प्रतिनिधी/ सातारा
मकरसंक्रांतीचे औचित्य साधुन बाजारपेठा सध्या गर्दीने फुलु लागली आहे. सध्या बाजारपेठेत सणाचे औचित्य साधुन विविध साहित्ये विक्रीस दाखल झाले आहे. त्याची खरेदी करण्यासाठी एकच गर्दी होत आहे. विशेष म्हणजे संक्रांत आली की महिलावर्गांचे हळदी-कुंकुचे कार्यक्रम आलेच यानिमित्त वाण लुटले जातात, त्याची खरेदी करण्यासाठी महिलावर्गांची गर्दी बाजारपेठेत होत आहे.
यंदा विक्रीसाठी आकर्षक असे साहित्य बाजारपेठेत दाखल झाले आहे. त्याचबरोबर यंदा काही महिलांनी तर मास्क, सॅनेटायझर, दिनदर्शीका सारख्या वस्तु वाण स्वरूपात खरेदी केल्या आहेत. त्याचबरोबर संक्रांती सणादरम्यान काळा रंग परिधान केला जातो. यानिमित्त काळय़ा रंगाच्या साडय़ा खरेदीसाठी साडय़ांच्या दुकानात गर्दी झाली होती.
सध्या कोव्हीडचे वातावण बऱयापैकी निवळले असुन, मुख्य म्हणजे कोव्हिड-19 ही लस दाखल झाली आहे. त्यामुळे एक आनंदाचे वातावण सध्या निर्माण झाले आहे. यामुळे नुतन वर्षातील हा पहिला सण मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात येत आहे.