Tarun Bharat

मंत्री मुश्रीफांचा सोमय्यावर 100 कोटीचा दावा

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱया भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी तब्बल 100 कोटी रूपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. प्रशांत चिटणीस यांनी सोमवारीच जिल्हा व सत्र न्यायालयातील सहावे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) पी. आर. राणे यांच्या न्यायालयात हा दावा दाखल केला. स्वतः ऍड. चिटणीस यांनी ही माहिती दिली. दरम्यान, या दाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनाही प्रतिवादी करण्यात आल्याचे ऍड. चिटणीस यांनी सांगितले.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. गेल्या आठवडÎात त्यांनी मुश्रीफ यांनी 127 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. त्यानंतर ते मंगळवारी कोल्हापूर दौऱयावरही आले होते. या दौऱयात त्यांनी मुरगूड पोलीस ठाण्यात जाऊन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रारही दाखल केली आहे. दरम्यान, मुश्रीफ यांनी सोमय्यांनी केले सर्व आरोप फेटाळून लावले होते.

कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात 100 कोटींचा दावा दाखल

मुश्रीफ यांच्या वतीने सोमवारी (27 सप्टेंबर) जिल्हा व सत्र न्यायालयात ऍड. चिटणीस यांनी शंभर कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. सहावे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी. आर. राणे यांच्या न्यायालयापुढे हा दावा चालणार आहे. या दाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. पुढील सुनावणी शुक्रवार 1 ऑक्टोबरला आहे.

बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध न करण्याबाबतही अर्ज

अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्यानंतर दाव्याचे काम सुरू राहिल त्या काळात सोमय्या यांनी मुश्रीफ यांची बदनामी होईल असा कोणताही मजकूर अथवा वक्तव्य करण्यास मनाई करावी, अशी मागणी करणारा अर्जही केला आहे. या अर्जवरही 1 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.


error: Content is protected !!