Tarun Bharat

मतदानावेळी येणारा जातीयवाद मोडून काढा

राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मतदारांना आवाहन

प्रतिनिधी/ पणजी

मतदान हे लोकशाहीतील सर्वात मोठे शस्त्र असून कोणत्याही आश्वासनाला बळी न पडता पारदर्शकपणे मतदान केले पाहिजे. परंतु आता पैशांच्या बळावर व जातीयवाद या दोन गोष्टींमुळे मतदानाचे महत्त्व कमी होत आहे. जातीयवाद विरोधात आम्ही लढा दिला पाहिजे असे, मत राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी व्यक्त केले.

गोवा मुख्य निवडणूक आयोग व जिल्हा निवडणूक कार्यालयातर्पे कला अकादमीच्या सभागृहात आयोजित दहाव्या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत मुख्य सचिव परिमल राय, राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव, मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण सावंत उपस्थित होते.

देशात अजूनही जातीयवाद हा निवडणुकीतील मोठा धोका आहे. जातीयवादावर मतदान केले जात आहे तर काही ठिकाणी पैशाच्या जोरावर मतदार खरीदले जातात हे लोकशाहीला घातक आहे. मतदान हे पारदर्शक होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मतदानाचा हक्क हा सर्वांना समान आहे. त्यामुळे आम्ही त्या हक्कांचा योग्य वापर केला पाहिजे. कुणालाही न घाबरता मतदान केले पाहिजे. जे लोक मतदान करत नाहीत त्यांना त्यांचा हक्क बजावून सांगितला पाहिजे, असे राज्यपाल म्हणाले.

गोव्यात सुशिक्षित मतदार

मतदानाच्या वेळी इतर राज्यात जशा घटना घडतात तशा गोव्यात घडत नाही गोव्यात लोक सुशिक्षित असून आपल्या जबाबदारीने मतदान करतात. आता गोव्यात लवकरच जिल्हा पंचायतीची निवडणूक होणार आहे. यात गोमंतकीयांनी न चुकता मतदान करावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.

न चुकता मतदान कराः राय

घटनेने आम्हाला मतदानाचा समान अधिकार दिला आहे. जाती, धर्म, भाषा, गरीब, श्रीमंत सर्वाना मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही न चुकता मतदान केले पाहिजे. निवडणूक कार्यालय मतदानाविषयी मोठय़ा प्रमाणात जागृती करत असते. आम्ही आमची जबाबदारी पार पाडली पाहिजे. एक चांगले सरकार बनविण्यासाठी आम्ही जबाबदारीने मतदान केले पाहिजे, असे मुख्य सचिव परिमल राय यांनी सांगितले.

भारत लोकशाहीतील मोठा देश

आमचा देश लोकशाहीत सर्वात मोठा देश आहे. तसेच जास्त आधुनिक पद्धतीने निवडणूक घेतली जाते. देशात मुख्य निवडणूक आयोगप्रमाणे राज्य निवडणूक आयोगही आहे. राज्यातील पंचायत निवडणूक, पालिका निवडणूक जिल्हा पंचायत निवडणुकांचे काम पाहत आहे. पूर्वी स्थानिक निवडणूक या सचिवालयातर्फे पाहिल्या जात होत्या. आता राज्य निवडणूक आयोग या निवडणुका घेत आहे. आता 15 मार्च रोजी राज्यात जिल्हा पंचायत निवडणूक होणार आहे. यात राज्य निवडणूक आयोगाचा वाटा महत्त्वाचा असणार आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी सांगितले.

निवडणूक अधिकाऱयांच्या जागृती मोहिमेमुळे मतदारांची संख्या वाढत आहे. तसेच अनेक बिगरसरकारी संस्थाही जागृती करत आहे. अनेक उपक्रम राबविले जातात यामुळे अनेक मतदार मतदान करण्यास येतात, असे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते निवडणूक कार्यालयाच्या कार्य पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच निवडणूक कार्यालयाने निवडणुकीसाठी विविध उपक्रम राबविले तसेच स्पर्धेत भाग घेतला त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात निवडणूक कार्यालयाचे कामगार तसेच विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

मुरगाव पालिकेच्या 125 उमेदवारांचे भवितव्य असुरक्षीत

Patil_p

फोंडय़ातील कला मंदिरमध्ये ‘उत्सव रंगभूमीचा’ प्रदर्शन

Amit Kulkarni

फालेरो गेले, फुर्तादो आले

Amit Kulkarni

आयआयटी रद्द केल्याचे लेखी आश्वासन मिळे पर्यंत आंदोलन चालूच

Patil_p

म्हापशात मोबाईल चोरटय़ास अटक

Amit Kulkarni

ग्रामीण शिक्षक ते…ग्लोबल शिक्षकपर्यत मजल मारणारा डॉ. अशोक प्रियोळकर

Amit Kulkarni
error: Content is protected !!