Tarun Bharat

मडगाव-काणकोण महामार्ग दुरूस्त करण्यासाठी 1 मार्च पर्यंत मुदत

Advertisements

अन्यथा राष्ट्रीय महामार्ग 66 रोखू

प्रतिनिधी / मडगाव

मडगाव ते काणकोण राष्ट्रीय महामार्ग 66ची पूर्णवाताहात झाली आहे. हा राष्ट्रीय महामार्ग दुरूस्त करणे आवश्यक बनले असताना देखील सार्वजनिक बांधकाम खात्याने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. हा राष्ट्रीय महामार्ग दुरूस्त करावा अशी मागणी करून काणकोणमधील काँग्रेस व गोवा फॉरवर्डच्या कार्यकर्त्यांनी काल गुरूवारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालून जाब विचारला.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते व कंत्राटदार यांच्यात साटेलोटे असल्यानेच या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली दोन वर्षे मार्गी लागलेले नाही असा आरोप यावेळी गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक यांनी केला. दोन वर्षापूर्वी म्हणजे ऑक्टोंबर 2020 मध्ये या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. कंत्राटदाराने काम सुरू करावे यासाठी वर्क ऑर्डर सुद्धा काढण्यात आलेली आहे. परंतु, कंत्राटदार विविध कारणे पुढे करून प्रत्यक्षात काम सुरू करण्यास राजी होत नाही.

मडगाव ते काणकोण रस्त्याची पूर्णवाताहात झालेली आहे. रस्ता खराब झाल्याने, या राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघाताची मालिकाच सुरू आहे. करमल घाटात तर दररोज अपघाताची नोंद होत असते. हा राष्ट्रीय महामार्ग नसून तो अपघाताचा महामार्ग बनला आहे असे काँग्रेसचे नेते जनार्दन भांडारी म्हणाले.

गरोदर महिला तसेच मूत्रपिंड रूग्ण काणकोणहून मडगावला वैद्यकीय उपचारासाठी येतात, त्यांना या खराब रस्त्यामुळे किती त्रास होत असतील याचा कोणी कधी विचार केला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना जनतेचे काहीच पडून गेलेले नाही असा आरोप यावेळी करण्यात आला. रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येईल यासाठी बरेच दिवस वाट पाहिली. परंतु, कोणीच हालचाल करीत नसल्याने आज कार्यकारी अभियंत्याला घेराव घालावा लागला असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

1 मार्च पर्यंतची मुदत

मडगाव ते काणकोण या राष्ट्रीय महामार्गाचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याला 1 मार्च पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे आणि जर या मुदतीच्या काळात काम सुरू झाले नाही तर राष्ट्रीय महामार्ग 66 रोखून धरला जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. महामार्ग केवळ एकाच ठिकाणी नव्हे तर किमान दहा ठिकाणी रोखला जाईल. रस्ता रोखो करण्यापासून कोणीच काणकोणकरांना रोखून धरू शकणार नाही असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.

कंत्राटदाराची उडवा उडवीची उत्तरे

फातोर्डा येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता दत्तप्रसाद कामत यांनी काणकोणहून आलेल्या काँग्रेस व गोवा फॉरवर्ड कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकून घेतले. या महामार्गाचे डांबरीकरण करण्यासाठी ऑक्टोंबर 2020 मध्ये निविदा काढण्यात आली. त्यानंतर कंत्राटदाराला काम सुरू करण्यासाठी वर्क ऑर्डर देण्यात आली. परंतु, कंत्राटदार अनेक कारणे सांगून काम सुरू करीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अभियंता श्री. कामत यांनी मोबाईलवरून कंत्राटदाराकडे संपर्क साधला. तुम्ही काम सुरू करीत नसल्याने आपल्याला विनाकारण घेराव घालण्यात आलेला आहे. तसेच आपल्यावर नाहक आरोप होत असल्याचे सांगितले. मात्र, कंत्राटदाराकडून उडवा उडवीची उत्तरे मिळू लागली. यावेळी काणकोणहून आलेल्या काँग्रेस व गोवा फॉरवर्डच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे बोलणी केली व त्वरित त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्यात उपस्थित रहावे असे सांगितले. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना मोबाईलवरूनच जाब विचारला.

कंत्राटदाराला काळय़ा यादीत टाका कंत्राटदार सहकार्य करीत नसल्याने त्याला काळय़ा यादीत टाकावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. या कंत्राटदाराला आपण अनेक स्मरणपत्रे पाठविली तरी तो दाद नसल्याचे अभियंते श्री. कामत यांनी सांगितले. आत्ता स्मरणपत्रे नको, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांना काळय़ा यादीत टाका अशी मागणी  करण्यात आली.

Related Stories

सत्तरीत दहा बांगलादेशींना अटक

Omkar B

खडी क्रशर, कचरा शेड व सचिवांच्या गैरव्यवहाराचा मुद्दा बेतोडा ग्रामसभेत गाजला

Amit Kulkarni

पटवर्धन यांचा बळी घेतलेला झारखंडचा आरोपी जामीनमुक्त

Omkar B

विहिरीत उडी मारून वृद्धाची आत्महत्या

Omkar B

तेजस शिरोडकरला सम्राट स्टुडंट पुरस्कार प्रदान

Amit Kulkarni

नेरूल येथील मोबाईल टॉवरविरोधात ग्रामस्थ रस्त्यावर

Omkar B
error: Content is protected !!