Tarun Bharat

मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद

सुमारे 30 किलो चांदी, 27 ग्रॅम सोन्याचे दागिने असा 13 लाख 51 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

वार्ताहर/ बोरगाव

कोल्हापूर जिल्हय़ासह कर्नाटक राज्यातील मंदिरात चोरी करणाऱया टोळीला जेरबंद करण्यात कुरुंदवाड पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये एका सोनाराचाही सामावेश आहे. या टोळीकडून 29 किलो 987 ग्रॅम वजनाची चांदी व 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच एक मोटारसायकल असा एकूण 13 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी कुरुंदवाड येथे पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील जैन मंदिरात चोरी करत असताना रामा कोरवी हा पोलिसांच्या हाती लागला होता. त्याच्याकडून पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याने अन्य साथीदारासोबत 2019 व 2020 या सालामध्ये हेरवाड, खिद्रापूर, बस्तवाड, निमशिरगाव, दानोळी, भेंडवडे, मिणचे, किणी, रांगोळी, कबनूर तसेच कर्नाटक राज्यातील एकसंबा येथील श्री जोतिबा मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. यावरून पोलिसांनी सापळा रचून रामा कोरवी याच्याकडून माहिती घेऊन त्याद्वारे संदीप रवींद्र जामदार (रा. तोरणा नगर, इचलकरंजी) याला पकडले. मंदिरात चोरी करून सदर मंदिरातील चांदीचे व सोन्याचे दागिने मोडण्यासाठी दीपक रामू दमाने (रा. कबनूर) यांच्याकडे देत असल्याचे त्याने सांगितले. शिवाय एकसंबा येथील श्री जोतिबा मंदिरातील चोरीची कबुली देऊन सदरची चोरीही त्याने तसेच अनिल बाबासो चौगुले, राहुल भास्कर कांबळे (रा. कोंडिग्रे) यांनी मिळून केली असल्याची कबुली दिली. तसेच चोरी करण्यात आलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची विक्री शामराव बाळू काळूंगे (रा. खानापूर, जिल्हा सांगली) यांच्याकडे केली असल्याची कबुली संशयित आरोपींनी पोलिसांना दिली.

पोलिसांनी त्यांच्याकडून 12 लाख रुपये किमतीचे 29 किलो 978 ग्रॅम वजनाची चांदी, 81 हजार रुपये किमतीचे 27 ग्रॅम सोन्याचे दागिने, 70 हजार रुपयांची मोटरसायकल असा मिळून 13 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल  जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ, पोलीस हवालदार अनिल चव्हाण, अविनाश मुंगसे, शहाजी फोंडे, पोलीस नाईक प्रकाश हंकारे, संतोष साबळे, आसिफ शिराजभाई, पोलीस अंमलदार प्रवीण मोहिते, सागर खाडे, नागेश केरीपाळे, सचिन पुजारी यांच्या पथकाने केली.

Related Stories

महांतेशनगर येथे सोसायटी फोडली

Patil_p

हेस्कॉममध्ये पार पडली तक्रार निवारण बैठक

Patil_p

येळ्ळूर ग्रा. पं. ने सुरू केली ई-बँकिंग सुविधा

Amit Kulkarni

जायंट्स सखीतर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार

Patil_p

आरएफआयडी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी मनपाकडून हालचाली

Patil_p

ज्योतिर्लिंग मंदिरात ज्योतिबाची विशेष पूजा

Amit Kulkarni