागरिक चालत आपापल्या गावाकडे चालतच निघत आहेत. त्यामुळे शहरात गर्दी होताना दिसून येत आहे. थकल्या, भागलेल्या नागरिकांसाठी शासन, प्रशासनाच्यावतीने काही उपाययोजना होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालयात वाढणारी गर्दी पाहता तालुक्यातील देव्हारे, पंदेरी, कुंबळे प्राथमिक आरोग्य केंद्रावर कार्यक्षेत्रातील गावांतील नागरिकांची नोंदणी व तपासणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. 11 मेपासून तालुक्यात 1837 चाकरमानी दाखल झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.

Related Stories

शिक्षण विभागातील भ्रष्टाचारात अजून बाराजण?

NIKHIL_N

महाविद्यालय-सीईटी परीक्षा होणार नव्या वेळापत्रकानुसार

Patil_p

दापोलीतून थंडी गायब, पा-यात वाढ

Archana Banage

सांगली : पत्नीच्या विनयभंग प्रकरणी माजी नगरसेवकाला अटक

Archana Banage

अरविंद सरनोबत याना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

NIKHIL_N

राजापूरातील रिक्षा व्यवसायिकांचे फाटके कपडे व तुटक्या चपला घालून आंदोलन

Patil_p
error: Content is protected !!