Tarun Bharat

मज फूलही रुतावे…

Advertisements

दिवंगत कवयित्री शांताबाई शेळके यांना महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे दुःख फार पूर्वीच समजले होते की काय किंवा पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी दादांचेच दुःख स्वरबद्ध  केले की काय असे वाटावे, इतका ‘काटा रुते कुणाला’ या काव्याचा दैवयोग सध्या जुळून आला आहे. अर्थात जे दुःख नागपूरला वाटते तेच कोल्हापूर व्हाया पुणेला वाटते आहे हाही एक दैवयोगच! त्यामुळेच ‘काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी, मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे…’ असे म्हणायची वेळ आली आहे. मुंबईच्या अरबी समुद्राला लागून असलेल्या, आँग्लतेजोधारी राजभवनात गेल्या काही वर्षांमध्ये डोईवर काळी पगडी परिधान करून, संस्कृत श्लोक उद्धृत करत देवभूमीतले तपस्वी विराजमान झालेले आहेत. अशा तपस्वींची भेट घेण्यासाठी बद्रीनाथ, केदारनाथाची अथवा संपूर्ण चारधामाची फेरी न करता दर्शनाचा लाभ मुंबापुरीत मिळत असेल तर तो कोण घेणार नाहीत? 2019 साली ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तरी इथल्या तपस्वींच्या भेटीला जाणाऱयांची रीघ कधी कमी झालेलीच नाही. भल्या पहाटे दर्शनाला जाऊन सत्ताप्रसाद प्राप्त केलेल्यांना तो पचवता आला नाही. तीन दिवसात अजीर्ण होऊन त्यांना राजयोग त्यागावा लागला. त्यानंतर थेट तपस्वांना शिवतीर्थावर पाचारण करून त्यांच्या सात्विक संतापाला सांभाळत, त्रय रूपातील आघाडीने सत्ताप्रसाद प्राप्त केला. तपस्वींची मोठीच आत्मवंचना झाली. पण, विरोधकर्त्यांनाही यानिमित्ताने तपस्वींचा राजप्रासाद खुला झाला. कधीही उठावे आणि मित्र पक्षांसह राजप्रासादात जाऊन ‘हे सरकार बरखास्त करा’ अशी मागणी करावी आणि तपस्वींनी मुखकमलावर पुसटशीही नाराजी न दर्शवता त्याच त्या पद्धतीचे निवेदन स्वीकारत रहावे.  एकाच पक्षाच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत कार्यरत विविध सुखावह आणि भयावह चेहऱयांना सहजावरी प्रवेश द्यावा आणि त्यांचे ते निवेदन ठेवून घ्यावे. पूर्वीचे पक्ष सोडून ऐन निवडणुकीत पक्षात आलेल्यांना ‘लवकर सत्ता बदल होईल हो’, असे सांगून धीर द्यावा, त्यांचेही निवेदन स्वीकारावे असा नित्यक्रम गेली सतरा महिने सुरू आहे. अर्थात अशा नीरस मागण्यांच्या सुरस निवेदनांव्यतिरिक्तही एखादी हिमाचली थंड हवेची झुळूक त्या समुद्री दमट हवामानाला पार करत येऊन गेल्याचा सुखानुभव राजप्रासादाने अनुभवला. नाहीतर इतर कैफियती केवळ आणि केवळ राजकीय स्वरूपाच्याच असायच्या. त्याला कलापूर्ण करण्याचे काम मुंबई महापालिकेच्या आततायी बुलडोजरमुळे होऊ शकले. नाहीतर राजभवनाच्या हिरवळीची फुलेही आक्रंदतच होती. सोमवारी ती जराशी शहारली. ती वेगळय़ाच कारणाने. पण, तेव्हा गवतांना सुद्धा भाले फुटले आणि साक्षात ज्यांनी दसऱयाला शस्त्र उगारले होते तेच संगतीला पूर्व टीकाकारांचा गोतावळा जमवून शरण भावे विनंतीचे पत्र घेऊन राजप्रासादी दाखल झाले. हा मध्ययुगीन भारत असता तर तपस्वींनी ‘हात रुमालात बांधुनिया यावे’ असा कडक आदेश दिला असता. पण साथरोग नियंत्रणाचा कार्यक्रम सुरू असताना हात धुऊन त्यांना आत घ्यावे लागले. तरीही त्यांना झुकत यावे लागले हा तपस्वींच्या चाणक्मयनीतीचा किती मोठा विजय? याचसाठी केला होता अट्टाहास…. हे तुकोबांचे काव्य अलीकडेच तपस्वींनी मुखोद्गत केलेले…. आज तो दिस गोड झाला… अशाच क्षमाशील भावनेने त्यांनी स्वागत केले होते. साक्षात प्रधानमंत्रीजींना आपली भावना पोहोचवा अशी ती विरोधी तळमळ ऐकताना तल्लीन होऊन तपस्वींचे देहभान हरपले होते. या राजप्रासादाचे महत्त्व अखेर विरोधकांना समजले, इतकेच नव्हे तर एका छोटय़ाशा राज्याचे ते सत्ताधारी असले तरी सर्वशक्तिमान कोण आहेत आणि दिल्लीश्वरांच्या इच्छेखेरीज आरक्षणाचे पानही हलणार नाही याची त्यांना पुरती जाणीव झाल्याचे आनंददृश्य त्यांनी आपल्या मनीमानसी मुरवण्यास सुरुवात केली होती. या शरणागत भावाने आलेल्या त्रयमूर्ती मंडळींच्या मागणीचा अहवाल केव्हा एकदा गृहमंत्रालयाला पाठवेन असे त्यांना झाले होते. ‘तुमचे दर्शन झाले, आता दिल्लीचेही दर्शन घेऊ’ असे त्रयमुर्ती प्रमुख म्हणाले आहेत. म्हणजे दिल्लीचे द्वार किती दिवस किलकिले करायचे नाही याचा अहवाल आपण स्वतंत्ररीत्या पाठवू आणि आपल्या कामगिरीने त्यांना कसे वठणीवर आणले आहे याचा सारा लेखाजोखा मांडू असे तपस्वींनी ठरवले होते. पण कमळाच्या दुसऱया फुलाने अचानक इतके फुगून दाखवले की त्यामुळे तपस्वींचे मनसुमन अगदीच कोमेजून गेले. गृहमंत्री ‘शहा’जींना प्रिय असलेले दादा अचानक त्या कृतीवर उखडले. ‘पंढरपूरला जायचे तर गोव्याच्या एसटीत बसून चालत नाही’ अशी टीका त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर केली. म्हणजे त्यांना समुद्राकाठी राहणारे आम्ही गोवेकर वाटलो की काय? म्हणजे आम्ही इथे नुसतेच सुशेगाद आहोत असे त्यांना म्हणायचे होते का? राजभवनाच्या हिरवळीवरसुद्धा कमळ फुललेले त्यांना दिसले नाही, की, ते फूलही त्यांना रुतले? या विवंचनेत राजभवनाची सायंकाळ बुडाली…. राजभवनाच्या किनाऱयाला येऊन थडकणाऱया लाटांप्रमाणे तिकडे नागपूरच्या अंबाझरी तलावातसुद्धा पाणी उसळत होते. तलावा शेजारच्या रम्य उद्यानात उभे राहून कोणी गीत गात होते…. ‘सांगु कशी कुणाला, कळ आतल्या जीवाची, चिरदाह वेदनेचा, मज शाप हाच आहे… काही करु पहातो, रुजतो अनर्थ तेथे, माझे अबोलणेही विपरीत होत आहे….’ आता आपल्याला न विचारताच दिल्लीधिशांशी चर्चा घडणार…असे फडणविसांना वाटून गेले असावे. आपण आपल्या सत्ताकाळात ‘त्यांचा’ मान-पान राखला. पण जेव्हा ते सत्तेवर आलेत, तेव्हा आपल्याला घेऊन जातो म्हणून सांगत पुन्हा एकटेच जाण्याची तयारी करत आहेत. ‘हा स्नेह, वंचना की, काहीच आकळेना, आयुष्य ओघळुनी, मी रिक्त हस्त आहे…ं असे त्यांना भासून गेले. सुरुवात आपल्यापासून झाली आणि आपल्याला सोडून सगळे होत आहे….असेच त्यांना वाटत असावे. इकडे दादांना फुल का रुतले? त्याची कथा निराळीच होती. हे सारे जुळवून आणण्यासाठी आपण राबलो. पण शेवटी विद्यार्थी परिषद म्हणजे बाहेरचीच! त्या कष्टाचे माप कधी आपल्या पदरात पडलेच नाही. आता सत्ता बदलल्यानंतर किमान जुन्यांच्या अपयशाची आठवण करून द्यावी आणि आरक्षण मिळवायचे तर ‘प्रोसेस’ काय हे फक्त आपल्यालाच माहिती आहे हे समस्त राजा अन् प्रजाजनांना समजावे. एवढय़ावर संपले नाही हे एकदा कळावे म्हणूनच दादांना ते फूलही रुतले..

Related Stories

महसुलाविना राज्य कारभार हाकणे झाले मुश्कील!

Patil_p

संभाजीराजेंची लढाई

Patil_p

घरमालक-भाडेकरू प्रश्नी पोलिसांची बेफिकीरी धोक्याची

Patil_p

काँग्रेसचे ‘ग्रहण’

Patil_p

कोरोनावर मात करण्यासाठी हवी देशभावना!

Patil_p

गोविंदा आला रे

Patil_p
error: Content is protected !!