Tarun Bharat

मद्य दुकानांसमोर तळीरामांची मोठी गर्दी

प्रतिनिधी/ रत्नागिरी, खेड

शासनाने सोमवारपासून मद्यविक्रीस सशर्त परवानगी दिल्याचे वृत्त सर्वत्र पसरताच गेल्या दिड महिन्यांपासून अस्वस्थ असलेल्या तळीरामांनी जिल्हय़ात विविध  मद्य विक्रती दुकानांसमोर तोब गर्दी केली होती. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सेगद्वारे लाईनही लावण्यात आली तर काही ठिकाणी तळीराम घुटमळत असताना दिसले. मात्र, मद्य दुकाने उघण्यासाठी आवश्यक ती पुर्वपरवानगी प्रशासनाकडून न घेतल्याने सर्व दुकाने बंदच होती. त्यामुळे  मद्य शौकिनांचा मोठा भ्रमनिरास झाला.

 सोमवारी मद्याची दुकाने उघडणार असल्याचे वृत्त पसरल्याने खेडमध्ये शिवाजी चौकातील मद्याच्या दुकानाजवळ सोमवारी सकाळपासूनच तळीरामांनी मोठी गर्दी केली होती.  सोमवारी सकाळ उजाडताच अनेकांनी मद्याच्या दुकानानजीक तळ ठोकला होता. शहरासह ग्रामीण भागातून अनेकजण मद्य खरेदीसाठी येथे दाखल झाले होते. मद्य मिळेल, या आशेपोटी अनेकांनी रणरणत्या उन्हातही तेथेच तळ ठोकला होता. मात्र  दुपारपर्यंत हे मद्याचे दुकान बंदच होते.

 रत्नागिरी शहरातही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. मद्याविना संयम राखायचा तरी किती असा प्रश्न या तळीरामांसमोर उभा आहे. पण सोमवारी तळीरामांच्या संयमाचा बांध व्हायरल झालेल्या मेसेजमुळे फुटला. सोमवारी सकाळीच मद्याविना होणारी तडफड शमविण्यासाठी वॉईनशॉपच्या शोधात तळीराम घराबाहेर पडले. पण शहरातील दुकाने बंदच होती. मात्र, थोडय़ा वेळाने दुकाने उघडतील अशी आशा ठेवून त्यांनी संयम राखला. त्यासाठी सकाळी आठ वाजल्यापासून तळीरामानी दारू दुकानांबाहेर गर्दी केली. सोशल डिस्टन्सिंग पाळून दारूसाठी दुपारपर्यंत कडक उन्हात घामही गाळला. पण वाईन शॉप काही उघडले नाहीत.

चौपट दरानेही केली होती खरेदी

 लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्रीची दुकाने बंद होती. मात्र कासावीस झालेल्या मद्यपींनी ती मिळवण्यासाठी प्रचंड आटापीटा केला. मिळेल त्या दराने मद्य खरेदी करणे पसंत केले, त्यासाठी चौपट पैसेही मोजले. एरव्ही भाजी, धान्याच्या दरात वाढ झाल्यास लगेच आक्षेप घेणाऱया तळीरामांचा महागलेल्या दारूला मात्र आक्षेप दिसला नाही. याकाळात चोरटय़ा दारू विक्रीतून अनेकांनी घसघशीत कमाई केली. आता दुकाने उघडणार या आनंदात असलेल्या तळीरामांच्या आशेवर सोमवारी तरी पाणी फिरले.

पूर्वपरवानगी नसल्याने दुकाने बंद

मद्याची दुकाने उघडण्यास सरकारने मुभा दिली असली तरी त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून स्वतंत्रपणे परवानगी घेणे आवश्यक आहे. तशी परवानगी नसल्याने जिल्हय़ात दुकाने उघडू शकली नसल्याचे समजते. वाईन शॉप मालकांनी आपली दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी यासाठी उत्पादन शुल्कच्या कार्यालयातही धाव घेतल्याचे समजते. मात्र तेथेही त्यांना दिलासा मिळू शकला नाही.

Related Stories

पेशंट भुदरगडला, टेन्शन सावंतवाडीत

NIKHIL_N

रत्नागिरी : दापोलीत मच्छिमारांचे साखळी उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच

Archana Banage

सिंधुदुर्गातील 44 ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध

Anuja Kudatarkar

पालकमंत्र्यांनी जाहीर केलेल्या विमाकवचाचा लाभ द्या

NIKHIL_N

गरीब शेतकऱयाचे वीजबिल तब्बल 32 हजार

Patil_p

मृत्यूच्या दारातून बिबट्या आला परत

Anuja Kudatarkar