Tarun Bharat

मंत्र्यांचा जोरदार प्रचार, विरोधकांची सतावणूक

प्रतिनिधी/ पणजी

गेल्या तीन साडेतीन वर्षात सत्तास्थानी राहूनही सर्व थरांवर अपयशी ठरलेले सरकार आता जिल्हा पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून नशिब आजमावत असून त्यासाठी साम दाम दंड भेद या चारही उपायांचा अवलंब करत जोरदार प्रचारात उतरला आहे. त्याकामी सरकारी यंत्रणेलाही त्यांनी दावणिला बांधले असून विरोधकांना मात्र सतावण्याचे सत्र आरंभले आहे, असा आरोप मगो नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी केला आहे. मगोने 17 उमेदवार निवडणुकीत उतरवले असून पैकी 12 जण खात्रीने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्तास्थानी असलेल्या भाजपवर ही वेळ येते यावरून गेल्या तीन साडेतीन वर्षात त्यांनी लोकांना केवळ आश्वासनांवरच झुलवत ठेवले व प्रत्यक्षात कोणतेही लोकोपयोगी काम केलेले नाही, हेच सिद्ध होते, असे ढवळीकर पुढे म्हणाले. पणजीत मगो कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी पक्षाचे सरचिटणीस प्रताप फडते उपस्थित होते.

सावंत सरकारच्या काळात कोणताही विकास नाही

या सरकारच्या कार्यकाळात कोणताही विकास घडला नाही. साधनसुविधा उभारण्यात आल्या नाहीत. विकासकामे थंडावली आहेत तर काही बंद पडली आहेत. लाडली लक्ष्मी, गृहआधार, वृद्धांना मिळाणारे पेन्शन यासारख्या कित्येक योजनांच्या लाभधारकांना कित्येक महिन्यांपासून पैसे मिळत नाहीत. राज्यातील पायलट, टॅक्सी चालक, बस मालक, भाडोत्री वाहन मालक यांची परिस्थिती बिकट झालेली आहे, त्यांच्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरलेले आहे, अशी टीका ढवळीकर यांनी केली.

या सरकारचा अपयशाचा हा पाढा संपून संपणारा नाही, त्यामुळे आता मतदारांनीच जागृत व्हावे व या सरकारला त्याची जागा दाखवून देताना त्यांची दादागिरीही संपवून टाकावी, असे आवाहन त्यांनी केले.

विरोधी आमदार, उमेदवारांची होतेय सतावणूक

सरकारातील अनेक मंत्री बिनधास्त प्रचारात व्यस्त आहेत. या उलट एखादा आमदार किंवा विरोधी पक्षाचा उमेदवार प्रचारात दिसल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येते. एखाद्या उमेदवाराचे न्यायप्रविष्ट असलेले प्रकरण उकरून काढून सतावणूक करण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यावरून हे सरकार कोणत्यासुद्धा थराला जाऊ शकते याची प्रचीती येते, असे ढवळीकर म्हणाले.

यापूर्वीच्या अनेक निवडणुकां दरम्यान खाणींचे आश्वासन देण्यात येत होते. यंदा त्या आश्वासनात भर म्हणून 10 हजार नोकऱयांचे गाजर दाखविले जात आहेत. परंतु हा प्रकार हास्यास्पद आहे. सध्या या सरकारची परिस्थिती एवढी हलाखीची बनलेली आहे, तिजोरीत खडखडाट आहे, की विद्यमान कर्मचाऱयांनाच पगार देणे शक्य होत नाही. रोजंदारी, कंत्राटी, अशा कित्येक कामगारांना महिनोमहिने पगार दिला जात नाही. अशा परिस्थितीत 10 हजार नोकऱयांचे आश्वासन कोणत्या तोंडाने दिले जाते तेच समजत नाही, असे ढवळीकर म्हणाले.

मगो वीज व पाणीही मोफत देईल

दिल्लीत आपचे सरकार 200 युनिट वीज मोफत देते यात कोणताही मोठेपणा नाही, आम्ही यापूर्वी पहिले 12 ते 15 क्युबीक मीटरपर्यंत पाणी फुकट देण्याची योजना आखली होती. त्यासंबंधीची फाईल अद्याप साबांखामध्ये आहे. मगो सत्तेत आल्यास आम्ही ती योजना सत्यात आणू शकतो, तसेच 200 युनिट वीजही मोफत देऊ शकतो, असा दावा ढवळीकर यांनी केला.

गोव्यात कोळसा नकोच

गोव्यात कोळसा नकोच या मताचाच आपणही आहे, असे ते म्हणाले. प्रत्यक्षात गोव्याची कोळशाची गरज केवळ 5 मे. टन एवढीच आहे. बाकी कोळसा हा कर्नाटकसाठी नेला जातो. त्यासाठी गोव्याने त्याग का करावा? असा सवाल उपस्थित करताना कोळशाचे मूळ असलेल्या एमपीटीतच कोळसा बंद झाल्यास हा प्रश्नच आपोआप सुटेल, असे ते म्हणाले. राज्यासाठी रेल्वे डबलट्रेकिंगचे मात्र आपण समर्थन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोव्यात येणारी अनेक कडधान्ये, सिमेंट यासारखी उत्पादने केवळ अफाट प्रवासखर्चामुळे आम्हाला महाग खरेदी करावी लागतात, हीच उत्पादने रेल्वेने आल्यास निम्म्या किंमतीत उपलब्ध होऊ शकतात, असा दावा ढवळीकर यांनी केला.  

सत्तेसाठी मगो लाचारी पत्करणार नाही

मगो पक्ष सत्तेसाठी हपापलेला नाही आणि विद्यमान सरकारसमोर तर आम्ही कदापी लाचारी पत्करणार नाही, असे स्पष्ट मत आमदार तथा मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले. अन्य काही आमदारांसह ढवळीकरही लवकरच सत्तेत सामील होणार असल्याची चर्चा असल्याचे विचारले असता श्री. ढवळीकर यांनी वरील उत्तर दिले. त्या केवळ अफवा आहेत आणि त्या पसरविणारेही भाजपचेच लोक आहेत. ज्यांच्याकडे पूर्वीच 27 जणांचे संख्याबळ आहे त्यांना आमची गरजच का पडावी? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. दोन दिवसांनंतर होणारी जिल्हा पंचायत निवडणूक ही सर्व राजकीय पक्षांसाठी सेमी फायनल आहे. त्यात जो निकाल लागेल त्यावरून येत्या विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरात कामाला लागले आहेत. भाजपला आता भवितव्य नाही. त्यापेक्षा वाईट गत काँग्रेस पक्षाची असून त्यांच्याशी हातमिळवणी करण्याच प्रश्नच येत नाही, आणि करणारही नाही, असे अन्य एका प्रश्नावर ते म्हणाले.

Related Stories

अनमोड ते खांडेपार महामार्गाचे हॉटमिक्स डांबरीकरण सुरु

Amit Kulkarni

घटनात्मक पेचप्रसंग निर्माण करावा

Amit Kulkarni

अमेरे पोरस्कडेत महामार्ग नदीत कोसळला

Omkar B

मयडेत साडेदहा लाखाचा ड्रग्ज जप्त

Amit Kulkarni

वेर्णातील कलिंगड व अळसांदे शेतकऱयांना योग्य ती नुकसान भरपाई देणार

Patil_p

कुडचडेत पाटकर यांच्या प्रचारात बाळकृष्ण होडारकर यांचा सहभाग

Amit Kulkarni