Tarun Bharat

मच्छेतील मराठी-कन्नड शाळांना हेस्कॉमची नोटीस

इमारतींना लागून 110 केव्ही वीजतारा गेल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका : पालकवर्ग चिंताग्रस्त : प्रशासनाकडून मात्र दुर्लक्ष

आण्णाप्पा पाटील /बहाद्दरवाडी

लक्ष्मीनगर, मच्छे येथील मराठी-कन्नड शाळांच्या इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. या दोन्ही शाळांच्या इमारतींजवळून 110 किलोवॅटच्या वीजतारा गेलेल्या आहेत. हेस्कॉमकडून दोन्ही शाळांना स्थलांतर करण्याची नोटीस आली आहे. यामुळे पालकवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. प्रशासनाचे या दोन्ही शाळांकडे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी एसडीएमसी कमिटी व पालकवर्गांतून होत आहेत.

दोन्ही शाळांना 110 किलोवॅट विद्युततारांचा धोका तर आहेच. याशिवाय मराठी-कन्नड या दोन्ही शाळांना क्रीडांगण नसल्याने रस्त्यावरच प्रार्थना भरविली जाते. खेळासाठीदेखील रस्त्याचाच आधार घ्यावा लागतो. या रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने धावत असतात. यामुळे दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका आहेच, अशी माहिती पालकांनी दिली.

हेस्कॉमकडून शाळा स्थलांतरित कराव्यात, अशा नोटिसा आलेल्या आहेत. शाळांना क्रीडांगण नाही. वर्गखोल्या अपुऱया आहेत. या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी रविवार दि. 30 डिसेंबर रोजी दोन्ही शाळांमधील एसडीएमसी कमिटीचे सदस्य व पालकवर्ग जमले होते.

मराठी व कन्नड शाळांच्या जवळच निराधार केंद्राला देण्यात आलेली जागा आहे. या केंद्राच्या बाजूला दोन्ही शाळांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गेल्या पाच-सहा वर्षांपासून करण्यात येत आहे. आताही आमची मागणी तीच असून जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींना भेटून या समस्येबाबत सांगण्याचे पालकवर्गांनी ठरविले.

प्राथमिक शाळेपासूनच खऱया अर्थाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला प्रारंभ होतो. प्राथमिक शाळा सर्वसोयींनी युक्त असणे गरजेचे आहे. काही शाळा डिजीटल होऊ लागल्या आहेत. मात्र लक्ष्मीनगर, मच्छे येथील मराठी व कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांना रोजच जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. या शाळेच्या इमारतींना लागून वीजभारित तारा गेल्या आहेत. क्रीडांगणाचा अभाव, विद्युततारांचा धोका, अपुऱया वर्गखोल्या याबाबत अनेक वेळा ग्रा.पं.ला निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, ग्रा.पं.ने शाळा विद्यार्थ्यांचा अद्यापही विचार केला नाही. यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या 106 आहे. पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग आहेत. मात्र, शाळेला केवळ दोनच खोल्या आहेत. एकाच खोलीत दोन दोन इयत्तांचे विद्यार्थी बसविण्यात येत असल्यामुळे शिकविताना अडचण निर्माण होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानसुद्धा होते, अशी माहिती पालक व शिक्षकांनी दिली. 

मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या 150 असून पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. मुख्याध्यापकांसह चार शिक्षक आहेत. दोन्ही शाळांचे मिळून 256 विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. दोन्ही शाळांच्या बाजूने गेलेल्या वीजतारांच्या धोक्मयामुळे हेस्कॉमकडून शाळा स्थलांतराची नोटीस आल्यामुळे शाळांचे अस्तित्व धोक्मयात आल्याने पालकवर्गाची झोप उडाली
आहे.

कन्नड-मराठी दोन्ही शाळांच्या इमारतींजवळच गायरान जमीन आहे. 1950 साली सरकारने येथील 42 एकर जमीन संपादन केली आहे. तेथे निराधार केंद्र बांधले, अशी माहिती देवस्थान पंच कमिटीच्या सदस्यांनी दिली. या जागेत लक्ष्मीनगरमधील दोन्ही शाळांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

प्रशासनाकडून सरकारी प्राथमिक शाळांच्या अपेक्षा

अलीकडे खासगी शाळांचा मोह साऱयांनाच आहे. त्यामुळे काही पालक खासगी शाळांना आपल्या मुलांना पाठवून देत आहेत. मात्र सरकारी शाळा या सर्वसामान्य नागरिकांसाठी आहेत. सरकारी शाळांसाठी प्रशासनाकडून अजूनही योजना पुरविण्याची गरज आहे. मराठी व कन्नड या दोन्ही शाळांच्या बाजूने धोकादायक वीजतारा गेलेल्या आहेत. हेस्कॉमकडून नोटीस आली आहेत. बाजूला असलेल्या निराधार केंद्राच्या बाजूला दोन्ही शाळांसाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशी आमची मागणी आहे.

  – शांताराम पाटील   (एसडीएमसी कमिटी अध्यक्ष, मराठी शाळा)

 सरकारने आम्हाला सहकार्य करावे

दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांना आता कुठे बसवायचे, असा गंभीर प्रश्न आमच्यासमोर उभा ठाकला आहे. राज्य सरकारकडून शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, ग्रामीण भागातील शाळांकडे कानाडोळा होत आहे. शाळांना क्रीडांगण नसल्यामुळे विद्यार्थी रस्त्यावरच खेळत असतात. मात्र, वाहनधारक बेफाम धावत असतात. याचा धोका तर आहेत, याशिवाय वीजभारित तारांना स्पर्श होऊन एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? सरकारने येथील विद्यार्थ्यांचा विचार करून बाजूची जागा देण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे.

– बसवराज तिप्पनगोळ (एसडीएमसी कमिटी अध्यक्ष, कन्नड शाळा)

Related Stories

शारदोत्सवच्या ऑनलाईन काव्य शाळेत डॉ. संध्या देशपांडे आज विचार मांडणार

Patil_p

गणेश विसर्जनादिवशीही विजेचा लपंडाव

Amit Kulkarni

हिंडलगा येथे ग्रामविकास लोकशाही आघाडीची बाजी

Omkar B

राज्यसभेसाठी ईराण्णा कडाडी यांचा अर्ज दाखल

Patil_p

अर्धवट कामे मार्चपर्यंत तातडीने पूर्ण करा

Omkar B

रस्ता बनला पार्किंग तळ, वाहनधारकांची तारांबळ

Patil_p