Tarun Bharat

मतदार ओळखपत्र ‘आधार’ला जोडणार

Advertisements

बोगस मतदान करणाऱयांना चाप बसणार : एकाच नावावरील अनेक ठिकाणच्या नोंदणीही रद्द होणार : नवीन निवडणूक सुधारणांना केंद्र सरकारची मान्यता

परिणाम…

  • आधार-मतदार कार्ड जोडणीमुळे बोगस मतदारांचा पर्दाफाश शक्य
  • एकाच व्यक्तीच्या नावावर असलेली 2-3 नोंदणी समोर येईल
  • बोगस मतदार याद्या उघड होतील, घुसखोरांचा डाटा समोर येईल
  • सर्वात महत्वाचे म्हणजे मतदारांची खरी आकडेवारी समोर येईल

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशातील मतदार ओळखपत्रे ‘आधार’शी जोडण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निवडणुकीत यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत येत्या काळात मतदार ओळखपत्र आधार क्रमांकाशी लिंक करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या शिफारशीच्या आधारे सरकारने हा निर्णय घेतला आहे. मतदार कार्डशी आधार लिंक केल्यास बनावट मतदार ओळखपत्रामुळे होणारी फसवणूक रोखण्यास मदत होणार आहे. तसेच बोगस मतदारसंख्या समोर येण्याबरोबरच एकाच व्यक्तीच्या नावावरील दोन-तीन ठिकाणी असलेली नोंदणीही रद्द होणार आहे.

सध्या सरकारच्या प्रत्येक कामात आधारकार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने 2019 मध्ये आधार कार्डसोबत वोटर आयडी अर्थात मतदान ओळखपत्र जोडण्याची दुरस्ती सुचवली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी बोगस मतदान करणाऱया मतदारांना चाप बसणार होता. तसेच बोगस मतदार याद्यांचेही पितळ उघडे पडणार होते. हा प्रस्ताव तीन वर्षांपासून धूळ खात पडला होता. यंदा ऑगस्ट महिन्यात केंद्रीय कायदा व न्यायमंत्री किरेन रिजिजू यांनी निवडणूक आयोगाच्या प्रस्तावावर सरकार गंभीर असल्याचे सूचित केले होते. त्यानंतर या ड्राफ्टला मंजुरी देण्यात आली. तसेच केंद्र सरकारने इतरही काही सुधारणांना मंजुरी देण्यात आली आहे. या अहवालानुसार सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनातच या सुधारणा मांडणार आहे.

2015 सालीच निवडणूक आयोगाने राष्ट्रीय निवडणूक कायदा शुद्धिकरण आणि पडताळा कार्यक्रम सुरु केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानंतर हा कार्यक्रम थांबविण्यात आला होता. आताही केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी देताना आधार कार्डसोबत मतदान कार्डची ओळख संपूर्णतः ऐच्छिक ठेवली आहे. तरीही त्याचा मोठय़ा प्रमाणात वापर होईल यात शंका नाही.

मतदार कार्ड आधारशी लिंक केल्यास काय होईल?

एखाद्या व्यक्तीचे नाव त्याच्या शहराच्या मतदार यादीत आहे आणि तो बराच काळ दुसऱया शहरात राहत असल्याचे अनेकदा दिसून येते. त्यामुळे त्यांचेही नाव दुसऱया शहरातील मतदार यादीत समाविष्ट होते. अशा स्थितीत दोन्ही ठिकाणच्या मतदार यादीत त्यांचे नाव कायम आहे. एकदा आधारशी लिंक केल्यानंतर मतदाराचे नाव मतदार यादीत एकाच ठिकाणी असेल. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला फक्त एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे.

सध्या अनिवार्य नसून ऐच्छिक…

सध्या मतदार कार्डशी आधार लिंक करणे अनिवार्य नसून ऐच्छिक असेल. म्हणजेच, मतदार कार्ड आधारशी लिंक करायचे नसल्यास ते जोडण्याची सक्ती केली जाणार नसल्याची स्पष्टोक्ती देण्यात आली आहे. मात्र, भविष्यात ही जोडणी प्रक्रिया सक्तीची केली जाऊ शकते. यासंदर्भात सुरू करण्यात आलेल्या पथदर्शी प्रकल्पांचे परिणाम सकारात्मक असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

नवमतदार नोंदणीसाठी वर्षभरात चार संधी

सरकारने प्रस्तावाला दिलेल्या अनुमतीनुसार आता नवमतदारांना नोंदणीसाठीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येणार आहे. मतदार नोंदणीसाठी वर्षभरात चार संधी देण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारांच्या नोंदणीची सोय 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर अशा चार टप्प्यात केली जाणार आहे. नव्या प्रस्तावामुळे देशातील तरुणांना दरवषी चार वेगवेगळय़ा तारखांना मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. म्हणजेच मतदार होण्यासाठी आता वर्षातील चार तारखा कटऑफ मानल्या जाणार आहेत. आत्तापर्यंत केवळ दरवषी 1 जानेवारी रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षांच्या तरुणांनाच मतदार म्हणून नोंदणी करण्याची परवानगी मिळत होती.

Related Stories

फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत पंतप्रधानांची चर्चा

Patil_p

Karnataka; कर्नाटक पाठ्यपुस्तक समितीच्या प्रमुखांचे अश्लिल ट्विट, राज्यभर निदर्शने

Abhijeet Khandekar

सीबीआय मुख्यालयात आगीची दुर्घटना

Amit Kulkarni

दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये 800 डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह

Vivek Porlekar

काँगेस नसती तर देश अधिक सुखी असता!

Patil_p

घरगुती औषधांमुळे मिळतोय रोजगार

Patil_p
error: Content is protected !!