Tarun Bharat

मध्यवर्ती बसस्थानकात समस्यांचा डोंगर

बसस्थानकात प्रवाशांना प्राथमिक सुविधा मिळत नसल्याने मोठी गैरसोय : अंतर्गत भागाची दुर्दशा; परिवहन मंडळाचे दुर्लक्ष

प्रतिनिधी / बेळगाव

पिण्याच्या पाण्याचा अभाव, शौचालयाची दुर्दशा, धुळीने माखलेले अंतर्गत रस्ते, पडून असलेला कचरा, बस वाहतुकीमुळे उडणारी धूळ, आसनांअभावी उन्हात थांबलेले प्रवासी, हे चित्र आहे सतत गजबजणाऱया मध्यवर्ती बसस्थानकातील. बसस्थानकात प्रवाशांना प्राथमिक सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. शिवाय अनेक समस्यांनी बसस्थानक समस्यांच्या गर्तेत सापडल्याचे दिसून येत आहे.

मध्यवर्ती बसस्थानकाचा स्मार्ट सिटीअंतर्गत विकास साधला जात आहे. याकरिता तात्पुरत्या बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. याठिकाणी सोयींपेक्षा गैरसोयींचाच सामना प्रवाशांना करावा लागत आहे. कोरोना नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक प्रवाशांसह लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र तात्पुरत्या बसस्थानकात कोणत्याच सुविधा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे.

मध्यवर्ती बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नसल्याने प्रवाशांना पाण्यासाठी फिरावे लागत आहे. सार्वजनिक नळ आणि इतर कोणतीही पाण्याची व्यवस्था नसल्याने अबालवृद्धांसह सर्वसामान्य प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

बसस्थानकात असलेल्या आसनांची दुर्दशा झाली आहे. शिवाय आसनांअभावी प्रवाशांना भर उन्हात ताटकळत थांबावे लागत आहे. प्रवाशांची संख्या वाढल्याने त्या तुलनेत बसथांबे आणि आसने कमी पडत असल्याने प्रवाशांना बसथांबा सोडून बाहेर थांबावे लागत आहे. परिणामी बस वाहतुकीलादेखील प्रवाशांची अडचण निर्माण
होत आहे.

तात्पुरत्या बसस्थानकात उभारलेल्या शौचालयाकडे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषतः महिला प्रवाशांची कुचंबना होताना दिसत आहे. शिवाय शौचालयाच्या शेजारी अस्वच्छता पसरल्याने प्रवाशांना नाक मुठीत धरूनच ये-जा करावी लागत आहे.

बसस्थानकातील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने अंतर्गत भाग धुळीने माखला आहे. त्यामुळे प्रवाशांना धुळीचा सामना करावा लागत आहे. ये-जा करणाऱया बसमुळे धुळीच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे प्रवाशांचा श्वास धुळीत कोंडताना दिसत आहे.

बसस्थानकाच्या परिसरात अस्वच्छता पसरली आहे. शौचालय व इतर ठिकाणी प्लास्टिक पिशव्या आणि झाडेझुडुपे वाढली आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण होत आहे. बसफेऱयांबरोबर प्रवाशांची संख्या पूर्वपदावर येत आहे. बस विविध मार्गांवर धावत आहेत. त्यामुळे महसूलही हळूहळू वाढत आहे. मात्र बसस्थानकात प्राथमिक सुविधांअभावी प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. एकीकडे परिवहन प्रवाशांची संख्या वाढवून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र दुसरीकडे बसस्थानकात प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. बसस्थानकात प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी प्रवाशांतून होत
आहे.

Related Stories

स्थानिक लांब पल्ल्याच्या बसेस पूर्ववत सेवेत

Patil_p

शहर परिसरात नाताळचा उत्साह

Patil_p

पावसाच्या दडीने शेतकरी चिंतेत

Patil_p

पूरस्थितीबाबत आज उच्चस्तरिय बैठक

Patil_p

ग्रहण काळ.. बाजारपेठ थंडगार

Patil_p

आरक्षणासाठी 11 डिसेंबरला बेंगळूरला आंदोलन

Amit Kulkarni