स्वच्छतेबाबतच्या उपक्रमांसह नागरिकांना माहिती मिळणार
प्रतिनिधी /बेळगाव
नगरविकास खात्याच्यावतीने राबविण्यात येणाऱया योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येतात. स्वच्छतेबाबतची माहिती नागरिकांना देण्यासाठी स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत महापालिका कार्यालयात किऑस्क डिस्प्ले बसविण्यात आला आहे. या माध्यमातून स्वच्छतेबाबतचे उपक्रम आणि माहिती नागरिकांना मिळणार आहे.
यापूर्वी स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत टीव्हीच्या माध्यमातून स्वच्छतेची माहिती देण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, याकरिता महापालिकेला देखभाल करावी लागत होती. त्यामुळे महापालिका कार्यालयात बसविण्यात आलेला टीव्ही बंदच आहे. मात्र, आता नगरविकास खात्याने नव्या पद्धतीचा किऑस्क डिस्प्ले महापालिका कार्यालयाला देऊ केला आहे. बेळगाव जिल्हय़ात सात स्थानिक स्वराज्य संस्थांना हा किऑस्क डिस्प्ले देण्यात आला आहे.
महापालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हा डिस्प्ले ठेवण्यात येणार असून, याद्वारे स्वच्छतेबाबतची माहिती आणि नगरविकास खात्याकडून राबविण्यात येणाऱया योजनांची माहिती प्रसारित केली जाणार आहे. थेट नगरविकास खात्याच्या कार्यालयातून यावर जाहिराती आणि माहिती प्रसारित केली जाणार आहे. केवळ डिस्प्ले सुरू करणे आणि बंद करण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाकडे देण्यात आली आहे. महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱया विकासकामांची माहितीदेखील याद्वारे दिली जाणार आहे. मात्र, स्वच्छतेची माहिती देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
बुधवारी हा डिस्प्ले महापालिका कार्यालयात दाखल झाला असून, याची माहिती संगणक आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी जाणून घेतली.