Tarun Bharat

मडगावातील मजुरांची वाढती वर्दळ ठरतेय चिंतेचा विषय

कोरोनाच्या फैलावाला कारणीभूत ठरण्याची भीती, बहुतांश मजूर नावेलीच्या आसरास्थळातील असल्याचा दावा, अधिकारिणींकडून दुर्लक्ष

प्रसाद नागवेकर / मडगाव

सध्या लॉकडाऊन व 144 कलम लागू असल्याने संचारबंदी आहे. मात्र मडगावच्या शहरी भागातील पालिका चौक परिसरात परप्रांतीय मजुरांची वर्दळ चालूच असल्याचे व त्यांच्यावर कोणतीही कारवाई संबंधित अधिकारिणींकडून होत नसल्याचे दिसून येत आहे.

मडगाव पालिका इमारतीच्या आजुबाजूला तसेच पालिका उद्यानात व उद्यानाच्या बाहेरील बाकडय़ांवर हे मजूर बसलेले आढळून येत आहेत. बेघर परप्रांतीय मजुरांना नावेली येथील इनडोअर स्टेडियममध्ये आसरा देण्यात आला असता पालिका चौकात गोळा होणारे हे मजूर कोणते, असा सवाल मडगाववासीय उपस्थित करू लागले आहेत.

मडगाव पालिका चौकात बिगरसरकारी संस्थेतर्फे मजुरांच्या जेवणाची सोय करण्यात येत असते. गाडी घेऊन येऊन ते जेवणाची पार्सल्स या मजुरांना देत असतात. मजूर रांगेत उभे राहत असले, तरी त्यांच्यात अंतर राहत नसल्याने सोशल डिस्टन्सिंग बाजूलाच राहत असते. त्यामुळे या मजुरांमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

बारच्या शोधात मडगावात ?

त्यातील बहुतांश मजूर हे नावेलीत आसरा घेतलेल्यांपैकी असल्याचा काहींचा दावा आहे. पालिका चौकात तसेच नंतर ते नावेलीतही जेवण घेतात, असे सांगण्यात येते. सदर मजूर नावेली स्टेडियममधून येत असल्यास त्यांना तेथून बाहेर कोण सोडतो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इनडोअर स्टेडियममध्ये ठेवण्यात आलेल्या कित्येक मजुरांना दारूचे व्यसन असून चोरमार्गाने खुले असलेले बार शोधत ते मडगावपर्यंत पोहोचत असल्याचे सांगण्यात येते.

कारवाई करण्याची मागणी

या मजुरांना असे मोकळे सोडले गेल्यास ते कोरोनाच्या फैलावास कारणीभूत ठरू शकतील. त्यामुळे संचारबंदी असताना मोठय़ा संख्येने मडगावात गोळा होणाऱया या मजुरांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी मडगाववासीय करत असून जिल्हाधिकाऱयांनी यात लक्ष घालण्याची मागणीही होत आहे. या मोकाट फिरणाऱया मजुरांपैकी एकालाही कोरोनाचा संसर्ग झाल्यास व नंतर नावेलीतील आसरा देण्यात आलेल्या ठिकाणी तो गेल्यास सदर आसरास्थळात सुमारे 450 जण राहत असल्याने दिल्लीतील निजामुद्दीनसारखी स्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

म्हापशात आज विधिता केंकरेचा गायनाचा कार्यक्रम

Amit Kulkarni

गोव्याचे उत्तर प्रदेश बनवायचे आहे काय ?

Patil_p

सरकारच्या गोमंतकीयविरोधी धोरणांना विरोध करण्याची गरज

Patil_p

पार्सेत दयानंद सोपटे यांचे शक्तीप्रदर्शन

Amit Kulkarni

मुरगाव पालिका मंडळ सुस्त, मरगळ झटकण्याची लोकांना प्रतिक्षा, समस्यांमुळे लोकांमध्ये उबग

Amit Kulkarni

वाठादेव सर्वण येथील खुनप्रकरणी पतीला अटक

Patil_p