Tarun Bharat

मगो व युती पक्ष सत्तेवर आल्यास गोव्याला कर्जमुक्त करू

आमदार सुदिन ढवळीकर यांचे पत्रकार परिषदेतून आवाहन

वार्ताहर / मडकई

भाजपा व काँग्रेस पक्षाने गोव्याला 20 हजार कोटी कर्जाच्या ओझ्याखाली दबून ठेवलेले आहे. कर्जाचे हे ओझे हटविण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत गेव्यातील जनतेने मगो पक्ष व सोबतच्या युती पक्षाला स्पष्ट बहुमत दिल्यास गोव्यात परिवर्तन होईल. गोव्याला पाच वर्षात कर्ज मुक्त करू तर पहील्या दोन तीन वर्षात हेच कर्ज अर्ध्या टक्यावर आणताना, तळागाळातल्या सामान्य नागरिकांना न्याय देण्याचे मगो पक्षाचे स्वप्नही पुर्णत्त्वास नेऊ. मात्र त्यासाठी गोवेकरांनी व बहुजन समाजाने मगो पक्ष व सोबतच्या युती पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून सत्तेवर आणण्याचे आवाहन मगो नेते, माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी कवळे येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून केले आहे. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक व कवळेचे सरपंच राजेश कवळेकर उपस्थित होते.

  आरोग्यमंत्री विश्वजीत राणे वगळता अन्य कुठलेच मंत्री काम केलेले दृष्टोपत्तीस येत नसल्याची टीका आमदार श्री. ढवळीकर यांनी या परिषदेतून केली. अन्य मंत्र्यांचे कामकाज पाहता त्यांचे खात्याविषयीचे अज्ञान दिसून येत आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मिळणारे महसूल गोळा करण्यास त्यांचे मंत्री असमर्थ ठरत आहे. म्हणूनच सरकारची आर्थिक परिस्थीती ढासळून कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेलेली आहे. मगो पक्षाकडे काम करण्याची इच्छाशक्ती व सामर्थ्य आहे. मगो पक्षाचा गत काळाचा इतिहास त्याचबरोबर विधानसभेचा बावीस वर्षांचा अनुभव मंत्री व आमदार म्हणून असल्याचा दावा आमदार सुदिन ढवळीकर यांनी केला. त्यामुळे आपण सर्व महसूल गोळा करून खात्यांना व्यवस्थित न्याय देऊन गोव्याचे कर्ज अर्ध्या टक्यावर आणण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी गोव्याचे भाग्य विधाते व पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर व शशिकलाताई यांनीच गोव्याचा विकास केलेला आहे. भाऊनी केलेले म्हादईचे नियोजन आणि पूढील सर्व प्रक्रीया ताईनी पूर्ण करून राबविलेले अन्य प्रकल्प आजही विकासाची साक्ष देत आहे. मात्र त्यानंतर सत्तेवर आलेल्या एकही मुख्यमंत्र्यांनी नवीन प्रकल्प हाती घेतलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. छडयंत्र रचून म्हादई आटवण्यास भाजपा व काँग्रेसने केलेले प्रयत्न जनतेच्या स्मरणात असल्याचे ही त्यांनी सांगितले.

कोविड विषयी सरकार निद्रीस्त

कोवीड झपाटय़ाने वाढत असताना सरकारने झोपेचे सोंग वठवलेले आहे. दिल्लीत एकाच दिवसात 17 हजार रूग्ण सापडले. गोव्यात पर्यटकांचा वाढता ओघ व मुक्त संचार पाहून दिल्ली सारखी परिस्थीती गोव्यातही होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. एकदम छोटे राज्य असलेला गोवा संपण्यास वेळ लागणार नाही. एका दृष्टीने पाहील्यास आरोग्यमंत्री विश्वजीत राणे एकटेच काम करीत आहे. मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कोवीड विषयी गांभीर्य दाखविण्यास व तात्काळ निर्णय घेण्यास असमर्थ ठरत आहे. मंत्री दयानंद सोपटे यांचा वाढदिवस साजरा करताना मुख्यमंत्र्यांनी कोवीड विषयीच्या मार्गदर्शक तत्वांचे किती पालन केले ते गोव्यातील जनतेने अनुभवलेले आहे. 144 कलमाचा भंग खुद्द मुख्यमंत्र्यांनीच केलेला आहे. सामाजिक अंतर व मास्क न लावणे ही मार्गदर्शक तत्त्वे त्यांनी या वाढदिवसाला धाब्यावर बसवली. सार्वजनिक कार्यक्रम, नाटके, लग्न समारंभ, वाढदिवस, सभा घेताना पन्नास शंभरच्या वर माणसे उपस्थित असू नये. हे अधेरेखीत करताना रात्री कर्फ्यु अथवा लॉकडाऊन करण्याची मागणी आमदार श्री. ढवळीकर यांनी केलेली आहे. विविध आस्थापने, हॉटेल, मॉल, औद्योगीक वसाहत आदी ठिकाणी रूग्ण सापडत आहे. संबंधित आस्थापने व हॉटेल मॉल यांनी  वॅक्सीन विकत घेण्याची परवानगी मागितल्यास सरकारने ती देऊन त्यांच्या कर्मचाऱयांचा जीव वाचवावा अशी मागणी ही त्यांनी या पत्रकार परिषदेतून केलेली आहे.

100 कोटींची गरिबांना मदत करा

महाराष्ट्रातील विद्यमान सरकारने 5 हजार 500 कोटी गरिब घटकांसाठी देण्याचे घोषीत करताच भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ही मदत नगण्य असल्याची टीका करतात हे कितपत योग्य आहे. स्वतःच्या पायाखाली आधी पहा. मगच दुसऱयांवर टीका करा असा सल्ला देऊन आमदार ढवळीकर म्हणाले की, आतापर्यंत गोव्यातील रेंदेर, पाडेली, टॅक्सी, रिक्षा चालक, फुले, फळे व भाजी विक्रेते या तळागाळातल्या सामान्यजनासाठी तुम्ही किती मदत केली ते अगोदर सांगा. तळागाळातल्या या गरीब घटकांकरीता गोव्याच्या अंदाज पत्रकात किमान 100 कोटींची तरदुत करा अशी मागणी करूनही तुम्ही गरीब जनतेला न्याय देऊ शकला नसल्याचा आरोप आमदार श्री. ढवळीकर यांनी केलेला आहे.

मगो पक्ष टॅक्सीवाल्यांच्या पाठीमागे

टक्सीवाल्यांनी मिटर बसवला नाही म्हणून त्यांच्यावर अन्याय करता येणार नाही. त्यांना आणखी एकदा संधी देऊन त्यांच्याही समस्या ऐकून त्या सोडविण्याची आवश्यकता आहे. आपण व मगो पक्ष टॅक्सीवाल्यांच्या पाठीमागे आहे. आपण वाहतुक मंत्री असताना त्यांनी मिटर बसवावा अशी विनंती केली होती. पण त्यांनी तो बसवीला नाही म्हणून आपण त्यांच्यावर राग धरलेला नाही. ते ही भूमातेचेच सुपूत्र आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी आमदार श्री. ढवळीकर यांनी सरकारकडे केलेली आहे.   गोंय, गोंयकारपण टिकवायचे असेल तर दिल्लीतील पक्षाला गोव्यात स्थान देऊ नका, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Related Stories

संरक्षणात स्वदेशीचा विस्तार महत्वाचा

Omkar B

शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानात चौथा श्रावणी रविवार भक्तीभावाने

Amit Kulkarni

सरकारने नोकऱयांसाठी पैसे घेतल्याचे सिध्द करून दाखवा

Patil_p

मनोहर पर्रीकर यांची आज जयंती

Amit Kulkarni

कामत, लोबो अपात्रताप्रकरणी शुक्रवारी अंतिम सुनावणी

Amit Kulkarni

कुडचडे मतदारसंघात नीलेश काब्राल यांच्यासमोर वाढत्या समस्या

Amit Kulkarni