Tarun Bharat

मडगाव – नावेली चौपदरी रस्त्यालगत इमारतींतील रहिवाशांना दिलासा

सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मलनिस्सारण जोडणीच्या कामांसाठी ना हरकत दाखला

प्रतिनिधी /मडगाव

सार्वजनिक बांधकामखाते (एनएच) कडून बहुप्रतीक्षित ‘एनओसी’ अखेर जारी करण्यात आली आहे, ज्यामुळे मडगाव-नावेली चौपदरी रस्त्यालगत असलेल्या अनेक निवासी इमारतींना दिलासा मिळाला आहे. या इमारतींना अद्याप मलनिस्सारण जाळय़ाशी जोडणे बाकी आहे. सार्वजनिक बांधकाम खाते विभाग 14 (एनएच) च्या कार्यकारी अभियंत्याने ‘एसआयडीसीजीएल’ला जारी केलेल्या ‘एनओसी’च्या आधारे मलनिस्सारण विभागाला रस्त्याच्या कडेला असलेल्या निवासी इमारतींची कनेक्टिंग लाईन टाकण्यासाठी रस्ता कापण्यास परवानगी देण्यात आली आहे.

विविध निवासी सोसायटय़ांच्या पदाधिकाऱयांसमवेत प्रसारमाध्यमांना संबोधित करताना सावियो कुतिन्हो यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले. आम्ही चौपदरी रस्त्यालगतच्या निवासी इमारतींना मलनिस्सारण जोडणी मिळण्यासंदर्भात मलनिस्सारण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत आलो होतो. येथील रहिवाशांना खरोखरच मोठा दिलासा मिळाला आहे. कारण त्यांना मडगाव पालिका आणि नागरी आरोग्य केंद्राकडून पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा देऊन नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.

मडगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष व प्रभागाचे माजी नगरसेवक कुतिन्हो म्हणाले की, पाणीपुरवठा खंडित होण्याच्या भीतीने रहिवाशांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी रहिवाशांची बाजू घेतली आणि संबंधित अधिकाऱयांना आवश्यक निवेदने दिली. येथील सर्व रहिवासी नागरी कर्तव्याच्या दृष्टीने जागरूक आहेत आणि त्यांना नाल्यांमध्ये सांडपाणी सोडून प्रदूषण आणि आरोग्यास धोका निर्माण करायचा नाही. त्यांनी मलनिस्सारण जोडणीसाठी तीन वर्षांपूर्वी एप्रिल, 2019 मध्ये अर्ज केला होता. मात्र पीडब्ल्यूडीकडून एनओसी न मिळाल्याने कामे हाती घेण्यात आली नाहीत, असे सांगून कुतिन्हो यांनी खेद व्यक्त केला.

या रस्त्यासाठी हॉटमिक्स कार्पेट एप्रिल, 2021 मध्ये पालिका निवडणुकीदरम्यान टाकण्यात आले होते. तथापि, मलनिस्सारण जोडणीसाठी अर्ज एप्रिल, 2019 मध्ये करण्यात आला होता. तेव्हा रस्ता कापण्याच्या वेळेसाठी रहिवाशांना जबाबदार धरले जाऊ नये. विविध विभागांमधील समन्वयाचा अभाव येथे दिसून येतो, असेही ते पुढे म्हणाले. आता साबांखा (एनएच) द्वारे जारी केलेली ‘एनओसी’ 15 मे, 2022 पर्यंत वैध आहे. त्यामुळे आम्ही मलनिस्सारण विभागाला विनंती करतो की, त्यांनी कामे युद्धपातळीवर हाती घ्यावीत, जेणेकरून ‘एनओसी’ची वैधता संपल्यावर होणारी पुढील गुंतागुंत टाळता येईल, असे कुतिन्हो यांनी सांगितले. आता हाती घेतलेले काम झाल्यावर जोस्मा रॉयल कॉम्प्लेक्स, आयेशा कॉम्प्लेक्स, कामत कॉम्प्लेक्स आणि गुरुदास केटरर्स या चार इमारतींना नंतर जोडणी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

रविवारी राज्यात 11365 जणांचे लसीकरण

Amit Kulkarni

कुप्रसिद्ध गुंड अन्वर शेख याला खांडोळा येथून अटक

Patil_p

अमली पदार्थ हा भाजपचा कौंटुबिक व्यवसाय

Omkar B

कला मंदिरची महिला संगीत नाटय़ स्पर्धा 8 डिसें. पासून

Amit Kulkarni

दमदार पावसाचा सत्तरी तालुक्याला जोरदार फटका

Amit Kulkarni

काणका येथे 4 वाहनांवर झाड पडून नुकसान

Amit Kulkarni