ऑनलाईन टीम / इंफाळ :
म्यानमार सीमेजवळ असलेल्या मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यात दहशतवाद्यांनी आसाम रायफल्सच्या जवानांवर घातकी हल्ला केला. या हल्ल्यात आसाम रायफल्सच्या तीन जवानांना वीरमरण आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी रात्री उशिराने मणिपूरची राजधानी इंफाळपासून सुमारे 100 किमी दूर असलेल्या चांडेलमध्ये घडली. पीपल्स लिबरेशन आर्मी या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असून, यात सहा जवानही गंभीर जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी आधी आयईडीचा स्फोट घडवून आणला. जखमी जवानांना इंफाळच्या पश्चिम जिल्ह्यात असलेल्या मिलिटरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या दहशतवाद्यांनी पहिल्यांदा बॉम्ब स्फोट घडवून आणला आणि त्यानंतर जवानांवर गोळीबार केला. हल्ल्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांच्या शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरु केली आहे. त्याचबरोबर भारत-म्यानमार सीमेवरील सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.